Thursday, 10 January 2019

शेतकऱ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून फायदेशीर शेती करावी - कृषि मंत्री चंद्रकांत पाटील

कृषि महोत्सव आणि दख्खन जत्रेचे दिमाखात उद्घाटन

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : परंरागत शेती फायदेशीर ठरत नसून नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी फायदेशीर शेती करावी. शेतकरी सुखी, समृध्द सुरक्षित व्हावा, यासाठी केंद्र राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. आगामी काळातही त्या दृष्टीने अनेक योजना राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन महसूल, कृषि, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील पोलीस कवायत मैदानात आयोजित जिल्हा कृषि प्रदर्शन दख्खन जत्रेचे उद्घाटन तसेच, राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार 2018-19 चे वितरण महसूल, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, वनश्री नानासाहेब महाडीक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सी. बी. पाटील, पंचायत समिती सदस्या मनिषा गावडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, प्रकल्प संचालक (आत्मा) बसवराज मास्तोळी, वैभव शिंदे, सागर खोत आदि मान्यवर उपस्थित होते.
    परंपरागत शेती फारशी लाभदायक ठरत नसून शेतकऱ्यांना नवनवीन विकसीत होणारे वाण, आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती व्हावी त्यांनी त्याचा वापर करून आपले उत्पादन आणि उत्पन्न वाढवावे, यासाठी कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून कृषि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील शेतकरी सुखी, समृध्द व्हावा यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच प्रशिक्षण मिळाले तर ते मोठ्या प्रमाणावर लाभ घेतील, या दृष्टीने 2 लाख 84 हजार शेतकऱ्यांना मोफत त्यांच्या बांधावर जावून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उत्पादनापासून विक्री पर्यंत अनेक योजना राबविल्या जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी 2 हजार मंडल स्तरावर हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यावर्षी 87 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचे सांगून शेती आणि शेतकरी यांना सुरक्षित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
    दख्खन जत्रामुळे बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीचे दालन मिळाल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, बचत गटांनी खाद्य पदार्थांच्या निर्मिती पुरतेच मर्यादेत रहाता नवनवीन वस्तुंचे उत्पादन करावे. यावेळी त्यांनी महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी कोल्हापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर तर वाघवाडी येथे मॉल उभारण्यात येत असल्याचे सांगितले.
    यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचा सत्कार करण्यात आला.
    कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून संपन्न होत असलेला कृषि महोत्सव जिल्ह्यात आदर्श ठरत असून यातून कष्टकरी शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवले जात आहे. या कृषि महोत्सवास परिसरातील विद्यार्थी, शेतकरी यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शासन शेतकऱ्याच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. कृषि महाविद्यालयासाठी वाघवाडी फाट्याजवळ  जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील कृषि महाविद्यालयामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा भव्य पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात येणार आहे. या महाविद्यालयाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
कृषि यांत्रिकीकरणाचा शासनाने निर्णय घेतला असून शेतकऱ्याच्या खात्यात त्यासाठीही अनुदान जमा केले जात आहे, असे सांगून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी 272 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृषि अवजारांचे अनुदान सातपट वाढविण्यात आले असून पॉलिहाऊस, शेडनेट, ग्रीनहाऊस यांचेही अनुदान वाढविण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम 2 लाख रूपये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विम्याची 11 हजार कोटी रूपयांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. मृदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहेत. 180 देशांमध्ये शेतकऱ्यांना माल निर्यात करण्याची सुविधा करून देण्यात आली असून सांगली जिल्ह्यातही निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
    जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कृषि प्रदर्शनाचे नेटके आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे सांगितले. तसेच गतवर्षी दख्खन जत्रेत तीन दिवसात 32 लाखांची विक्री झाली असून यावर्षीही चांगलीच विक्री होईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यात बचत गटांची चांगली चळवळ रूजली असून बचत गटांसाठी मोठा प्रोजेक्ट द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली.
    या कृषि महोत्सव दख्खन यात्रेमध्ये कृषि संबंधित 220 स्टॉल, तर 138 बचत गटांचे स्टॉल, विविध विभागांचे 40 स्टॉल लावण्यात आले आहेत. महिला स्वयंसहाय्यता समुहासाठी अत्यंत मानाचा समजला जाणारा राजमाता जिजाऊ अतिउत्कृष्ट महिला स्वयंसहाय्यता समुह स्वावलंबन पुरस्कारामध्ये श्री यल्लमा स्वयंसहाय्यता समुह पाटगाव, ता. मिरजने 10 हजार रूपयांचा प्रथक क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. तर शिवकृपा स्वयंसहाय्यता समुह कोगनोळी, ता. कवठेमहांकाळने 7 हजार रूपयांचा व्दितीय क्रमांकाचा आणि अंबिका स्वयंसहाय्यता समुह रामानंदनगर ता. पलसूने 5 हजार रूपयांचा तृतीय पुरस्कार मिळविला. जिल्हास्तरावर स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेस व्यापक प्रसिध्दी दिल्याबद्दल दै. पुण्यनगरी, सांगलीचे वार्ताहर प्रवीण वसंत शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला. स्वयंसहाय्यता बचत गटांचे संप्रेरक म्हणून जास्तीत जास्त अर्थसहाय्य केलेल्या उत्कृ ष्ट बँक शाखाधिकारी म्हणून पुष्पावती अरविंद पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली शाखा भिलवडी यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी तालुकास्तरावरील प्रत्येकी तीन बचत गटांना प्रथम, व्दितीय तृतीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
    यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी, बचत गटांच्या महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000