रविवार, ३१ मार्च, २०१९

वीज, वादळी पाऊस आपत्तीपासून करा बचाव


वीज, वादळी पाऊस आपत्तीपासून करा बचाव
  
        वीज कोसळणे, वादळी पाऊस इत्यादी आपत्तीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने काय करावे काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या आपत्तीपासून संरक्षण करण्याकरिता नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयीचा हा लेख -
        काय करावे - तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरित आसरा शोधा. इमारत हा सुरक्षित आसरा आहे; पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडीसारख्या भागात आश्रय घ्या. झाडे यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे स्वत:कडे विजेला आकर्षित करतात. तुम्हाला आसरा मिळाला नाही, तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा, जमिनीवर वाका किंवा वाकून बसा. घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा ! जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा. लक्षात ठेवा - विजेचा प्रकाश आणि आवाज यातील अंतर जितके सेकंद असेल, त्याला तीनने भागले असता वीज ज्या ठिकाणी कोसळली तिथपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये अंदाजे कळू शकते. जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल, तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर राहा. उदा - धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ, ओल्या जागा आणि टेलिफोन. पाण्यातून तत्काळ बाहेर या, छोट्या नावेतून पाण्यातून जात असाल तरीही. जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील; तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
        काय करू नये - विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. जसे की हेअर ड्रायर, विद्युत टूथब्रश किंवा विद्युत रेझर. जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. वादळात टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहू शकते. बाहेर असताना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.
        विजा चमकत असताना सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बंदिस्त इमारत. सहलीसाठीचे तंबू किंवा पडवी नाही. दुसरे सुरक्षित ठिकाण म्हणजे धातूचे बंदिस्त वाहन. जसे चारचाकी गाडी, ट्रक, व्हॅन इत्यादी पण मोटरसायकल किंवा हलक्या छताची वाहने नाहीत. जर वाहनात आसरा घेतला असेल, तर दारे, खिडक्या पूर्ण बंद आहेत याची खात्री करा. सुरक्षित इमारत म्हणजे ज्याला भिंती, छप्पर, फरशी असेल. जसे की घर, शाळा, कार्यालयाची इमारत किंवा बाजाराच्या इमारती. जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात किंवा पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो, तेव्हाच सुरक्षित आसरा शोधा. उंच, एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे कदाचित कोरडे राहाल, पण विजेमुळे होणाऱ्या हाणीची शक्यता तिथेच जास्त असते. पावसामुळे मृत्यू होणार नाही, पण विजेमुळे होऊ शकेल. अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.
        वीज ही नेहमी कोणत्याही ठिकाणाच्या सर्वात उंच जागेवर कोसळते. शक्यतो धातूच्या वस्तूंवर - जेवढी मोठी धातूची वस्तू तेवढी - वीज कोसळण्याची शक्यता जास्त. शक्यतो मोकळ्या जागेवरील किंवा डोंगराच्या उंचावरील भागात असलेल्या एकाकी झाडाचा आसरा घेणे टाळा. झाडाच्या पसरलेल्या फांद्याखाली उभे राहणे हे तर जास्ताच धोकादायक. सर्वच प्रकारची झाडे धोकादायक असतात. जेवढे झाड उंच, तेवढा धोका अधिक, एकाकी             झाडाएवढाच काही झाडांचा छोटा समूहही तेवडाच धोकादायक असतो. झाडाजवळ उभे राहिल्याने झाडावरील विजेचा झोत हा शेवटी जवळ असलेल्या व्यक्तीकडेच येतो.
        जर जंगलात असाल तर शक्यतो कमी उंचीच्या झाडीमध्ये लपण्याचा प्रयत्न करा. मोकळ्या जागेत असाल तर शक्यतो कडे-कपारीमध्ये आसरा मिळवा. अचानक येऊ शकणाऱ्या पुरापासून सावध राहा. जर तुमच्या आसपास अथवा कोणा व्यक्तीवर वीज पडली तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बाधित व्यक्तीला प्राथमिक उपचार करताना पुढील गोष्टींचा विचार करा - श्वासोच्छवास जर थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरीत्या सुरू होण्यास मदत होईल. हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल आणि श्वासोच्छवास चालू असेल तर इतर काही जखमा, अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडाच्या इजा याबाबत तपासणी नोंद करा. दृष्टी ठीक आहे ना ऐकू येत आहे ना, इतर हालचाली यांची नोंद घ्या.
       
                                        संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, सांगली