गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

स्वच्छ भारत अभियान प्रत्येक पाऊल स्वच्छतेकडे...

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त बदलत्या स्वरुपात सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2019 पर्यंत संपूर्ण भारत देश हागणदारीमुक्त करण्याचे निर्धारित केले आहे. हाच ध्यास घेऊन सांगली जिल्हा परिषद प्रशासनही अध्यक्षा स्नेहल पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चला एकच ध्यास धरुया! आपला सांगली जिल्हा डिसेंबर अखेर हागणदारीमुक्त करुया हे ब्रीद घेऊन काम करत आहे.
राज्य शासनाने मागील वर्षातील या कार्यक्रमाची जिल्हा निहाय झालेली प्रगती विचारात घेऊन चालू वर्षात सन 2016-2017 पर्यंत राज्यातील एकूण 10 जिल्हे संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याचे  निश्चित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्ह्याची निवड झाली आहे. हे आव्हान पेलायला सांगली जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. सांगली जिल्हा डिसेंबर 2016 पर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
ग्रामीण क्षेत्र हागणदारीमुक्त होण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम नियमित वापर प्राधान्याने होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम झाल्यावर प्रोत्साहन अनुदान रक्कम 12 हजार रुपये देण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये सन 2012 च्या बेसलाईन सर्व्हेनुसार एकूण 3 लाख 74 हजार 597 कुटुंबांपैकी 3 लाख 16 हजार 440 कुटुंबांचे शौचालय बांधकाम माहे जुलै 2016 अखेर पूर्ण आहे. त्याची टक्केवारी 81 इतकी आहे. सन 2016-17 साठी वार्षिक कृती आराखड्यामध्ये 464 ग्रामपंचायती प्रस्तावित असून एकूण 71 हजार 52 उद्दिष्टापैकी 16 हजार 70 उद्दिष्ट आज अखेरीस पूर्ण केले आहे. उर्वरित 54 हजार 982 इतके शिल्लक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 699 पैकी 340 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त असून 359 ग्रामपंचायती शिल्लक आहेत. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम झाल्यावर प्रोत्साहन अनुदान रक्कम रुपये 12 हजार देण्यात येत आहे.
याशिवाय जिल्हा परिषद पाणी स्वच्छता विभागामार्फत ग्रामीण भागातील जनतेलाही आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ म्हणाले, ही एक समाजसेवेची संधी आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याकरिता प्रत्येक ग्रामस्थाने जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्याने ग्रामीण जनतेमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याबाबत जागरुकता निर्माण करावी. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुदृढ होऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रशासनास विशेष सहकार्य होईल.
जिल्हा परिषद स्वच्छ भारत अभियान अंतर्गत यावर्षी शौचालय बांधकाम पूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये सर्व जि.प. पंचायत समिती सदस्य, सरपंच ग्रामसेवक यांची कार्यशाळा घेण्यात आली. शौचालय नसणाऱ्या कुटुंबांसाठी विशेष गृहभेट मोहिमेचे आयोजन करुन शौचालय बांधकाम वापर बाबत माहिती देण्यात आली. तसेच वैयक्तिक शौचालय बांधकाम शुभारंभ, गवंडी प्रशिक्षण, विशेषलक्ष्मी ग्रामपंचायत साप्ताहिक आढावा, जिल्हास्तर, तालुकास्तर गणस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक, वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरु करणाऱ्या लाभार्थींच्या शासकीय सेवा बंद करण्याबाबत नोटिसा, गुडमॉर्निंग पथकांचा वॉच, आवाहन पत्र लाल स्टिकर लावणे उपक्रम, रथयात्रा असे विविध उपक्रम राबविणेत आले आहेत.
प्रत्येक सन्माननीय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांनी किमान एक ग्रामपंचायत दत्तक घेऊन डिसेंबर 2016 पर्यंत सदर ग्रामपंचायत 100 टक्के हागणदारीमुक्त करावी. आपले स्वच्छतेकडे टाकलेले एक पाऊल आपल्या जिल्ह्याला स्वच्छ सुंदर, हागणदारीमुक्त करण्यास मदत करेल, असे आवाहनही जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
याबरोबरच शौचालय बांधल्यास कडक कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे दाखले/ परवाने देण्यात येणार नाहीत, शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. एकंदरीतच डिसेंबर अखेर संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा विडा जिल्हा परिषद प्रशासनाने उचलला आहे.
संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी
सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा