शुक्रवार, २४ मार्च, २०१७

मुद्रा कर्ज योजनेमुळे कृष्णदेव रसाळे यांची प्रगतीकडे वाटचाल

सांगलीच्या मंगलमूर्ती चौक, संजयनगर येथील श्री न्यू रत्ना किराणा अँड जनरल स्टोअर्स मध्ये आजकाल गर्दी वाढली आहे. कारण दुकानाचे मालक कृष्णदेव आनंदराव रसाळे यांनी त्यांच्या दुकानाचा पसारा थोडा वाढवला आहे. आता त्यांच्या किराणा माल दुकानात हर तऱ्हेचा माल मिळू लागला आहे. त्यांच्या आयुष्यात ही संधी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमुळे प्राप्त झाली आहे.
कृष्णदेव रसाळे 1980 पासून संजयनगरमध्ये राहतात. विज्ञान शाखेमध्ये दुसऱ्या वर्गात शिकत असताना त्यांचा विवाह करण्यात आला. अचानक पडलेल्या जबाबदारीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. त्यांनी एका दुकानात दिवाणजी म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर रसाळे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, भांडवलाचा प्रश्न होताच. सुदैवाने तेव्हा उधारीवर माल मिळायचा. त्या क्रेडिटवर त्यांनी 1990 च्या सुमारास त्यांनी स्वतःचे छोटेखानी दुकान सुरू केले. 1996 साली पंतप्रधान रोजगार योजनेचा लाभ घेतला. वेळेत पूर्ण कर्जही फेडले. गेली 20 वर्षे त्यांचे हे छोटेखानी दुकान सुरू आहे. छोट्या मोठ्या स्वरूपात त्यांनी हे छोटेखानी दुकान कष्टाने, नेटाने आणि जिद्दीने चालवले. पण, आता मार्केट बदलले आहे. क्रेडिटवर माल मिळत नाही. सर्व व्यवहार रोखीने होत आहेत. उधारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे भांडवलाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला.  
गेल्या वर्षी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेची माहिती त्यांना मिळाली. त्यातून त्यांनी एक लाख रुपये कर्ज घेतले. ते कर्ज फेडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत कृष्णदेव रसाळे म्हणाले, 1996 पासून मी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत आहे. मात्र, सध्या व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे भांडवलासाठी पैशाची चणचण भासत होती. ती समस्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे संपली. आता हर एक तऱ्हेचा माल मी माझ्या दुकानात ठेवत आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा मला बराचसा फायदा झाला आहे. त्यामुळे माझे गिऱ्हाईकही वाढले आहे आणि गिऱ्हाईकला पाहिजे त्या वस्तू देऊ शकत आहे.
कृष्णदेव रसाळे यांच्या घरी आई, पत्नी आणि एक मुलगी आहे. मुलगी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहे. कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पार पाडतानाच स्वतःची उन्नती साधून एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेची मदत त्यांना झाली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे अनेक होतकरू व्यावसायिकांना मदतीचा हात मिळाला आहे. स्वयंरोजगारातून स्वतःची प्रगती करण्यासाठी धडपडणाऱ्या कृष्णदेव रसाळे यांच्यासारख्यांना या योजनेमुळे प्रगतीच्या नव्या दिशा खुणावू लागल्या आहेत.
संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी
सांगली




सर्वजण मिळून क्षयरोग संपवूया

दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. वास्तविक, क्षयरोगाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलने आणि क्षयरोगाविषयी जनजागृती होणे हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. देशात दररोज सुमारे 5 हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोगाची लागण होते दररोज 1 हजार व्यक्ती मृत्युमुखी पडतात. सांगली जिल्ह्यामध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यामध्ये 59 प्राथमिक आरोग्य केंद्र, 15 ग्रामीण रूग्णालये 320 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी डॉटस् औषधोपचार पध्दती क्षयरूग्णांस मोफत दिली जाते. डॉटस् प्रणालीमध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 90 ते 95 टक्के इतके आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी सर्वजण मिळून टीबी संपवूया हे घोषवाक्य प्रसारित केले आहे.
क्षयरोग 2 हजार वर्षापूर्वीपासून परिचित आहे. पूर्वी आयुर्वेदामध्ये क्षयरोग हा राजयक्षमा या नावाने ओळखला जात होता. 1882 पूर्वी क्षयरोग होण्याचे कारण कोणत्या रोगजंतुमुळे हे माहित नव्ते. क्षयरोगास कारणीभूत असणारा जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा 24 मार्च 1882 रोजी सर रॉबर्ट कॉक या जर्मन वैज्ञानिकाने शोधून काढला. त्या निमित्ताने 24 मार्च हा दिवस जगभरामध्ये क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉटस् प्रणाली रूग्णांना सुलभ वेळेत उपलब्ध करून मिळावी या उद्देशाने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, दाई सामाजिक कार्यकर्ते, खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांच्यामार्फतही उपलब्ध करून दिली जाते. तसेच सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना केंद्र राज्य सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे क्षयरूग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला कळविणे बंधनकारक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने जर ठरविले की, आपला देश टीबी मुक्त देश बनविण्यासाठी जे जे करता येईल ते ते आपण करू, तर टीबी मुक्त देश करणे शक्य आहे लवकर निदान आणि नियमित औषधोपचारामुळे क्षयरोग हा पूर्णपणे बरा होता.
क्षयरोग कसा होतो
   क्षयरोग हा माकोबॅक्टैरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. फुप्फुसाचा क्षयरोग झालेला रोगी जेव्हा खोकतो, त्यावेळी शरिरातील जंतू हवेत फेकले जातात. जेव्हा अन्य निरोगी व्यक्ती अशा रूग्णाच्या सहवासात येतो तेव्हा ते जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात अशा व्यक्तीला क्षयरोग होऊ शकतो.
क्षयरोग निदानाच्या पध्दती
   बेडका तपासणीमध्ये क्षयरोग्याचे दोन बेडका नमूने तपासणीसाठी घेतले जातात, छातीचा एक्सरे, सीबीएनएएटी तपासणी औषधोपचाराला दाद देणाऱ्या क्षयरोगाच्या (एमडीआर टीबी) निदानाकरिता लहान मुले एचआयव्ही बाधित क्षयरूग्णांच्या निदानाकरिता केली जाते.

फुप्फुसाचा क्षयरोग
·       दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला.
·       संध्याकाळी येणारा हलकासा ताप.
·       भूक मंदावणे वजन कमी होणे.
·       रात्री खूप घाम येणे.
·       काही गंभीर क्षयरूग्णाच्या बेडक्यातून रक्त पडते.
फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग
·       मानेवर गाठी येणे.
·       हाडे किंवा सांध्यांना सूज येणे.
·       पाठदुखी, पोटात दुखणे.
·       वंधत्व येणे इत्यादी.
क्षयरोगावरील उपचार
क्षयरोगावरील औषधोपचाराकरिता सर्व क्षयरूग्णांना फेब्रुवारी 2017 पासून दैनंदिन औषधोपचार पध्दती सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत क्षयरूग्णांना वजन गटाप्रमाणे दैनंदिन औषधोपचार दिला जातो.
औषधोपचार कालावधी
·       नवीन टीबी रूग्णांसाठी (कॅटॅगरी-1) - 6 महिने.
·       पूर्वी औषधोपचार घेतलेल्या रूग्णांसाठी (कॅटॅगरी -2) - 8 महिने.
·       औषधोपचाराला दाद देणारा क्षयरोग (एमडीआर टीबी - एक्सडीआर टीबी) - 2 वर्षे.
   एमडीआर एक्सडीआर टीबी हा सध्या प्रचलित औषधोपचारांना दाद देणारा टीबी आहे. नियमित पूर्ण कालावधीसाठी औषधोपचार घेतल्यामुळे त्याचबरोबर औषधांच्या चूकीच्या मात्रा घेतल्यामुळे एमडीआर एक्सडीआर टीबी होऊ शकतो. सर्वसाधारण टीबी रूग्ण 6 ते 8 महिन्यांच्या औषधोपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. परंतु एमडीआर एक्सडीआर टीबी करीता 24 ते 27 महिने औषधोपचार घ्यावा लागतो. सध्या दैनंदिन औषधोपचाराखालील रूग्णांचे पर्यवेक्षणाकरिता 99 डॉटस् या ऑनलाईन प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रूग्णाच्या दैनंदिन औषधोपचारावर देखरेख करणे सोईचे झाले आहे.
क्षयरूग्णांनी घ्यावयाची काळजी
   नियमित औषधोपचार, वेळोवेळी तपासण्या, संतुलीत आहार, खोकताना शिंकताना तोंडावर रूमाल वापरणे, औषधोपचारादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. यासाठी सर्व जनतेने जागरूख राहून दोन आठवडे किंवा जास्त कालावधीचा खोकला असल्यास त्या रूग्णास जवळच्या सरकारी रूग्णालयामध्ये जाऊन दोन बेडका नमुन्याची तपासणी करून घेण्याचा सल्ला द्यावा. तसेच क्षयरोग झाला असल्यास नियमित पूर्ण कालावधीचा उपचार घेण्यास प्रवृत्त करावे.
संदेश
·       जगातून क्षयरोग दूर करण्याची हीच खरी वेळ आहे.
·       महत्ताकांक्षी संशोधनाची हीच खरी वेळ आहे.
·       सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातून क्षयरूग्णापर्यंत पोहोचवण्याची हीच खरी वेळ आहे.
·       औषधाला दाद देणाऱ्या क्षयरूग्णांसाठी महत्त्वाकांक्षी नविन ध्येय ठरवण्याची हीच खरी वेळ आहे.
·       टीबी-एचआयव्ही रूग्णांमध्ये एकही मृत्यु होणार नाही या करिता जलद गतीने हालचाल करण्याची हीच खरी वेळ आहे.

                               डॉ. सुजाता जोशी
                            जिल्हा क्षयरोग अधिकारी
                               सांगली



 •