शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

स्वैच्छिक रक्तदान - लोकहिताची चळवळ

राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस म्हणून 1 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. समाजामध्ये स्वैच्छिक रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी. 100 टक्के रक्ताचे संकलन हे रक्तपेढी रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्या स्वैच्छिक रक्तदात्यांकडून व्हावे या उद्देशाने हा राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस राबवण्यात येतो. याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रामुख्याने युवा वर्गामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमिवर रक्तसंकलन, विविध चाचण्या, रक्तदान मोहीम आदिंबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या लेखामधून करत आहोत.
रक्त गोळा करण्याची पद्धती
रक्तदात्यास कोणत्याही जंतुसंसर्ग होवू नये म्हणून सर्व निर्जंतूकीकरणाची काळजी घेऊन प्रशिक्षित व्यक्तीकडून रक्त काढून घेतले जाते. एका रक्त पिशवीमध्ये एकावेळी 350 ते 450 मि.ली. लिटर रक्त घेतले जाते. या पिशवीमध्ये रक्त सुरक्षित राहण्याकरिता सायट्रेट फॉस्फेट डेक्सट्रोज अडेनाईन (CPDA) द्रावण वापरतात.
रक्तपेढीमध्ये रक्तावर केल्या जाणाऱ्या विविध चाचण्या
   रक्तदात्याची रक्तगट तपासणी (A, B, AB, O, Grouping), आर एच डी प्रकार पॉझिटिव्ह निगेटिव्ह (Rh Typing), एच आय व्ही तपासणी, मलेरियाची तपासणी, गुप्तरोगाची तपासणी कावीळीची तपासणी केली जाते. रुग्णास सुरक्षित दर्जेदार रक्त देणे हे रक्तपेढीचे कर्तव्य आहे. किंबहुना तो रक्तपेढीचा आत्मा समजला जातो. यासाठी वरील सर्व प्रकारच्या चाचण्या करणे अनिवार्य आहे. त्यामुळे वरील तपासण्या करीता रक्त ठेवण्याची प्लॅस्टिक बॅग याचा खर्च 850 रुपये येतो. याची रीतसर पावती अदा केली जाते. या सर्व तपासण्या काळजीपूर्वक केल्यानंतर रक्त बॅगेवर A,B,AB,O (Positive and Negative) या प्रकारे लेवल लावली जातात या बॅगा शीतगृहात 2 सेंटीग्रेड ते 6 सेंटीग्रेड तापमानात ठेवल्या जातात. शीत साखळी व्यवस्थित राखली जाते. संगणकाद्वारे ती नियंत्रित केली जाते. त्यासाठी सेंट्रल मॉनिटर युनिट याचा वापर केला आहे. तसेच संगणकावर तापमानाचा आलेख तापमान याची नोंद केली जाते.
स्वैच्छिक रक्तदान मोहीम
   स्वैच्छिक रक्तदानामुळे रक्ताचा दर्जा वाढतो त्यामुळे एच.आय.व्ही. संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होतो. स्वैच्छिक रक्तदान मोहिम सर्व मान्यता प्राप्त रक्तपेढीमार्फत राबविली जाते. रक्तदानामुळे शरीरावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. शासनाकडून रक्तदानानंतर चहापाण्यासाठी 25 रुपये किंवा त्याचा चहा बिस्कीट नाष्टा दिला जातो. सांगली जिल्ह्यामधील विविध सामाजिक, शैक्षणिक, संस्था राजकीय पक्ष, कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळे यांनी दिलेल्या रक्तदान शिबीरामधून गतवर्षी रक्तपेढीने एकूण 4 हजार 115 रक्तपिशव्या रक्तसंकलन केले आहे.   गतवर्षी रक्तदान शिबीरातून रक्तपेढीमध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना देण्यात येणाऱ्या सामायिक स्वैच्छिक रक्तदाता कार्ड वरुन त्यांना त्यांच्या नातेवाईकांना पुर्णपणे मोफत 3 हजार 996 रक्तपिशव्या देण्यात आल्या आहेत.
थॅलेसिमिया रुग्ण दत्तक योजना
   थॅलेसिमिया या रुग्णांना दर महिन्यास रक्ताची आवश्यकता भासते ऐनवेळी सदर रुग्णांना आवश्यक त्या रक्तगटांचे रक्त उपलब्ध करुन देणे अवघड होते. थॅलेसिमिया रुग्ण दत्तक योजनेत प्रत्येक रुग्णासाठी 15 निरोगी रक्तदाते निवडले जातात. प्रत्येक व्यक्तीला वर्षातून दोन वेळा या रुग्णांसाठी रक्त द्यावे लागते. या योजनेसाठी जिल्ह्यातील तरुण पिढीच्या सहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. थॅलेसिमिया, हिमोफेलिया, सिकलसेल या रुग्णांना शासनाने मान्यता प्राप्त रक्तपेढीतून मोफत रक्त देण्याची सोय राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई ने केली आहे.
रक्तदात्यांसाठी ग्रीन कार्ड योजना
   स्वैच्छिक रक्तदात्यांची रक्तदानाची दखल घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई यांनी किमान चार वेळा रक्तदान केले आहे, अशा रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना गरजेच्या वेळी प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ग्रीन कार्ड दिले जाते. या ग्रीन कार्डवर रक्तदात्यांना पुढील सुविधा दिल्या जातात. सरकारी निमसरकारी रुग्णालयात उपचारासाठी ग्रीन कार्ड धारक रक्तदात्यांना त्या रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या उपचाराच्या सर्व सुविधा त्यांना रांगेत उभे राहण्याची सक्ती करता नियमानुसार अग्रक्रमाने देण्यात येतील, ग्रीन कार्ड धारक रक्तदात्यांना रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या सर्व तपासण्या उपचार प्राधान्यक्रमाने विनाविलंब करुन देण्यात येतील.
डिरेक्टरी
          www.mahasbtc.com या वेबसाईटवर नियमित एैच्छिक रक्तदाते यांची सूची तयार करण्यात आली असून, ही सूची नियमित अद्यावत करण्यात येते. तसेच निगेटीव्ह रक्तगट पॉजेटीव्ह रक्तगट, रक्तदात्यांची सूची वरील उपलब्ध वेबसाईटवर आहे. तसेच शासनाने www.nhp.gov.in या वेबसाईटवर भारतातील रक्तपेढ्यांची माहिती दैनंदिन रक्तपेढीनिहाय रक्तगटाप्रमाणे रक्तपेढीकडे उपलब्ध असणारा दैनंदिन रक्तसाठा यांची माहिती देण्यात आली आहे.
मोफत रक्त मिळण्याची सुविधा
   आपण स्वैच्छिक रक्तदान केले असल्यास त्याबाबत आपणास प्रमाणपत्र सामायीक स्वैच्छिक रक्तदान कार्ड मिळते. या सामायिक स्वैच्छिक रक्तदान कार्डवरती सदर रक्तदात्यांस महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय रक्तपेढी, महानगरपालिका संचलित रक्तपेढी मधून पूर्णपणे मोफत कोणत्याही प्रकारे शुल्क घेता बदली रक्त देता नि:शुल्क एक रक्ताची पिशवी मिळेल. या योजनेचा कालावधी रक्त दिल्यापासून 2 वर्षे आहे. रक्तदात्यांस सदर कार्डवरती स्वत: त्यांचे कुटुंब, नोतवाईक अथवा गरीब रुग्णास, मित्रमंडळी यांना गरजेच्या वेळी आपल्या संमतीने एक रक्तपिशवी मोफत दिली जाते.
संकलन - दिपाली चंद्रकांत सुतार
(लेखिका जिल्हा माहिती कार्यालय, सांगली येथे आंतरवासिता करीत आहेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा