सोमवार, ८ एप्रिल, २०१९

44-सांगली लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार निवडणूक लढवणार, 8 उमेदवारांची माघार उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतली असून आता 12 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी माघार घेतली असून 12 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या उमेदवारांना आज चिन्ह वाटप करून आदर्श आचारसंहितेबाबतच्या, खर्च विषयक बाबींच्या सूचनाही देण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे, त्यांचा पक्ष त्यांना दिलेले निवडणूक चिन्ह अनुक्रमे पुढीलप्रमाणे - (1) शंकर (दादा) माने, बहुजन समाज पार्टी, हत्ती, (2) संजयकाका पाटील, भारतीय जनता पार्टी, कमळ, (3) आनंद शंकर नालगे (पाटील), बळीराजा पार्टी, जेवणाचे ताट, (4)  गोपीचंद कुंडलीक पडळकर, वंचित बहुजन आघाडी, कप आणि बशी, (5) डॉ. राजेन्द्र नामदेव कवठेकर, बहुजन मुक्ति पार्टी, खाट, (6) विशाल प्रकाशबापू पाटील, स्वाभिमानी पक्ष, बॅट, (7) अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले, अपक्ष, दूरदर्शन, (8) आधिकराव संपत चन्ने, अपक्ष, गॅस शेगडी, (9) दत्तात्रय पंडीत पाटील, अपक्ष, सायकल पंप, (10) नारायण चंदर मुळीक, अपक्ष, हेलीकॉप्टर, (11) भक्तराज रघुनाथ ठिगळे, अपक्ष, टेबल, (12) हिंमत पांडुरंग कोळी, अपक्ष, शिट्टी.
उमेदवारी माघारी घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे - (1) अजितराव राजाराम पाटील, (2) राजेंद्रप्रसाद गणपतराव जगदाळे, (3) प्रा. अंकुश विठोबा घुले, (4) ऋषिकेश दिगंबर साळुंखे, (5) नानासो बाळासो बंडगर, (6) अशोक ज्ञानू माने, (7) अल्लाऊद्दीन हयातचांद काझी, (8) सचिन मनोहन वाघमारे.
सांगली जिल्ह्यात 2474 मतदान केंद्रे असून 44-सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 1848 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये क्रिटीकल मतदान केंद्रे 29 आहेत तर 247 मतदान केंद्रांवर वेबकास्टींग लावण्यात येणार आहे. ज्या मतदान केंद्रावर महिला अधिकारी महिला कर्मचारी आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक मतदान केंद्र असेल. तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक आदर्श मतदान केंद्र असेल. दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे अनिवार्य असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची दुसरी सरमिसळ दिनांक 10 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. मतदानासाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन पूर्ण क्षमतेने प्राप्त झाल्या असून कंट्रोल युनिट बॅलेट युनिट 125 टक्के तर व्हीव्हीपॅट 130 टक्के वाटप करण्यात येणार आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा