गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटस् बद्दलच्या जनजागृती मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ

ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् बद्दलच्या जनजागृती मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ
मतदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिकामध्ये सहभागी होवून
मशिनच्या विश्वासअर्हतेबद्दल खात्री करून घ्यावी
-         जिल्हाधिकारी वि. ना. काळम

    सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा पूर्व तयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने लोकांमध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिनबाबत निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वासअर्हता निर्माण करण्यासाठी या मशिनबद्दल प्रसिध्दी जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात या जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रारंभ झाला. ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिन ही मतदाराला त्यांने केलेल्या मतदानाची पडताळणी दाखविणारे, मतदानाबद्दल विश्वासअर्हता निर्माण करणारी यंत्रणा आहे. या बाबतची जनजागृती मोहिम अत्यंत सूक्ष्मपणे काटेकोरपणे राबवा. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा करू नका संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि काळजीपूर्व पार पाडा, असे निर्देश देवून नागरिकांनी या मोहिम कालावधीत प्रात्यक्षिकांमध्ये  मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून मशिनच्या विश्वासअर्हतेबद्दल खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    आगामी लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् वापरण्यात येणार आहेत. या अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम जिल्हाभर सर्व गावात सर्व मतदान केंद्रावर पुढील अंदाजित महिनाभर सुरू राहणार आहे. या मोहिमेच्या शुभारंभ जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वि. ना. काळम बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, सर्व तहसिलदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिनची सुरक्षा सुस्थिती याबाबत अत्यंत दक्ष रहावे असे सांगून संपूर्ण कार्यक्रम कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये करावा असे निर्देशही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले. यावेळी त्यांनी या जनजागृती मोहिमेसाठी जिल्ह्यात 17 टीम निर्माण करण्यात आल्याचे सांगून प्रत्येक गावामध्ये प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. मतदारांना त्यांनी केलेले मतदान त्याच उमेदवाराला दिलेले आहे हे याव्दारे दाखवून देवून ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् बद्दलची विश्वासअर्हता या जनजागृती मोहिमेतून निर्माण करण्यात येणार आहे. ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिन बद्दलचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. राजकीय पक्ष, पदाधिकारी, नागरिक यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅटस् मशिनच्या विश्वासअर्हतेबाबत खात्री बाळगावी विविध ठिकाणी होणाऱ्या प्रात्यक्षिका प्रसंगी उपस्थित राहून खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमा प्रसंगी संबंधित अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा