सोमवार, ३० एप्रिल, २०१८

महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक शशीकांत बोराटे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीतवादनाने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर  पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यानंतर विविध पथकांनी दिमाखदार संचलन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. या संचलनाचे नेतृत्व मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनामध्ये जिल्हा पोलीस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस पथक, वाहतूक नियंत्रण कक्षाचे पथक, अग्निशमन दलाचे पथक आदि सहभागी झाले. तसेच पोलिस दलाकडील पोलीस बँड पथक, वज्र वाहन, दंगल नियंत्रण पथक, बाँब शोधक बाँब नाशक पथक, निर्भया पथक, गस्त पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका आणि अग्निशमन पथक इत्यादि पथकांचा सहभाग होता.
या सोहळ्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण भुकटे आणि बापूसाहेब पाटील, पद्मश्री विजयकुमार शहा, अशोकराव पवार यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, महिला, विद्यार्थी, नागरिक निमंत्रणांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे पोलिस विभागाचे बाळासाहेब माळी यांनी केले.


00000

रविवार, ८ एप्रिल, २०१८

शेतकऱ्यांचे अडचणींचे निराकरण करण्यास कटिबध्द - पालकमंत्री सुभाष देशमुख

खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत घेतला कृषि सज्जतेचा आढावा

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) :  शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा वेळीच पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी. भेसळयुक्त बियाणे देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, शेतकऱ्यांना बियाणे, खतपुरवठा, पाणी आणि विजेची सुविधा, उत्पादित मालाला चांगला हमीभाव दिल्यास  येथील शेतकरी समृद्ध होईल. या पार्श्वभूमिवर खरीप हंगामपूर्व बैठकीत बी-बियाणे, खते यांचा आढावा घेतला असून, खरीप हंगामासाठी जिल्ह्याची सज्जता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यास आपण कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
कृषि विभागाच्या वतीने सांगली जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा सन 2018-19 नियोजन बैठक पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची तसेच कृषि विषयक विविध योजनांची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. ज्या भागात जी पिके पिकतात त्यानुसार खरेदी केंद्रे सुरू करावीत. महावितरणने प्रलंबित कृषि पंप वीज जोडण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना करून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांची हेतुपुरस्पर अडवणूक आणि फसवणूक करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्यांची तसेच त्यांच्या कंपन्यांची गय करू नका, असा इशारा दिला. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे, खतांचा पुरवठा तसेच पीक कर्जाचे वितरण व्हावे, असे आदेशही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर यांनी मौलिक सूचना केल्या.
या बैठकीत गत खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीतील मुद्दे त्यावरील कार्यवाही, गोपीनाथ मुडे शेतकरी अपघात विमा योजना, बियाणे खत पुरवठा, विस्तार योजनेंतर्गत पिक उत्पादकता, कृषि यांत्रिकीकरण, गुणवत्ता नियंत्रण, मृद आरोग्य अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, द्राक्ष निर्यात, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, शेतकरी गट, उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पिक कर्ज पुरवठा, प्रलंबित कृषि पंपाना विज जोडणी, शास्वत शेती अभियानांतर्गत वनशेती अभियान आदि योजनांचा आढावा घेण्यात आला.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविकात जिल्ह्यातील खरीप हंगाम 2017 चा आढावा आणि खरीप हंगाम 2018च्या नियोजनाबाबतची, कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरीबद्दल श्री. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार रमेश विलास जाधव (येलुर, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषि भुषण पुरस्कार कै. माधवराव दत्ताजीराव पाटील यांचे वारस मोहन माधवराव पाटील (कांदे, ता. शिराळा) यांना प्रदान करण्यात आला. तसेच जमिन आरोग्य पत्रिकांचे वाटप कृषि दिनदर्शिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रविण बनसोडे यांनी केले. आभार प्रकल्प संचालक (आत्मा) सुरेश मगदूम यांनी मानले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषि विभागाचे अधिकारी,  गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

00000