गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

नवमतदार नोंदणी वा बदलाची 14 ऑक्टोबरपर्यंत सुवर्णसंधी

महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी मतदार नोंदणी मोहीम 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या भारतीय नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे. तसेच मतदारांच्या तपशिलामधील दुरूस्ती करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2016 अखेर मतदार नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे. ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा पात्र मतदारांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. तरी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर छायाचित्र मतदार याद्यांच्या या कार्यक्रमात नक्की नाव नोंदवा.
 
राज्यातील 26 जिल्हा परिषदा, 214 नगर परिषदा /नगर पंचायती, 296 पंचायत समित्या आणि 10 महानगरपालिकांच्या मुदती डिसेंबर 2016 ते मार्च 2017 या कालावधीत संपणार आहेत. त्यापूर्वी त्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीत नावे नोंदवावीत किंवा तपशीलात दुरूस्ती करावी. दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. त्यासाठी रविवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2016 रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दावे हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2016 अशी आहे. याबाबतचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे - मतदारयादी मधील संबंधित भागाचे / सेक्शनचे / ग्रामसभा / स्थानिक संस्था येथे वाचन आरडब्ल्युएसोबत बैठक इत्यादी आणि नावांची खातरजमा करणे दिनांक 30 सप्टेंबर 2016 अखेर पर्यंत. विशेष मोहीम रविवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2016 रोजी. दावे हरकती निकालात काढण्याचा दिनांक 16 नोव्हेंबर 2016 पर्यंत.  डाटाबेसचे अद्ययावतीकरण दिनांक 15 डिसेंबर 2016 पर्यंत. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी दिनांक 5 जानेवारी 2017.
मतदारांनी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 अर्ज करावा. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना 6 अर्ज करावा. मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना 7 अर्ज करावा. मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरूस्तीसाठी नमुना 8 अर्ज करावा. मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना           8 अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज हरकती सर्व मतदार मदत केंद्र अतिरिक्त मतदार मदत केंद्र म्हणून निर्देशित केलेल्या मतदान केंद्रावर स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nvsp.in ला भेट द्यावी. प्रारूप मतदार यादी, वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नावांची यादी मतदार मदत केंद्रांची अतिरिक्त मतदार मदत केंद्रांची यादी पाहण्यासाठी अथवा इतर माहितीसाठी तहसिलदार कार्यालयास किंवा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
1 जानेवारी 2016 या अर्हता दिनांकावर आधारीत दिनांक 16 जानेवारी 2016 रोजी प्रसिध्द                        झालेल्या मतदारयादीनुसार सांगली जिल्ह्यात 21 लाख 95 हजार 434 इतके मतदार आहेत. यामध्ये 11 लाख 39 हजार 221 इतके पुरूष तर 10 लाख 56 हजार 164 स्त्री 49 इतर मतदारांचा समावेश आहे.  दिनांक 22 जानेवारी 2016 ते दिनांक 31 ऑगस्ट 2016 अखेर झालेल्या निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये पुरवणी क्रमांक 2 नुसार सांगली जिल्ह्यात 9 हजार 689 इतक्या मतदारांची वाढ झाली असून 15 हजार 831 इतक्या मतदारांची वगळणी झाली आहे. दिनांक 16 सप्टेंबर 2016 रोजीच्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदार संख्या 21 लाख 89 हजार 292 इतकी आहे.
दिनांक 16 सप्टेंबर 2016 रोजीच्या प्रारूप मतदार यादीतील सांगली जिल्ह्यातील एकूण 82 हजार 981 इतक्या मतदारांचे फोटो मतदारयादीत नाहीत. संबंधित मतदारांनी आपल्या अचूक नावाची मतदारयादीत फोटो असल्याबाबतची खात्री करावी. फोटो नसल्यास संबंधितांनी तहसिल कार्यालय 282-सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी जिल्हा पुरवठा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे रंगीत छायाचित्रासह नमुना 8 अर्ज जमा करावा.
राष्ट्रीय मतदारयाद्या शुध्दीकरण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण कार्यक्रमानुसार सांगलील जिल्ह्यामध्ये एकूण 21 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालय 282-सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 12 मतदार मदत केंद्रे स्थापन केली आहेत. संबंधित मतदान केंद्र अथवा तहसिल कार्यालय तसेच 282-सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रावर अथवा जिल्हा पुरवठा कार्यालय, राजवाडा परिसर, सांगली येथे संपर्क साधावा.
भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी मतदारांना अधिक साक्षर जागृत करण्याच्या उद्देशाने हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावी आणि परिणामकारकरित्या राबविण्यावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी विशेष भर दिला असून त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा गतीमान केली आहे. तरी अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यांद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत नक्की नोंदवून घेऊन राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान द्यावे.

संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी
सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा