रविवार, १६ डिसेंबर, २०१८

दुष्काळग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास राज्य शासन सकारात्मक - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकरी आणि सामान्य माणसाच्या पाठिशी खंबीरपणे आहे. दुष्काळग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. सर्व शासकीय यंत्रणांनीही दुष्काळ ही काम करण्याची संधी मानून जागरूकपणे आणि परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.
जत येथे आयोजित दुष्काळी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जतचे आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती तमन्नगौडा रवी पाटील, पंचायत समिती सभापती सुशीला तावशी, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, विक्रम पाटील यांच्यासह संबधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत जत तालुक्यात पाणंद रस्ते तयार करण्यास प्राधान्य द्यावे, त्यामुळे रोजगार उपलब्धी होईल आणि विधायक कामही होईल, असे सांगून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, राष्ट्रीय पेयजल योजनेतून जत तालुक्यात 23 योजना मंजूर आहेत. यातील अपूर्ण पाणी योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. निधी वर्ग करूनही जी कामे अपूर्ण राहिली आहेत, त्यांच्यासाठी समिती नेमून चौकशी करू. दुष्काळी काळात पाण्याचे टँकर, विंधन विहिरी, रोजगार हमी योजनेची कामे, चारा छावण्या अशा अनेक स्तरांवर मदत देण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील अशा ग्रामस्तरीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी सूचित केले.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, महसूल विभागाने शासन आपल्या दारी ही मोहीम राबवत गावागावात महाराजस्व अभियान राबवावे. नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात. जीर्ण शिधापत्रिका बदलून द्याव्यात. त्याचबरोबर वारस नोंदी, विविध दाखले, अन्य सामाजिक सहायता योजनांचा लाभ आदी बाबी हाती घ्याव्यात. भविष्य काळात चारा छावण्यांची गरज पडली तर तसा अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले. जत तालुक्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय, तसेच सीमा भागातील गावांच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, आदी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील दुष्काळी सद्यस्थितीची माहिती दिली. यामध्ये पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे, चारा छावण्यांची गरज, चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांसह शेळ्या-मेंढ्यांचा समावेश, पूर्वीच्या कामांची थकित देयके, शेततळे अनुदानात वाढ यांचा समावेश होता.
यावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी सद्यस्थिती विषद केली. जिल्हा परिषद सदस्या रेखा बागेळी, प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांनी विविध मुद्दे मांडून दुष्काळी परिस्थितीत उपाययोजना करण्याची मागणी केली. यामध्ये टँकर मागणी, हातपंप दुरुस्ती, निधीअभावी प्रलंबित देयके, अपूर्ण पाणी योजना, चारा छावण्या यांचा समावेश आहे.
यावेळी पाणीपुरवठा, कृषी, भूजल सर्वेक्षण, बांधकाम विभाग यांच्यासह जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
डफळापूर येथे जलपूजन
दरम्यान पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते डफळापूर पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी डफळापूर येथील काही ग्रामस्थांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेवून गावचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत निवेदन दिले होते. मंजूर असलेली ही योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली होती. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत राज्यमंत्री श्री. खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. यानुसार काम सुरू होवून या योजनेचे पाणी संबंधित गावाला मिळाले आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या दुष्काळ दौऱ्यावर असताना स्थानिक ग्रामस्थांच्या विनंतीला मान देवून राज्यमंत्री श्री. खोत यांनी हे जलपूजन केले.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा