शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

हौसाताईंची चित्तरकथा



   क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांना नाशिक येथील तुफान सेनेच्या वतीने 'वुमन ऑफ मिलेनियम' पुरस्कार जाहीर झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते 1 जानेवारी 2017 रोजी विटा येथे हौसाताईंना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे त्यानिमित्त.....

     मला आठवतं माझ्या बालपणी माझे आजोबा भाई भगवानराव पाटील उर्फ बाप्पा आम्हा नातवंडांना छान संस्कार गोष्टी, इसापनितीच्या कथा सांगत असत. रात्री झोपताना गाणी म्हणत अर्थात त्यांची गाणी म्हणजे क्रांतीगीते आणि कामगार चळवळींमधील स्फूर्ती गीते असत. या सर्व गोष्टी आणि गाणी आजही आम्हा भावंडांसाठी कुबेराचा खजिना आहेत. पण ..... आजीने म्हणजे हौसाताईंनी अस जवळ बसवून गोष्टी वगैरे सांगितल्याच आठवत नाही. चळवळीतील गाणी तिला मुखोद्गत होती पण ती ते काम करत गुणगुणायची. नातवंडांना जवळ बसवून चिऊ-काऊचा घास भरवत तिने गोष्टी सांगितल्या नाहीत. पण हा विचार करतानाच तिच स्वत:च आयुष्यच एक चित्तरकथा असल्याचं लक्षात आलं.
   माझी आजी हौसाताई पाटील ही क्रांतिसिंह नाना पाटलांची एकुलती कन्या. तिच्या क्रांतिकारी आयुष्याच सिंहावलोकन करताना चित्तरकथेचे सर्व निकष तिच्या जीवनाला तंतोतंत लागू होताना दिसतात. चित्तर कथेतील संघर्ष, त्याग, समर्पण, नाट्य, विस्मय, रोमांचकारी प्रसंग, सुख दु:खांचा खेळ या सर्व गोष्टी तिच्या आयुष्यात ठासून भरलेल्या दिसतात. थ्रिलर कादंबरीचा विषय होण्याइंतपत रोमांचकारी घटनांनी तिचं आयुष्य व्यापलेलं आहे. कादंबरीतील जग अभासी असते. परंतु इथं तीने ते थ्रील प्रत्यक्ष सोसलेलं, अनुभवलेलं आहे. म्हणूनच नाशिकच्या 'तुफान सेना' संस्थेच्यावतीने देण्यात येणारा 'वुमन ऑफ मिलेनियम' पुरस्कार जेंव्हा तिला घोषित झाला तेंव्हापासूनच हा तिचा जीवनपट पुन्ह: पुन्हा मन:पटलावर उमटत राहीला. आणि मी पुन्ह: पुन्हा तिच्यासमोर नतमस्तक होत राहीले.
   हौसाताईंची गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील धगधगता अंगार प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील आक्कुबाई या दांपत्याच्या पोटी 12 फेब्रुवारी 1927 ला हौसाताईचा जन्म झाला. ती तीन वर्षाची होती तेंव्हाच तिचे मातृछत्र हरवले. आईच्या मायेला पोरकी झालेली हौसा कधी आजोळी दुधोंडीत तरी कधी माहेरी येडे मच्छिंद्र येथे असे. दोन्ही ठिकाणी तिचे बालपण गेले. वडील स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटीशांविरोधी लढाईत सक्रीय त्यामुळे ते भूमिगत होते. छोट्या हौसाला ना आईचे प्रेम मिळाले ना वडिलांचा सहवास. वडिलांची आई, भाऊ आणि आजोळच्या नातेवाईकांनीच तिचा सांभाळ केला.
   तिच्या चित्तरकथेची सुरूवात अशी पोरकेपणापासून होते. वडीलांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे आणि ब्रिटीश विरोधी कारवायांमुळे पोलीसांची वक्रदृष्टी येडे मच्छिंद्र मधील पाटील कुटूंबियावर होती. नाना पाटील भूमिगत होते. पण पोलीसांच्या छळाला सामोरं जात होते. त्यांचे कुटुंबिय यात लहान हौसाचा ही समावेश होता. नाना पाटलांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या         घरादारावर जप्ती आणली. शेतजमीन जप्त केली. घराला टाळे ठोकले. अशा स्थितीत कुटूंबाची, छोट्या हौसाची ही फरफट होऊ लागली. इतरांच्या शेतावर राबून कुटूंबाची गुजराण होऊ लागली. त्यामध्ये पाच-सहा वर्षाची हौसा ही आपला हातभार लावू लागली. तत्कालीन परिस्थितीमुळे तिला शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. परंतु वडिलांच्या सत्यशोधकी विचारांमुळे हौसा लिहायला वाचायला शिकली.
वयाच्या 13 व्या वर्षीच हौसाताईच लग्न झालं. राजकारणात, समाजकारणात उठबस असलेल्या हणमंतवडिये येथील मोरे घराण्याशी सोयरीक झाली. 1940 मध्ये भाई भगवानराव पाटील (बाप्पा) यांच्याशी तिचा विवाह झाला. बाप्पा स्वत: राजकरणाची, समाजकारणाची आवड असलेले गृहस्थ होते. विवाहानंतर नाना पाटलांच्या, प्रतिसरकारच्या संपर्कात येताच त्यांनी ही स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. ब्रिटीशांना चकवा देत भूमिगत राहून ते प्रतिसरकारचे कार्य करू लागले. बाप्पांच्या या कार्यात हौसाताईंचा सक्रीय सहभाग होता. विश्वासू साथीदार म्हणून चळवळीतील जोखमीच्या कामासाठी हौसाताईंची निवड होऊ लागली. भूमिगत कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणे, ठरल्या ठिकाणी त्यांचे जेवण पोहोच करणे. वेळी-अवेळी आलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय करणे ही त्यावेळीची नित्त्याची कामे होती. परंतु चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी पोलिसांच्या बंदुका, हत्यारे पळविणे, ब्रिटीश नोकरदारांच्या पगाराच्या गाड्या लुटणे, रेल्वे लुटणे, पोलिस ठाणे जाळणे तुरूंगातील सहकाऱ्यांची सुटका करून आणणे आदी क्रांतिकारी कामात तिचा सक्रीय सहभाग होता. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा युक्त्या आणि क्लुप्त्या वापरून आपल्या साथीदारांच्या सहाय्याने हौसाताईने अनेक मोहीमा फत्ते केल्या होत्या.
ऑक्टोबर 1943 ला वांगीचा डाक बंगला जाळला तेव्हांची गोष्ट. या बंगल्यातील पोलिसांच्या हत्यारांबाबत वावराबाबत इत्यंभूत माहिती काढण्याची जबाबदारी हौसाताईवर सोपविण्यात आली होती. तेव्हा ती फक्त सात दिवसांची बाळंतीण होती. तान्हं बाळ घरी ठेवून भूमिगतांनी ठरवून दिलेल्या साथीदाराबरोबर अणवाणी पायांनी चालत तिने वांगी गाठली होती. ऐन थंडीचे दिवस होते. स्मशान भूमीतील पेटत्या चितेची उब घेत पोलिसांच्या या ठाण्याची टेहळणी केली. पोलिसांना सुगावा लागू देता खबऱ्यांमार्फत निरोप आणि योग्य माहिती भूमिगतांना पोहोचवली आणि दुसऱ्या दिवशीच भूमिगतांनी ब्रिटीशांचे ठाणे जाळले. ब्रिटीशांना क्रांतिकारकांबद्दल दहशत, दरारा वाटावा म्हणूनच ती कामगिरी होती. अशा वेळी हवं तस नाट्य उभा करून आपणास हवी असलेली माहिती काढून घेण्यासाठी आणि पोलिसांच्या हातावर तुरी ठेवण्यासाठी हौसाताई भूमिगत चळवळीच्या हुकमी एक्का होती.
जी. डी. बापू लाड यांच्याबरोबर गोव्याला जावून चळवळीसाठी रायफली, हत्यारे आणण्याची तिची कामगिरी अंगावर शहारे उभी करणारी आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी जंगल तुडवत जाणे आणि समुद्राची खाडी पोहून पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पसार होणे हे दिव्यच होते. पण स्वातंत्र्य लढ्यासाठी तीने ते दिव्य ही पार केले. भवानीनगर स्टेशनवरील पोलिसांच्या रायफली पळविताना, सुर्ली घाटात पगाराची गाडी लुटताना, गोव्यातील क्रांतिकारक बाळ जोशी यांची तुरूंगातून सुटका करण्यासाठी तिने जे नाट्य पोलिसांसमोर उभा केले त्याला तोडच नाही.
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. भूमिगत क्रांतिकारकांची धरपकड थांबली. सर्वजण देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात आपआपल्या जीवनात व्यस्थ झाले. पण हौसाताईची लढाई थांबली नव्हती. गोवा मुक्ती आंदोलनाने जोर धरला आणि ती त्यामध्ये सक्रीय राहीली. भाषावर प्रांतरचनेनुसार राज्यांची पुर्नरचना करण्याची आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची राजकीय खेळी सुरू झाली. बेळगाव, बिदर, कारवार, भालकी, डांग सीमावर्ती मराठी भाषिक प्रांत कर्नाटक राज्याला जोडला. मराठी भाषिकांवर अन्याय झाला. मुंबईसह अखंड महाराष्ट्रासाठी लढा सुरू झाला आणि हौसाताईंनी पुन्हा कंबर कसली. मराठी महिला कार्यकर्त्यांची फौज उभा केली. मराठी भाषिक जनतेचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी दिल्ली, मंंुबई, निपाणी येथील महिलांच्या मोर्चांचे नेतृत्व केले. सहा महिने तुरूंगवास भोगला. परकीयांना हाकलवून लावल्यानंतर स्वकीय पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या.
1965 मध्ये महागाई विरोधात विरोधी पक्षांनी रान उठविले होते. राज्यभर निदर्शने, मोर्चाचे आयोजन केले होते. खानापूर तालुकाही यात मागे नव्हता. परंतु या लढ्याची पोलिसांना आधीच कुणकुण लागल्याने त्यांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची धरपकड केली होती. यात खानापूर तालुक्यातून बाप्पा आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश होता. आता मोर्चाचा बेत फसणार अशीच पोलिसांची अटकळ होती. पण सर्व प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत हौसाताईने मोर्चाचे नेतृत्व करून सलग सात दिवस हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून पोलिसांची भंबेरी उडवून दिली होती. महागाई विरोधात खवळलेल्या जनतेला आवर घालणे पोलिसांच्या हाताबाहेर गेले तेंव्हा त्याच हौसाताईंच्या एका हाकेबरोबर उसळलेली जनता शांत होत होती. हौसाताईंच्या या नेतृत्वगुणाला तेंव्हाच्या पोलिसांनीही दाद दिली होती.
1972 पासून खानापूर तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाचा सामना करतो आहे. शेतीच्या पाण्याची शाश्वती नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. पिण्याचे पाणी नाही. तेंव्हा सर्वांच्या खांद्याला खांदा लावून हौसाताई दुष्काळग्रस्तांच्या लढ्यासाठी सज्ज झाली. ताकारी योजना, टेंभू योजनांचे काम मार्गी लावण्यासाठी सतत सरकारवर दबाव टाकत राहीली. त्यासाठी मोर्चे, आंदोलने, धरणे, उपोषण, निदर्शने या हत्यारांचा वापर करत राहीली. श्रमिक, कष्टकरी जनतेवरील अन्यायाला वाचा फोडत राहीली. 2002 मध्ये विटे तहसील कचेरीसमोर तब्बल 102 दिवसांचे धरणे आंदोलन हौसाताईंच्या नेतृत्वाखाली उभारले गेले. 102 दिवस ती स्वत: कचेरीसमोर ठिय्या मारून बसली होती. आजही हौसाताई श्रमिकांच्या, कष्टकरी चळवळीच्या लढ्यातील कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आहे. वयाच्या 91 व्या वर्षीही सार्वजनीक जीवनातील तिचा वावर, चळवळीतील कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठीचा तिचा आग्रह तरूणांना लाजवणारा आहे.
या सर्व वाटचालीत प्रापंचिक जीवनात सुख-दु:खाचे अनेक प्रसंग तिच्या वाट्याला आले. 1976 ला पिता नाना पाटलांचे निधन, 1988 ला नुकतेच मिसरूड फुटत असलेल्या नातवाचा मृत्यू, 2000 मध्ये पतींचे निधन, 2003 मध्ये कर्त्या मुलाचे निधन आणि आता नुकतेच दोन महिन्यांपूर्वी स्नुषा लिलाताई सर्वांना सोडून गेली. या सर्व दु:खाला मोठ्या धैर्याने ती सामोरी गेली. अशातच अनेक जीवघेणी दुखणी, व्याधी तिचा पाठलाग करत आहेत. पण अजून ही ती हारलेली नाही.
अनंत आमुची ध्येयासक्ती |
अनंत अन् आशा |
किनारा तुला पामराला ||
   असं काळाला ठणकावून सांगत कोणत्याही नव्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी ती 24 तास तत्पर असते. तीची हीच ऊर्जा आम्हा सर्वांना जगण्याची उमेद देते. आम्हा सर्वांमध्ये ही ऊर्जा कायम           झिरपत राहो ही सदिच्छा. अशा या जगावेगळी चित्तरकथा असलेल्या आजीची शंभरी साजरी करण्यास आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.

-         दमयंती पाटील

(लेखिका क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पनती आहेत)