शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

सांगली जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी उपायांना गती

सांगली, दि. 31, (जि. मा. का.): सांगली जिल्ह्यात टेंभू योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करून भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांना गती मिळाली आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या उरलेल्या कामांचा प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत समावेश झाला आहे. या कामांसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, कामे वेगाने होत आहेत.
कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी अनेक दिवसांपासून रखडलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी 1200 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. ही कामे एक वर्षात पूर्ण होतील, याची दक्षता घेण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा उपसा सिंचन योजनांसह महाराष्ट्रातील सर्व शासकीय उपसा सिंचनासाठी येणाऱ्या वीजबिलापोटी 19 टक्के रक्कम लाभधारकांकडून 81 टक्के रक्कम शासन देणार असल्याने या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाटबंधारे प्रकल्पासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे धोरणाच्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील टेंभू ताकारी म्हैसाळ उपसा सिंचना योजनांच्या वितरण प्रणालीची कामे बंदिस्त नलिकेद्वारे होणार असून, त्यामुळे प्रकल्पाच्या शेतजमीन संपादनात आणि खर्चात मोठी बचत होत आहे.
आतापर्यंत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत विसापूर उपसा सिंचन योजना, पुणदी उपसा सिंचन योजना, आटपाडी डावा कालवा सांगोला कालवा ही कामे प्रगतीत आहेत. विसापूर उपसा सिंचन योजनेमुळे 3 हजार 800 हेक्टर क्षेत्रास तर पुणदी उपसा सिंचन योजनेमुळे 3 हजार हेक्टर क्षेत्रास लाभ झाला आहे. टेंभू उपसा योजनेंतर्गत टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 तसेच विसापूर पुणदी योजनेची पंपगृहे पूर्ण झाली आहेत. टप्पा 4 वेजेगाव टप्पा 5 भूड येथील पंपगृहाची कामे प्रगतीपथावर आहेत. टेंभू योजनेच्या कालव्यांच्या एकूण 450 कि.मी. लांबी पैकी 287 कि.मी. कालवे पूर्ण होऊन प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पोहोचले आहे.प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जवळ जवळ 21 हजार 500 हेक्टर क्षेत्रास टेंभूच्या पाण्याचा लाभ मिळत आहे.
आटपाडी डाव्या कालव्यातून सुमारे 759 दशलक्षघनफूट पाणी सोडण्यात आले. यामुळे दुष्काळी आटपाडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई अंशत: दूर होवून सुमारे 2 हजार 800 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे.
सांगोला कालवा अंशत: कार्यन्वित करून दुष्काळी सांगोला तालुक्यातील विविध तलाव बंधाऱ्यात सुमारे 1 हजार 860 दशलक्षघनफूट इतके पाणी सोडण्यात आले. त्यामुळे आटपाडी सांगोला तालुक्यातील काही गावांना पाण्याचा सुमारे 9 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे.
राज्य शासनाने जिल्ह्यातील नागरी पाणी पुरवठा योजना आणि ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनांनाही बळ दिले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मणेराजुरी (स्वतंत्र) नळपाणी पुरवठा योजना, आरग नळपाणी पुरवठा योजना, वाघवाडी नळपाणी पुरवठा योजना या योजनांना आवश्यक निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाणी योजनांची ही सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
00000