मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

सुहास जाधव यांच्या प्रकल्पात फुल खिले है गुलशन गुलशन...

कृषि विभागाच्या योजनांमधून अनेकांनी आपल्या जीवनात प्रगती साधली आहे. वाळवा तालुक्यातील तांबवे येथील सुहास विलास जाधव त्यापैकीच एक. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हरितगृह प्रकल्प त्यांनी उभारला आणि त्यांच्या प्रगतीची घोडदौड सुरू झाली आहे.
सुहास जाधव सुरवातीला ऊस शेती आणि भाजीपाला ही पिके करत होते. दरम्यान त्यांना कृषी कार्यालयामध्ये हरितगृह प्रकल्पासंदर्भामधील माहिती मिळाली. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सबसिडी मिळते. हे समजल्यानंतर त्यांनी हरितगृह प्रकल्प करण्याचा विचार केला. 2011 मध्ये हरितगृह सुरु केले. त्यात त्यांना चांगले यश मिळाले. त्यातून प्रेरणा घेवून त्यांच्या बंधुनेही दुसरा हरितगृह प्रकल्प 20 गुंठ्यामध्ये सुरु केला. कृषी विभाग राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाकडून मदत झाल्यामुळे हा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण झाला.
याबाबत सुहास जाधव म्हणाले, तालुका कृषि कार्यालय वाळवा येथून मला  या प्रकल्पासाठी जवळपास 8 लाख रुपये स्ट्रक्चरसाठी आणि प्लँटेशनसाठी 6 लाख रुपये अनुदान मिळाले. कर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी मदत झाली. यासाठी तालुका कृषि अधिकारी वाहीन पठाण आणि कृषी सहाय्यक प्रमोद आनंदराव पाटील यांची मोलाची मदत झाली. मला या प्रोजेक्टमधून 20 गुंठ्यात रोजचे 1400 ते 1500 रूपये उत्पादन मिळते. या फुलांना मार्केटमधून मला सरासरी एका फुलाला 2 रुपये दर मिळतो. असे महिन्याअखेर 50 हजार इतके उत्पन्न मिळते आणि सर्व खर्च वजा करता 35 ते 40 हजार रुपये महिन्याला शिल्लक राहतात, असे त्यांनी सांगितले.
सुहास जाधव यांनी सुरवातीला 20 गुंठ्यामध्ये 12 हजार रोपे लावली. त्यांनी ही रोपे पुणे येथील एका कंपनीतून खरेदी केली. यामध्ये पाच प्रकारच्या प्रजाती आहेत.  लालमध्ये स्टांझा प्रजाती, पांढऱ्यामध्ये सिल्व्हेस्टर प्रजाती, गुलाबीमध्ये प्रिइन्टेस प्रजाती, पिवळ्यामध्ये डालायन आणि सबमरिन या प्रजाती घेवून उत्पादनाची सुरवात केली. सुरवातीला यासाठी बाहेरुन माती भरुन बेड प्रिपरेशन आणि खताचा बेसल डोस दिला. त्यानंतर बेड करुन त्याला ड्रीप करुन त्यावरती रोपांची लावण करण्यात आली. लावण केल्यानंतर साधारण दोन-अडीच महिन्यामध्ये फुलांचे उत्पादन चालू झाले. हे उत्पादन चालू होवून 3 वर्षे झाले आणि अजून 2 वर्षे हे चालू राहील, असे सुहास जाधव यांनी सांगितले.
लग्नापूर्वी सुहास जाधव यांच्या पत्नी भाग्यश्री शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. फुलशेती प्लँट सुरू केल्यानंतर आपली प्रगती झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत भाग्यश्री जाधव म्हणाल्या, आज खूप छान वाटत आहे. आम्ही जरबेरा फुलशेती करतो. सुरवातीला आमचा सोयाबीन प्लॅन्ट होता. तो अयशस्वी झाल्यानंतर जलबेराची फुलशेती करण्याचे ठरवले. हा प्रकल्प सुरू केल्यानंतर पुढच्या पाचच वषांर्मध्ये आम्ही दुसरा कार्नेशन फुलांचा प्रकल्प सुरु केला आहे, हे आमचे यश म्हणावे लागेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, आम्ही फक्त आमच्याच कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवले नाही तर, आमच्याबरोबर 4 ते 5 कुटुंबांना रोजगार देवून त्याचेही आर्थिक उत्पन्न वाढवले आहे, हे सगळ्यात मोठे आमचे यश वाटते. यासाठी कृषी विभागाचे आम्हाला मौलाचे सहकार्य लाभले आहे. आणि सर्वाचे आभार व्यक्त करते.
याबाबत तालुका कृषि अधिकारी वाहीन पठाण म्हणाले, वाळवा तालुक्यामध्ये साधारण 75 टक्के क्षेत्र हे पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल फुलशेतीकडे आहे. 2014-15 मध्ये मोठ्या प्रमाणात हरितगृह आणि शेडनेट हाऊस याचा प्रचार आणि प्रसार तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून करण्यात आला. त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये 2014-15 मध्ये 23 शेतकरी यामध्ये सहभागी झाले. तर यामध्ये 1 कोटी 91 लाख आणि 4.88 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती ग्रीन हाऊस आणि शेडनेट हाऊससाठी अनुदान दिलेले आहे. सुशिक्षित बेकारांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊसमध्ये यांची वाव आहे. शेतकरी यामध्ये यशस्वीही झाले आहेत. भविष्यात निश्चितच अनेक शेतकरी यामध्ये यशस्वी होतील आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा आदर्श ग्रीन हाऊसचे मॉडेल या तालुक्यामध्ये निर्माण होतील, अशी आशा श्री. पठाण यांनी व्यक्त केली.
रोजच्या नियोजनातून, लक्ष केंद्रीत करुन अतिशय चांगल्या प्रकारे फुलशेती वाढवली आणि या फुलशेतीतून इतके आर्थिक उत्पन्न वाढले.
संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी

सांगली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा