शुक्रवार, २९ जून, २०१८

एकच लक्ष... 13 कोटी वृक्ष...

दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने मोठ्या प्रमाणात तापमानवाढ आणि हवामानातही बदल होत आहेत. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संरक्षण, जतन संवर्धन करून समृध्द संपन्न गावांची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे.
या पार्श्वभूमिवर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सन 2017 ते 19 या कालावधीत संपूर्ण राज्यात 50 कोटी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत यावर्षी राज्यभरात 13 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यामध्ये वन विभागास 7 कोटी 50 लाख, ग्रामपंचायत यंत्रणेस 3 कोटी आणि इतर यंत्रणांना 2 कोटी 50 लाख असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अंतर्गत 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत राज्यभरात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
सांगली जिल्ह्याचा बहुतांशी भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो, त्यामुळे वृक्षराजीही अभावानेच आढळते. मात्र, शासनाने सुरु केलेल्या वृक्षलागवड मोहिमेमुळे वृक्षारोपण बऱ्यापैकी होऊ लागले आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षात अधिकाधिक झाडे लावून पर्यावरण संतुलनाचे काम करण्यात जिल्हावासियांनी चांगले योगदान दिले आहे.
वृक्ष लागवड हा केवळ रोपे लागवडीचा कार्यक्रम नसून लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली 50 कोटी वृक्षलागवड समिती गठीत केली आहे. उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी समितीचे अध्यक्ष असून वन विभागाचे वनक्षेत्रपाल सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या 4 बैठका झाल्या असून, सर्व यंत्रणांचा चांगला प्रतिसाद आहे. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचीही बैठक घेण्यात आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे. सन 2018 च्या पावसाळ्यात सांगली जिल्ह्यात वन विभागासाठी 11 लाख 50 हजार, सामाजिक वनीकरण विभागासाठी 5 लाख, ग्रामपंचायतींसाठी 7 लाख 63 हजार इतर यंत्रणांसाठी 5 लाख 4 हजार असे एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता वन विभागासह, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत इतर यंत्रणा यांच्याकडून नियोजन केले आहे. वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या एकूण 43 रोपवाटिकांमध्ये 45 लाख  रोपे उपलब्ध आहेत. यापैकी 29 लाख 17 हजार रोपांची या वर्षी लागवड करण्यात येणार आहेत. उर्वरित रोपे पुढील वर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहेत. संबंधित यंत्रणांनी त्यांच्यास्तरावर रोपलागवड जागा निश्चित केल्या असून आजमितीस 29 लाख 46 हजार रोपलागवड स्थळांची नोंद ऑनलाईन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. 29 लाख 17 हजार रोपलागवडीच्या अनुषंगाने 29 लाख 35 हजार खड्डे खुदाई करण्यात आली आहे. तसेच, वन विभागाच्या नैसर्गिक पुनर्निर्मिती अंतर्गत एकूण 1 लाख 32 हजार रोपांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे यावर्षीही उद्दिष्टापेक्षा अधिक रोपलागवड होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सर्वांना मोठ्या प्रमाणात सहभागी होता यावे, यासाठी www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र हरित सेना सदस्य नोंदणी सुरू आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातून 1 लाख 60 हजारहून अधिक सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमी, प्राणीमित्र संघटना, आध्यात्मिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांनाही या कार्यक्रमात योगदान देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
वृक्षारोपणाबाबत जनजागृती होणे आवश्यक असून वृक्षलागवडीचे फायदे प्रत्येकाच्या मनात रूजले पाहिजेत. आरोग्य विभागाने त्यांच्या परिसरात कोरफड, फणस, कडीपत्ता, जांभूळ, चिंच, दगडीपाला, तुळस, धोतरा, बेल, निरगुडी यासारख्या औषधी वनस्पती लावाव्यात.
गत वर्षी 2017 च्या पावसाळ्यात 4 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 8 लाख, 84 हजार उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 9 लाख 14 हजार वृक्षलागवड करण्यात आली होती. 
वृक्ष लागवड मोहिमेत प्रामुख्याने वन आणि सामजिक वनीकरण विभागाबरोबरच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच अन्य शाखातील विद्यार्थ्यांनी किमान पाच ते दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करायला हवा. आपण सर्वांनी अधिकाधिक रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याच्या कामासाठी जिल्ह्यात शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून वृक्षचळवळ उभी करूया.. जिल्ह्यातील जनतेने आपल्या घराजवळील, शिवारातील आणि गावातील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावून जिल्हा हरित करण्यास  हातभार लावावा.  जागतिक तापमानवाढ, हवामान ऋतु बदल, वाढता दुष्काळ यावर एकमेव आणि नामी उपाय म्हणजे वृक्षलागवड. चला तर मग पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वजण एकत्र येवून 1 जुलै रोजीचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच निरंतर वृक्षारोपणासाठी सक्रिय होवूया...
-         संप्रदा द. बीडकर
-         माहिती अधिकारी, सांगली