गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटस् बद्दलच्या जनजागृती मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ

ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् बद्दलच्या जनजागृती मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ
मतदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिकामध्ये सहभागी होवून
मशिनच्या विश्वासअर्हतेबद्दल खात्री करून घ्यावी
-         जिल्हाधिकारी वि. ना. काळम

    सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा पूर्व तयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने लोकांमध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिनबाबत निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वासअर्हता निर्माण करण्यासाठी या मशिनबद्दल प्रसिध्दी जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात या जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रारंभ झाला. ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिन ही मतदाराला त्यांने केलेल्या मतदानाची पडताळणी दाखविणारे, मतदानाबद्दल विश्वासअर्हता निर्माण करणारी यंत्रणा आहे. या बाबतची जनजागृती मोहिम अत्यंत सूक्ष्मपणे काटेकोरपणे राबवा. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा करू नका संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि काळजीपूर्व पार पाडा, असे निर्देश देवून नागरिकांनी या मोहिम कालावधीत प्रात्यक्षिकांमध्ये  मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून मशिनच्या विश्वासअर्हतेबद्दल खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    आगामी लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् वापरण्यात येणार आहेत. या अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम जिल्हाभर सर्व गावात सर्व मतदान केंद्रावर पुढील अंदाजित महिनाभर सुरू राहणार आहे. या मोहिमेच्या शुभारंभ जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वि. ना. काळम बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, सर्व तहसिलदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिनची सुरक्षा सुस्थिती याबाबत अत्यंत दक्ष रहावे असे सांगून संपूर्ण कार्यक्रम कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये करावा असे निर्देशही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले. यावेळी त्यांनी या जनजागृती मोहिमेसाठी जिल्ह्यात 17 टीम निर्माण करण्यात आल्याचे सांगून प्रत्येक गावामध्ये प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. मतदारांना त्यांनी केलेले मतदान त्याच उमेदवाराला दिलेले आहे हे याव्दारे दाखवून देवून ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् बद्दलची विश्वासअर्हता या जनजागृती मोहिमेतून निर्माण करण्यात येणार आहे. ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिन बद्दलचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. राजकीय पक्ष, पदाधिकारी, नागरिक यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिनच्या विश्वासअर्हतेबाबत खात्री बाळगावी विविध ठिकाणी होणाऱ्या प्रात्यक्षिका प्रसंगी उपस्थित राहून खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमा प्रसंगी संबंधित अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


रविवार, २३ डिसेंबर, २०१८

रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली दि. 23 (जि. मा. का.) : अनेक वर्षाच्या संघर्षानंतर वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेला चालना मिळाली असून ही योजना पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच या योजनेच्या जलपुजनासाठी येऊ विश्वास व्यक्‍ करुन  राज्यातील रखडलेल्या सर्व सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  
जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा शुभांरभ मौजे रेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिकेव्दारे वितरण होणार असल्याने प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल. मोठ्या प्रमाणावर जमीन ओलीताखाली येईल. असे सांगून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षापासून रखडलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पुढील सहा महिन्यात टप्प्या- टप्प्याने पूर्ण करण्यात येतील. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दिड लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या योजनांसाठी शेतकऱ्यांची हजारो एकर अधिग्रहीत करावी लागली असती ती बंदिस्त नलिकेव्दारे काम होणार असल्याने आता अधिग्रहीत करावी लागणार नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा शुभांरभाचा आजचा हा सुवर्ण दिवस हे याभागाचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कष्टाच्या व पाठपुराव्याचे फलीत आहे. या योजनेमुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. ही योजना बंदिस्त नलिकेव्दारे पुर्ण होणार असल्याने शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यालाही पाणी मिळेल, असे सांगून बंदीस्त नलिकेव्दारे पाणी होणार असल्याने भूसंपादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे.
राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, बळीराजा कृषी सिंचाई योजना या योजनामधून केंद्रातून 30 हजार कोटी रुपये आणण्यात आले आहेत. यातून महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. पूर्ण करण्यात येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्रिस्तरीय समित्या तयार करुन योग्य त्या बाबींना मान्यता देवूनच टेंडर प्रक्रीया करण्यात येत असल्याने पारदर्शकता आली आहे. प्रकल्पाच्या खर्चात बचत होत आहे.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळींब, द्राक्ष व फळपिके घेतात. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत आपला माल पाठवता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट तयार करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना येथून थेट विदेशात माल पाठविता येईल व त्यातून आर्थिक उन्नती होईल. चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मागणी करण्यात येत असलेली धरणाच्या खालील जागाही देण्यात येईल त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जिल्ह्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरु होत असल्याने सर्वांगिण विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या कामात ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत केली त्यांचे अभिनंदनही केले. 
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, राज्यातील रखडलेले जल सिंचनाचे प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करण्यात येत असून विविध 265 कामांना सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली आहे. टेंभू योजनेसाठी 5 हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कृषी सिंचाई योजनेमध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळी असल्याचे सांगून ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तेथून पाणी आणून या भागांना देण्यात येईल. वाकुर्डे उपसा सिंचन योजना एका वर्षात पूर्ण करण्यात येईल असे सांगून, त्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करुन दिला असे ते म्हणाले. यापुढे कालव्यांची सर्व कामे बंदीस्त पध्दतीने करण्यात येत असल्याने खर्चात बचत होईल  व पाण्याला गळीतीही लागणार नाही असे सांगून, चांदोली पर्यटन क्षेत्र विकासासाठी लागणाऱ्या जमीनबाबत  तातडीने निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
  आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, वाकुर्डे उपसा सिंचन योजना या भागाला वरदायी ठरणार असून यासाठी शासनाने भरीव निधी दिला आहे. या योजनेचा वाळवा,शिराळा,कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. यावेळी त्यांनी चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी. सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करावा व पुनवत येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी केली.
या कार्यक्रमात गुलाब पुष्प, पुस्तक व चांदीची तलवार देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक सुखदेव पाटील यांनी केले. आभार प्रसाद पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांसह परिसारातील शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.  
000000


ताकारी, म्हैसाळ, टेंभू प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर दुष्काळग्रस्तांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासन कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- टेंभूचे काम गेल्या 4 वर्षात 100 टक्क्यांवर पोहोचवले
- टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची रु. 4088.94 कोटीची सुप्रमा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
- ताकारीचे 13 हजार हे. म्हैसाळचे 42 हजार हे. आणि टेंभूचे 94 हजार हे. सिंचन बंदिस्त वितरिकेद्वारे
- राष्ट्रीय महामार्ग 20 हजार कि.मी. कामांना मंजुरी, त्यापैकी 7 हजार कि.मी.ची कामे पूर्ण
- धनगर समाजाला लवकरच आरक्षण देण्यास प्रयत्नशील
- बिरोबा मंदिर विकासासाठी 15 कोटींची घोषणा

सांगली दि. 23 (जि. मा. का.) : दुष्काळग्रस्तांना वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांना शासनाने गती दिली असून, टेंभूचे काम गेल्या 4 वर्षात 100 टक्क्यांवर पोहोचवले आहे. या योजनेचा चौथा टप्पा पूर्ण असून, पाचवा टप्पा पूर्णत्वाकडे आहे. 2019 पर्यंत कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत सिंचन योजना मुख्य कामे पूर्णत्वाची वचनपूर्ती आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत सांगली-सोलापूर मार्गावरील सांगली-बोरगाव-वाटंबरे-मंगळवेढा-सोलापूर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी महसूल, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, लाभक्षेत्र मंत्री गिरीष महाजन, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न औषध प्रसासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आणि रमेश शेंडगे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकार अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्यातील ताकारी - टेंभू आणि म्हैसाळ प्रकल्पाची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून जिल्ह्यातील दुष्काळी भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी रु. 4959.91 कोटीची तर टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची रु. 4088.94 कोेटीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ताकारी म्हैसाळ टेंभू 1042 कि.मी. लांबीचे कालवे आहेत, मागील 20 वर्षात त्यापैकी केवळ 500 कि.मी. चे कालवे झाले, मात्र गेल्या 4 वर्षात 400 कि.मी.ची कामे पूर्ण करून सिंचनाची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था दुष्काळी भागात निर्माण केली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कालव्यांऐवजी बंदिस्त वितरिकेव्दारे पाणी वितरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यामध्ये ताकारी प्रकल्पांतर्गत 13 हजार हे. म्हैसाळ प्रकल्पांतर्गत 42 हजार हे. आणि टेंभू प्रकल्पांतर्गत 94 हजार हे. सिंचन बंदिस्त वितरिकेव्दारे करण्यात येत आहे. पुढील 6 महिन्यात हे काम पूर्ण करून दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा संकल्प आहे. बंदिस्त वितरिकेव्दारे सिंचन व्यवस्था निर्माण केल्याने शेत जमीन अधिग्रहण थांबले आहे. तसेच योजनेचा 800 कोटींचा खर्च कमी झाला आहे. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेतील आगळगाव - जाखापूर उपसा सिंचन योजना, टप्पा 6 (अंकले) टप्पा 6 (खलाटी) उपसा सिंचन योजनेची संकल्पना ते प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यापर्यंतची कार्यवाही विक्रमी वेळेत पूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून पाण्याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा शासनाचा संकल्प आहे. दुष्काळी भागात पाण्याचा थेंब थेंब पोहोचेपर्यंत शासन शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळी काळात उपसा सिंचन योजनेद्वारे सांगली जिल्ह्यातील 250 तलाव भरून घेतले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणणार आहे. यासाठी  शासनाने 1 लाख सोलर पंप विकत घेतले असून ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यामुळे उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात ड्राय पोर्टचा प्रकल्प प्रस्तावित केला असून, त्यासाठी 250 हे.चा प्रस्ताव तयार आहे. त्यामुळे यापुढे द्राक्ष, डाळिंब, बेदाण्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शासनाने 5 वर्षात 50 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेतली असून, यामध्ये राष्ट्रीय महामार्गातंर्गत 20 हजार कि.मी. ची कामे हाती घेतली असून, यापैकी 7 हजार कि.मी.ची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, राज्य मार्गांच्या 10 हजार किलोमीटरच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 30 हजार किलोमीटर कामांचाही समावेश आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शासनाने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता मराठा आरक्षणाचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लवकरच देऊ. आरेवाडी बिरोबा मंदिर विकासासाठी 5 कोटी रूपये दिले असून, आणखीन 15 कोटी रूपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टेंभू - ताकारी योजना पूर्ण करून चार लाख एकर सिंचनाखाली आणणार - ना. नितीन गडकरी
टेंभू योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश केला असल्याचे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने पूर्ण करून सांगली सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील 4 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. शेतकऱ्यांनी ठिबकव्दारे सिंचन करून उत्पादनात वाढ करावी कारखानदारी उभारावी. राज्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत 108 प्रकल्प, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 28 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये सांगली, सोलापूर जिल्ह्यासाठी 3 हजार 500 कोटींची मान्यता दिली आहे. यामध्ये 25 टक्के निधी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 75 टक्के निधी नाबार्डकडून दिला जाईल. या योजनांना केंद्राकडून तात्काळ निधी उपलब्ध करून देवून, या योजना येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ताकारी टेंभूसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा पुढाकार आणि केंद्र शासनाचे सहकार्य यातून हे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील, असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्र गुजरात राज्यांत नदीजोड प्रकल्प राबवण्यास प्राधान्य दिले आहे. दमणगंगा पिंजर धरण बांधून पाणी गोदावरीत सोडून राज्याच्या काही जिल्ह्यांमधील शेती सिंचनाखाली आणली जाईल. याबरोबरच कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी विशेष प्रकल्प राबविला जाईल. मराठवाड्यातील धरणे बांधून दुष्काळी भागाला पाणी देणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तासाठी भरीव काम करून दुष्काळग्रस्तांना नवीन जीवन देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नामदार नितीन गडकरी म्हणाले, जिल्ह्यातील 10 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. त्यापैकी 7 हजार 114 कोटींच्या कामाची सुरूवात आज केली आहे. अहोरात्र काम करून ही कामे येत्या मार्चपर्यंत पूर्ण केली जातील. मिरज शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रूपये तरतूद या कार्यक्रमात त्यांनी जाहीर करून, तसे आदेशही महापौर संगिता खोत यांच्याकडे सुपूर्द केले. यासह मिरज इस्लामपूर अन्य मार्गाची 1700 कोटींची कामे मंजूर केली आहेत. आता प्रशासनाने रस्त्यांच्या बाजूंच्या नद्या-नाल्यांच्या खोलीकरण रूंदीकरणाचा भरीव कार्यक्रम हाती घेवून रस्ते विकासाबरोबरच नद्या-नाल्यांमध्ये पाण्याचा साठा करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी सांगली सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प हाती घ्यावा, असे त्यांनी सूचित केले.
यापुढे शेतकऱ्यांनी ऊस पीक तसेच, साखर निर्मितीला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यावा, असे आवाहन करून श्री. गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब आणि बेदाण्यांाना आंतरराष्ट्रीय बाजारपेठा निर्माण व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यात ड्राय पोर्ट निर्माण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी लागणारा 800 ते 1000 कोटी रूपयांचा निधी जेएनपीटीच्या माध्यमातून दिला जाईल. राज्य शासनाने यासाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून द्यावी, असे ते म्हणाले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राज्यात गेल्या चार वर्षांत पाटबंधारे प्रकल्पांच्या कामांना गती दिली असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ताकारी - टेंभू - म्हैसाळच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत या योजनेचा समावेश केला असून, लवकरात लवकर ही कामे पूर्ण केली जातील. केंद्र राज्य शासनाने अनेक प्रलंबित योजना मार्गी लावल्या आहेत. तर शेतकरी हिताच्या योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. कर्जमाफी, मराठा आरक्षण असे महत्त्वपूर्ण प्रश्नही शासनाने मार्गी लावले आहेत.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दिवंगत माजी मंत्री शिवाजी बापू शेंडगे यांना अभिवादन केले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम आणि अतुलकुमार यांनी स्वागत केले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविकात राज्य केंद्र शासनाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी राबवलेल्या योजना दिलेल्या निधीचा उहापोह केला. सूत्रसंचालन विजय कडणे, श्वेता हुल्ले यांनी केले. या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000