शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

जिल्ह्यात एच.आय.व्ही. संसर्गित रूग्णांची संख्या घटतेय

एड्स म्हणजे "अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम" एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही पण एक शारिरीक स्थिती आहे. एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होवू शकते. एच. आय. व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होणे शक्य असते. त्यावर इलाज करणेही अवघड होते.    
मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच ए.आर.टी. सेंटर मध्ये उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात राहू शकतो. तसेच याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीही होणे आवश्यक आहे. या जनजागृतीमुळेच जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात एच.आय.व्ही. संसर्गित रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दहा वर्षापूर्वी सन 2008 मध्ये जिल्ह्यात एच.आय.व्ही. संसर्गित रूग्णांची संख्या 3 हजार 85 होती. ती ऑक्टोबर 2018 मध्ये 710 इतकी कमी झाली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे एक आशादायक चित्र आहे. तसेच सन 2008 मध्ये 146 गर्भवती माता एच.आय.व्ही. संसर्गित सापडल्या होत्या. ती संख्या घटून सन 2018 मध्ये 36 पर्यंत खाली आली आहे. जागतिक एड्सदिनानिमित्त या वर्षीचे घोषवाक्य 'तुमची स्थिती माहित करून घ्या' हे आहे. एच.आय.व्ही / एड्स प्रादुर्भाव प्रतिबंध या विषयावर जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या पुढील काळात जिल्ह्यातून एड्सचा समूळ नायनाट करण्यासाठी सर्वांनी सजग आणि जागरूक राहणे आवश्यक आहे.  
    एच.आय.व्ही. संसर्गित रूणांची संख्या घटण्याचेे सर्व श्रेय जिल्हाधिकारी वि. ना. काळम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जिल्हा एडस् प्रतिबंध नियंत्रण कक्षास जाते. सामान्य रूग्णांची एच.आय.व्ही. तपासणी करण्याबाबत जनजागृती झाल्यामुळे 2010 पासून जिल्ह्यात तपासणी  केलेल्या रूग्णांची संख्या प्रतिवर्षी वाढली आहे. मात्र एच.आय.व्ही. संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत प्रतिवर्षी लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.
    2010 साली जिल्ह्यामध्ये 37 हजार 320 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 213 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2011 मध्ये जिल्ह्यामध्ये 39 हजार 460 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 552 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2012 मध्ये जिल्ह्यामध्ये 41 हजार 922 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 211 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2013 मध्ये जिल्ह्यामध्ये 55 हजार 801 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 908 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2014 मध्ये जिल्ह्यामध्ये 67 हजार 759 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 580 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2015 मध्ये जिल्ह्यामध्ये 66 हजार 981 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 403 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2016 मध्ये जिल्ह्यामध्ये 74 हजार 337 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 146 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2017 मध्ये जिल्ह्यामध्ये 76 हजार 764 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 26 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले. 2018 मध्ये ऑक्टोबर अखेर जिल्ह्यामध्ये 65 हजार 947 सामान्य रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 710 रूग्ण एच. आय. व्ही. संसर्गित आढळले.
    गर्भवती मातांमध्येही एच.आय.व्ही. संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळल्यामुळे जिल्ह्याचे भविष्य सुरक्षित होण्याची आशा निर्माण झाली आहे. 2010 साली जिल्ह्यामध्ये 28 हजार 339 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 158 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. 2011 साली जिल्ह्यामध्ये 33 हजार गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 116 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. 2012 साली जिल्ह्यामध्ये 35 हजार 404 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 75 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. 2013 साली जिल्ह्यामध्ये 40 हजार 619 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 63 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. 2014 साली जिल्ह्यामध्ये 54 हजार 706 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 61 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. 2015 साली जिल्ह्यामध्ये 54 हजार 494 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 54 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. 2016 साली जिल्ह्यामध्ये 57 हजार 974 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 34 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. 2017 साली जिल्ह्यामध्ये 69 हजार 175 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 51 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या. चालू वर्षी ऑक्टोबर अखेर जिल्ह्यामध्ये 53 हजार 721 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 36 गर्भवती माता एच. आय. व्ही. संसर्गित आढळल्या.
    एच. आय. व्ही. ची लागण झालेल्या सर्व रूग्णांना मोफत ए.आर.टी. औषधे दिली जातात. एड्स हा पूर्णपणे बरा होणारा आजार जरी नसला तरी ए.आर.टी. औषधामुळे नियंत्रणात ठेवता येतो. या औषधोसोबत रूग्ण सामान्य जीवन जगू शकतो. नियमित चुकता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी ए.आर.टी. सेंटर आहेत. त्यामध्ये पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली (ओपीडी नं. 10), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (ओपीडी नं. 25), भारती मेडीकल कॉलेज रूग्णालय वानलेसवाडी, सांगली (ओपीडी नं. 10) आणि उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर यांचा त्यात समावेश आहे.

                              संप्रदा द. बीडकर
                               माहिती अधिकारी
                               सांगली