शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

सुदृढ लोकशाहीसाठी निर्भयपणे मतदान करा - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


मतदार जनजागृतीसाठी रन फॉर व्होट रॅली उत्साहात

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : चांगल्या आरोग्यासाठी धावणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे चांगल्या, सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या 23 एप्रिलला सर्वांनी मुक्त आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी आयोजित रन फॉर व्होट उपक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, आंतरराष्ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडु ललिता बाबर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, स्वीपच्या नोडल अधिकारी मौसमी बर्डे - चौगुले, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे आदि उपस्थित होते.
ललिता बाबर म्हणाल्या, लोकशाहीसाठी, आपल्या देशासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने येत्या 23 तारखेला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच, रॅलीत सहभागी सर्वांनी याबाबत जनजागृती करावी. जेणेकरून सांगली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडु ललिता बाबर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. पुष्कराज चौकातून सुरुवात होऊन, मार्केट यार्ड - बापट मळा (महावीर उद्यान) - चांदणी चौक - गुलमोहर कॉलनी - त्रिकोणी बाग - सिव्हील चौक - राम मंदिर कॉर्नर या मार्गे ही रॅली निघून पुन्हा पुष्कराज चौक येथे विसर्जित झाली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल गावडे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सचिन कवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले.
00000







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा