सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

प्रणाम मृत्यृंजय वीराला..




ओढ के तिरंगा क्यों पापा आये है
माँ मेरा मन बात ये समझ न पाया है
सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या नितीन सुभाष कोळी यांच्या कच्चा बच्च्यांच्या चेहऱ्यावर हा प्रश्न उमटला होता. नितीन यांच्या घरी आई, वडील, लहान भाऊ, पत्नी आणि दोन कच्ची बच्ची.. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारे. नेहमी आपल्याशी बोलणारे, खाऊ आणणारे त्यांचे बाबा आज असे का निपचित पडले आहेत. घरी जवानांची आणि इतर माणसांची गर्दी का झाली आहे, सगळेजण का रडत आहेत
पापा कहाँ है जा रहे अब ये बताओ माँ
चुपचाप से आँसू बहा के यू सताओ ना माँ
अशा अगणित प्रश्नांची गर्दी त्यांच्या डोळ्यात जाणवत होती.
मोठा देवराज वय वर्षे चार आणि छोटा युवराज वय वर्षे अवघे दोन. त्यांच्या आईच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला होता. तिच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये हा प्रश्न वाहून गेला. या चिमुरड्यांप्रमाणेच दुधगावमधील प्रत्येक माणसाचं मन आज रडत होतं. त्यांच्या नितीनने देशासाठी वीरमरण पत्करले होते. कॉन्स्टेबल नितीन सुभाष कोळीभारतमातेसाठी बलिदान दिलेला आणखी एक निधड्या छातीचा वाघ वय वर्षे अवघी 28. या जवानाने आपल्या प्राणांची आहुती दिली.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील दुधगाव हे नितीन कोळी यांचे गाव. दहावी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नितीन यांना सैन्यदल खुणावू लागले. ते 2008 साली भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलात भरती झाले. 156 बटालियन मध्ये ते कार्यरत होते. त्यांची नेमणूक जम्मू काश्मिर परिसरातील पाकिस्तान सीमेवर करण्यात आली होती.
कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या गोळीबारात नितीन कोळी गंभीर जखमी झाले व लष्करी रूग्णालयात उपचार सुरू असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला. अब तुम्हारे हवाले वतन साथियो म्हणत नितीन मरणाला सामोरे गेले.
जमाने भर में मिलते है आशिक बहुत
मगर वतन से खूबसुरत कोई सनम नही होता
नोटों से लिपटकर, सोने में सिमटकर मरे तो है बहुत
मगर तिरंगे से खूबसुरत कोई कफन नही होता..
हे सैन्य दलाचे आणि जीवनाचे मर्म नितीन कोळी यांनी जाणले होते. म्हणूनच ते हसत हसत मरणाला सामोरे गेले. नितीन कोळी यांच्या अंतिम क्षणी सारा वारणाकाठ त्यांना निरोप देण्यासाठी खचाखच भरला होता. प्रत्येकाच्या डोळ्यातील आसवं म्हणत होती.
सीमेवर ते लढले म्हणून
गावात दिवाळी आली आहे
पणती त्यांच्या घरातली विझवून
दिवाळी आली आहे..
याची जाणीव प्रत्येक माणसाला होती. म्हणूनच कोणीही न सांगता दुधगावच्या प्रत्येक घरातील आकाशदिवा खाली उतरला होता. कुठल्याच घरात दिवाळी साजरी केली नाही. आज नितीन कोळी जरी आपल्यात नसले तरी त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान कुठल्याही तराजूत तोलता येणारे नाही. जगण्याचे सोहळे अनेक असणार आहेत. पण देशासाठी प्राण देण्याची वेळ एकदाच येते. आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राण देणाऱ्या शहीद नितीन कोळी यांच्या कुटुंबियांना सन्मानाने वागवून आपल्याच कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांचीही काळजी घेऊया. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत हातभार लावून आपण आपले कर्तव्यही पार पाडण्याचा संकल्प करूया. आपले प्राण देऊन भारतमातेचे रक्षण करणाऱ्या नितीन कोळी यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
म्हणूनच पहिला प्रणाम, सलाम या मृत्युंजय वीराला..
संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी
सांगली





शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीतची स्थापना शासन निर्णय क्र. अमामं 1998/प्र.क्र.363/रोस्वरो-1, दि.27/11/1998 अन्वये करण्यात आलेली असून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेवून या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवुन त्यात येणाऱ्या अडचणी दूक करणे असा या महामंडळाचा उद्देश आहे. सदर महामंडळ हे कंपनी कायदा 1956अंतर्गत नोंदणीकृत आहे.
महामंडळातील कर्ज मंजूरीची पद्धत
लाभार्थ्याने कर्ज प्रकरण अर्जाच्या तीन प्रतीत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालयात सादर केल्यानंतर जिल्हा रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी सदर कर्ज प्रकरणांची पडताळणी करुन किफायतशीर असल्याचे तपासून स्थळ पाहणी अहवाल सादर केला जातो. नंतर सदर प्रकरणाची एक प्रत बँकेकडे मंजूरीसाठी पाठविली जाते. बँकेची मंजूरी मिळाल्यानंतर सदर प्रकरण मुख्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर सदर प्रकरणाची छाननी करुन महामंडळाकडून बीज भांडवल मंजूर केले जाते त्यानंतर सदर मंजूर रक्कम जिल्हा कार्यालयाकडे पाठविले जाते. जिल्हास्तरावर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सदर बीज भांडवल बँकेकडे वर्ग केले जाते आणि सदर बँकेमार्फत लाभार्थ्यास कर्ज वितरण केले जाते.
कर्ज मंजूरीनंतर करुन द्यावयाची कागदपत्रे
   बीज भांडवल योजनेंतर्गत अर्जदाराला मनी रिसिप्ट, डिमांड प्रॉमिसरी नोट, सिक्युरिटी बाँड, सेकंड हायपोथिकेशन डीड इत्यादी वैधानिक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. टीप-योजनेच्या आधिक माहितीसाठी अर्ज करण्यापूर्वी जिल्हा रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.
महामंडळात राबविली जाणारी बीज भांडवल कर्ज योजना
   या योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्के असून अर्जदारास 5 टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या 35 टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. सदर 35 टक्के रक्कमेवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी 5 वर्षाचा असून बँकेने कर्ज वितरीत केल्यानंतर त्वरीत दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज भांडवलाची वसूली सुरु केली जाते. बीज भांडवल वसूली हप्त्याचे आगावू धनादेश घेतले जातात.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या अर्जदार पात्रता अटी शर्ती
   अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, त्याचे वय 18 ते 45 वर्षे असावे, अर्जदाराचे नाव रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदविलेले असावे, अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी 55 हजार ग्रामिण भागासाठी 40 हजार रुपयेच्या आत असावे, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी, त्याचे जिल्ह्यात स्थायी वास्तव्य मागील 3 वर्षे असावे, अर्जदार कोणत्या संस्थेमार्फत विक्री करणार आहे त्याचा तपशील देणे आवश्यक आहे.
अर्जासोबत खालील बाबींची पूर्तता
   बँकेचे ना-देय प्रमाणपत्र, तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड दोन वेगवेगळे जामीनदार देणे आवश्यक आहे, नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज फोटो आवश्यकतेप्रमाणे इतर कागदपत्रे करारपत्र/ भाडेपावती जागेबाबत पुरावा तांत्रिक  शिक्षणाचे प्रमाणपत्र महानगरपालिका/ ग्रामपंचायत परवाना ड्रायव्हींग लायसन्स परमीट परवाना डिलेव्हरी चलन इत्यादी.
अत्यंत महत्वाची सूचना
आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध त्या करिता Web : http://mahaswayamrojgar.maharashtra.gov.in./Forms/JobScheme.aspx या वेबसाईटवरुन आपणास ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घ्यावा सदर वेबसाईटवर योजना या ऑपशनमध्ये आपणास कर्ज प्रकरणासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध आहे तसेच माहिती पूर्ण तयार केल्यानंतर आपण वरील वेबसाईट वरुन ऑनलाईन अर्ज सादर करु शकता त्या करिता या कार्यालयास यावयाची आवश्यकता नाही किंवा या कार्यालयाकडून अर्ज घ्यावयाची आवश्यकता नाही. तसेच तयार केलेल्या कागदपत्रांच्या फाईलच्या तीन प्रती ज्यावेळी या कार्यालयातील अधिकारी स्थळ पाहणी करता भेट देतील त्यावेळी त्यांना देणेत याव्यात अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या 0233-2600554 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

                               संप्रदा द. बीडकर
                        प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                               सांगली


00000