शनिवार, १० मार्च, २०१८

अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. पतंगराव कदम पंचत्वात विलीन : मान्यवरांकडून भावपूर्ण श्रध्दांजली
वांगी येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

सांगली, दि. 10, (जि. मा. का.): माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने आपण अत्यंत अजातशत्रू असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन नेहमी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज कडेगाव तालुक्यातील वांगी येथील सोनहिरा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यंाच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडेे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. पतंगराव कदम ज्यावेळी ते आजारी पडले, तेव्हा वाटले नव्हते की अशा प्रकारची घटना होईल. डॉ. कदम यांनी शुन्यातून विश्व निर्माण करून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्याचे मोठे काम केले. शिक्षण, राजकारण, सहकार अशा प्रत्येक क्षेत्रात डॉ. पतंगराव कदम यांनी आपला ठसा उमटवला. सर्व वयातल्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी त्यांच्यात होती. डॉ. पतंगराव कदम आपल्यातून निघून जाण्याची दु:खद घटना असून मी त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर राज्य शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच डॉ. पतंगराव कदम यांचे बंधु आमदार मोहनराव कदम शिवाजीराव कदम आणि पुत्र विश्वजीत कदम यांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस करुन त्यांचे सांत्वन केले त्यांना धीर दिला.
माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे पार्थिव आज सोनसळ येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली वांगी येथे सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली कुटुंबियांचे सांत्वन केले. यामध्ये खासदार संजय पाटील, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी मुख्यमंत्री सर्वश्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण खासदार अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सर्वश्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, विजयसिंह मोहिते-पाटील, जयंत पाटील, सतेज पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,  आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार निवेदिता माने, माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत आदिंचा समावेश होता. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
डॉ. पतंगराव कदम यांंच्या पार्थिवाचे उपस्थितांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी पार्थिवास भडाग्नी दिला. यावेळी उपस्थितांना आपला शोक अनावर   झाला. जमलेल्या शोकाकुल जनतेने अमर रहे, अमर रहे, कदम साहेब अमर रहे अशा भावपूर्ण घोषणा दिल्या.
यावेळी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. 
00000