शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

सुदृढ आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा - मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) :  कबड्डी हा खेळ महाराष्ट्राचा खेळ आहे. महाराष्ट्राला कबड्डी, मैदानी खेळाचा वारसा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून आहे. तेंव्हापासून हे खेळ खेळले जातात. सुदृढ आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मृद जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
    इस्लामपूर येथील जयंत पाटील खुले प्रेक्षकगृह येथे 20 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मृद जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री विद्यमान आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, क्रिडा युवक सेवा संचालनालय कोल्हापूर विभागाचे उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, छत्रपती पुरस्काराच्या मानकरी ऑलम्पिक धावपट्टू ललिता बाबर आदि मान्यवर उपस्थित होते.
    जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, स्वस्थ सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानी खेळांविषयी तरूणांमध्ये प्रेरणा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. खेळामध्ये हार-जीत महत्त्वाची नसून खिलाडू वृत्ती महत्त्वाची आहे. इस्लामपूर येथे होत असलेल्या या स्पर्धेतून जाताना प्रत्येक संघ जिंकण्याची प्रेरणा घेवून जातील असे सांगून त्यांनी चांगल्या कामगिरीसाठी सर्व संघाना शुभेच्छा दिल्या.
    यावेळी माजी मंत्री विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी सहभागी खेळाडूंना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असून ही स्पर्धा सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच ऑलम्पिक धावपट्टू ललिता बाबर यांनी अशा स्पर्धांमधून उत्कृष्ट खेळाडू घडतील आणि ते देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवतील अशी आशा व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
    प्रारंभी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच त्यांनी मैदानाचे पूजन करून खेळाडूंची ओळख करून घेतली खेळाडूंना शुभेच्छा देवून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
प्रास्ताविक क्रिडा युवक सेवा संचालनालय कोल्हापूर विभागाचे उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमास सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, ज्येष्ठ साहित्यीक दि. बा. पाटील, राहुल महाडीक, सागर खोत यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा