बुधवार, ३० जानेवारी, २०१९

कृषि यांत्रिकीकरण - एक सुवर्णसंधी आर्थिक बचत, कामेही वेळेवर

उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यात कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम कृषि विभाग करत आहे. शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना कृषि विभागामार्फत राबवल्या जातात. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्य शासन उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम राबवत आहे.
राज्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीन धारणा, बैलांची लक्षणीयरीत्या कमी झालेली संख्या, शेतमजुरांची घटलेली संख्या, वाढते मजुरीचे दर, खरीप हंगामात पेरणीसाठी मिळणारा अल्प कालावधी राज्यातील पिकांमध्ये, फळबागांमध्ये असलेली विविधता या पार्श्वभूमिवर स्थानिक परिस्थितीनुरूप कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, चाफकटर, ब्लोअर, पावर विडर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र आदि प्रकारची कृषि अवजारे/उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र हिस्सा 60 टक्के राज्य हिस्सा 40 टक्के या प्रमाणात अर्थसहाय्य देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेऊन अनेक लाभार्थांनी आर्थिक तसेच वेळेची बचत केली आहे. याबाबत तासगाव तालुक्यातील मौजे मतकुणकी येथील जयवंत मार्तंड चव्हाण आणि मौजे वडगाव येथील विजय बाबासो पाटील, खानापूर तालुक्यातील मौजे नागेवाडी येथील जयंत बाळासो सोंडे, पलूस तालुक्यातील मौजे कुंडल येथील महादेव नामदेव लाड यांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या चारही लाभार्थींना शेत मशागतीसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता भासत असे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी कृषि यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेची माहिती मिळाली. या योजनेंतर्गत त्यांनी ट्रॅक्टरसाठी अर्ज केला. लकी ड्रॉ पध्दतीने त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला.
जयवंत मार्तंड चव्हाण (मौजे मतकुणकी, ता. तासगाव) यांची एकूण 2.61 हेक्टर शेती आहे. त्यापैकी 1 हेक्टर क्षेत्रावर ऊस, भाजीपाला आहे. त्यानुसार त्यांनी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला. अर्ज केल्यानंतर त्यांना एक लाख रुपये अनुदान मिळाले.
जयंत बाळासो सोंडे (मौजे नागेवाडी, ता. खानापूर) यांची एकूण 1.10 हेक्टर शेती आहे. त्यापैकी 0.80 हेक्टर क्षेत्रावर ऊस, भाजीपाला आहे. त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला त्यांना रक्कम रूपये 1 लाख 25 हजार अनुदान मिळाले.
विजय बाबासो पाटील (मौजे वडगाव, ता. तासगाव) यांची एकूण 0.67 हेक्टर शेती आहे. त्यापैकी 0.50 हेक्टर क्षेत्रावर ऊस, भाजीपाला आहे. त्यांनी मित्सुबिशी कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला. त्यांना प्रस्ताव सादर केल्यानंतर 75 हजार रुपये अनुदान मिळाले.
हे लाभार्थी यापूर्वी मशागतीसाठी भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टरचा वापर करत होतो. परंतु, गरजेवेळी ट्रॅक्टर उपलब्ध होत नसल्याने त्यांना अडचणी येत होत्या. वेळेत मशागतीची कामे झाल्याने परिणामी उत्पन्नात घट येत होती. ट्रॅक्टरचा वापर केल्यामुळे मला वेळेत मशागत करणे शक्य झाले. तसेच, गावातील इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर मशागत करून दिल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यांना चारच महिन्यांमध्ये जवळपास 25 हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला. शासकीय अनुदानावर ट्रॅक्टर उपलब्ध झाल्यामुळे आर्थिक बचत झाली. कामे वेळेवर झाली.
महादेव नामदेव लाड (मौजे कुंडल, तालुका पलूस) यांचे गट नं 518, 884, 871, 710 मध्ये 1.65 हे क्षेत्र आहे. त्यामध्ये 1.60 हे क्षेत्रावर द्राक्ष बाग आहे. त्यांनी सन 2017-18 मध्ये कृषि विभागामार्फत कृषि यांत्रिकीकरण योजनेतून 20 एच. पी.पेक्षा कमी अश्वशक्तीचा ट्रॅक्टर घेतला. त्यांना 95 हजार 62 रुपये अनुदान मिळाले.
याबाबत महादेव लाड म्हणाले, ट्रॅक्टर घेण्यापूर्वी आम्ही द्राक्षबागेला फवारणीसाठी एच. टी. पी. पंप वापरत होतो. त्यासाठी 4 ते 5 मजूर औषध फवारणीसाठी लागत असत. त्यामुळे माझा वेळ खर्च वाया जात होता. ट्रॅक्टर खरेदी केल्यापासून आता आम्ही ट्रॅक्टर चलित ब्लोअरद्वारे फवारणी करू लागलो. त्यामुळे औषध मजुरांची बचत झाली. तसेच कमी पाण्यात फवारणी होऊ लागली. त्यामुळे खर्च वेळेची बचत झाली. यामुळे कमी वेळेत जास्त क्षेत्रात फवारणी करणे शक्य झाले. त्याचप्रमाणे द्राक्ष बागेतील आंतर मशागतीची कामे तसेच खताची वाहतूक करणे सोपे झाले. द्राक्ष काढणीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करून द्राक्ष पॅकिंगसाठी द्राक्ष बागेतून वाहतूक करणे सोयीचे झाले.
 एकूणच शासकीय अनुदानावर ट्रॅक्टर उपलब्ध झाल्यामुळे आर्थिक बचत झाली. तसेच, वेळेवर कामे औषध फवारणी करणे इ. कामे शक्य झाली. त्यामुळे उत्पन्न खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे कृषि  यांत्रिकीकरण योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. त्यांच्यासाठी कृषी यांत्रिकीकरण ही एक सुवर्ण संधी बनून आली आहे. 

वर्षा पाटोळे
जिल्हा माहिती अधिकारी

  सांगली