बुधवार, २९ मे, २०२४
पशुधनाचे ईअरटॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक
सांगली दि. 29 (जि.मा.का.) : पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होवून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच पशु व पशुजन्य उत्पादन वाढीसाठी राज्यातील सर्व पशुधनाचे ईअरटॅगिंग करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुधनास ईअरटॅगिंग बंधनकारक करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर प्रविष्ट होण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांना सूचित करण्यात येते की, येत्या 1 जून नंतर ईअरटॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/ दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
सर्व महसूल, वन, वीज व महावितरण विभाग यांना सूचित करण्यात आले आहे की, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअरटॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.
कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअरटॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर उचित कायदेशीर /दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. दिनांक 1 जून पासून ईअरटॅग नसलेल्या पशुधनाची, बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी-विक्री व बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअरटॅग नसलेले पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, महसूल / गृह विभाग यांनी ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देवू नये. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा (Owner Transfer) बाबतच्या नोंदी संबधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्यावत करून घेण्याची जबाबदारी संबधित पशुपालकाची राहील.
ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देतांना पशुधनाची ईअरटॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअरटॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा , या आदेशात नमुद सुचनांची व पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यातील पोलीस विभाग, वनविभाग, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद/ नगरपंचायत, ग्रामपंचायत), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व संबंधित प्रशासकिय विभागांनी काटेकोरपणे करावी. तसेच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
000000
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम पार पाडावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
सांगली दि. 29 (जि.मा.का.) :- मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अचूकतेने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
44-सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून 2024 रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. या निमित्ताने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुखसे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने आतापर्यंत सर्वांच्या सहकार्याने चांगले काम केले आहे. मतमोजणीचे कामही अत्यंत चांगल्या पध्दतीने होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरास प्रतिबंध असल्याने कोणीही सोबत मोबाईल वा स्मार्ट वॉच सोबत ठेवू नये.
मतमोजणीचे काम सुरळीतपणे व्हावे. या कामात अचूकता महत्त्वाची असल्याने संबधित अधिकारी, कर्मचारी यांनी हे काम सचोटीने करावे. मतमोजणीच्या कामाचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी कोणतेही दडपण घेऊ नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.
उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात आणि उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सादरीकरणाद्वारे मतमोजणी प्रक्रिया संदर्भात यावेळी सविस्तर माहिती दिली.
०००००
बुधवार, १५ मे, २०२४
आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 15 (जिमाका) : यंदा हवामान विभागाने सुमारे 106 टक्के इतका पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला आहे. सांगली जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता, पूरस्थितीमध्ये संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावे, जेणेकरून नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफसह मंत्रालय (मुंबई) येथील अधिकारी श्री. सुमितकुमार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच मोबाईल बंद ठेवू नये. जिल्ह्यात यदाकदाचित पूर परिस्थिती निर्माण झाली तर व्यक्तिंच्या पुनर्वसनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर निवारा केंद्रामध्ये एकत्र कुटुंब कसे राहील याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. शासकीय कार्यालयातील दप्तर पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामा महसूल यंत्रणेने वेळेत व अचूक करावा. आर. टी. ओ. ने तहसीलनिहाय पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, तसेच ड्रायव्हर यांची अद्यावत यादी तयार करावी तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये निवृत्त सैनिकांसह एनसीसी विद्यार्थ्यांची बचत कार्यात मदत घ्यावी. पूर परिस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या बोटींची तपासणी त्वरित करावी. त्याचबरोबर धोकादायक इमारतींचेही ऑडिट करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीकरता पोलीस प्रशासन सज्ज असून आवश्यकता भासल्यास बाहेरून अतिरिक्त मदत घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी बोलताना दिली. तत्पूर्वी श्री. नदाफ यांनी आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आढाव्याचे सादरीकरण केले. जिल्हा परिषद, मनपा तसेच पाटबंधारे विभागाने केलेल्या उपाय योजनांबाबत विभाग प्रमुखांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली - 2024' या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रांतधिकारी, तहसिलदार, न.पा. मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी - कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
शनिवार, ४ मे, २०२४
निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा सूक्ष्म आढावा
निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या यंत्रणांनी अधिक सतर्क व दक्ष रहावे
सांगली, दि. 4 (जि.मा.का.) : सांगली लोकसभा मतदार संघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. उद्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्यानंतरचा कालावधी महत्वाचा आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी अधिक सर्तक व दक्ष रहावे, अशा सूचना ४४-सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत निवडणूक जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिल्या. या बैठकीस निवडणूक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार कालावधी संपल्यानंतर राज्य व जिल्हा सीमा नाक्यांवर संशयित वाहनांची कडक तपासणी करण्यात यावी. यासाठी एसएसटी व एफएसटी पथकांनी दक्षता घ्यावी व निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आपणांस दिलेले कर्तव्य बजावावी, अशा सूचना जनरल निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी दिल्या.
मतदान संपण्यापूर्वी शेवटचे ७२ तास, ४८ तास आणि २४ तास महत्वाचे आहेत. या कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणेने गस्ती पथकामार्फत रात्रीचे पेट्रोलिंग वाढवावे, अशा सूचना निवडणूक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिल्या. या काळात कम्युनिटी हॉल, मंगल कार्यालये, लॉज, गेस्टहाऊसची कसून तपासणी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार कालावधी संपल्यानंतर होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी गठित पथकांनी जागरूक व दक्ष रहावे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्था संदर्भात माहिती दिली.
०००००
शुक्रवार, ३ मे, २०२४
मतदार संघाबाहेरील प्रचार कार्यकर्त्यांनी ५ मे नंतर सांगली लोकसभा मतदार संघात थांबू नये - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. ३ (जि.मा.का.) :- सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात आणि नि:पक्षपातीपणे पार पडण्याच्या दृष्टीकोनातून भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाबाहेरील मतदार संघातून आलेले राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, सभेचे कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते की, जे या मतदार संघातील मतदार नाहीत अशा व्यक्तींनी दि. ५ मे रोजी सांयकाळी ६ वाजलेनंतर मतदारसंघाबाहेर स्व:ताहून निघून जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यासाठी दि ७ मे रोजी मतदान होत असून निवडणूक प्रचाराचा कालावधी दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात फिरती पथके (फ्लांईग स्क्वाडस्) व स्थिर संनिरिक्षण (एस.एस.टी) अधिक दक्ष असून 50,000 रुपये पेक्षा जास्त रक्कम किंवा मौल्यवान धातू, सोने, चांदी / भेटवस्तू, जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींनी सदर मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे जवळ बाळगावीत,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
उमेदवार व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे
मतदानाच्या अगोदर तीन दिवसापासून मतदान समाप्त होण्यापूर्वीच्या ४८ तासापर्यंत उमेदवाराच्या प्रचार मोहिमेची तीव्रता वाढत असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कल्याण मंडप, कम्युनिटी हॉल, मंगल कार्यालये, लॉज, गेस्टहाऊसची कसून तपासणी करणेबाबतचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मतदारसंघाच्या हद्दीवरील चेक पोस्टच्या माध्यमातून सांगली जिल्हयामध्ये कार्यरत फ्लांईग स्क्वाडस् व एस.एस.टी.पथकाच्या माध्यमातून मतदार संघात येणा-या वाहनांची तसेच कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह मतदार संघातील असलेची खात्री करणेसाठी ओळखपत्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने लाच देणे-घेणे, उमेदवारांना, मतदारांना, कोणत्याही व्यक्तीला इजा पोहचवणे, धमकावणे भारतीय न्याय संहितेच्या कलम 171 बी व कलम् 171 सी नुसार गुन्हा असून असे गुन्हे करणारी व्यक्ती, दोन वर्षांपर्यंतचा तुरूंगवास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा याप्रमाणे शिक्षेस पात्र असेल. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. निवडणुकीचे अनुषंगाने, लाच देण्या - घेण्याबाबत, धमकावल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर नागरिकांनी त्वरीत 1800 233 1801 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दयावी तसेच cVIGIL ॲपवर फोटो/व्हिडीओसह तक्रार दाखल करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाच्या mcc.sangli@gmail.com या मेल आयडीवरही तसेच, 0233 – 2600185 या दुरध्वनी व 1950 या टोल फ्री क्रमांकावर देखील तक्रार दाखल करता येईल. नागरिकांना जिल्हास्तरावरील तक्रार नियंत्रण कक्ष (24×7) येथेही समक्ष तक्रार दाखल करता येईल .
मतदान करण्याचे आवाहन
जिल्ह्यात येत्या ७ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही समृद्ध करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
०००००
सायकल रॅलीतून मतदार जागृती
सांगली (जि.मा.का.) दि. 3 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आज सांगली शहरातून सायकल रॅली काढून मतदार जागृती करण्यात आली. विश्रामबाग चौक येथून सुरू करण्यात आलेल्या या सायकल रॅलीस जिल्हास्तरीय स्वीप समितीचे नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
जिल्हा प्रशासन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेली ही सायकल रॅली विश्रामबाग चौकातून शंभर फुटी रोड, कोल्हापूर रोड(आकाशवाणी) एस.टी.स्टँड, मारूती चौक, हरभट रोड, टिळक चौक्, गणपती मंदिर, पटेल चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोड मार्गे जाऊन शिवाजी स्टेडीयम येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.
०००००
बीएलओंनी घरोघरी भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली (जि.मा.का.) दि. 3 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बीएलओंनी घरोघरी भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
स्वीप उपक्रमांतर्गत सुरू आलेल्या उपक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज आढावा घेतला. या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, जिल्हास्तरीय स्वीप समितीचे नोडल अधिकारी व सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी म्हणाले, जिल्ह्यात लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढून जिल्ह्याचा वेगळा आदर्श निर्माण व्हावा. मतदान टक्केवारी वाढीसाठी घंटा गाडीवरून मतदार जागृती करावी. संकल्प पत्राचे वाटप करावे. मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट लावावेत.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यांनी गट विकास अधिकारी यांचेकडून दिव्यांग मतदारांसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हीलचेअर बाबतचाही आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
०००००
मतदान प्रक्रिया सुरळीत व सुलभ होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा
सांगली (जि.मा.का.) दि. 3 :- 44- सांगली लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे रोजी मतदान होत असून मतदान प्रक्रिया सुलभ, सुरळीत आणि निर्भयपणे पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांची भूमिका महत्त्वाची आहे. मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. यामुळे त्यांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदान केंद्रावरील सुविधांबाबतही आढावा घेतला. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर, पाणी व सावलीची सोय, आरोग्य विषयक अत्यावश्यक कीट उपलब्धता, मतदान केंद्रांवरील वेब कास्टिंग, वाहतूक आराखडा यासह मतदान केंद्रांवरील कर्मचारी वाहतूक व्यवस्था, रूट नुसार पार्किग या बाबींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
०००००
मतदान व मतमोजणी दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलले
सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान मंगळवार, दि. 7 मे व मतमोजणी मंगळवार, दि 4 जून रोजी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी एकूण 40 गावात आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान व मतमोजणी सुस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. मार्केट ऍन्ड फेअर्स ऍक्ट १८६२ (सन १८६२ चा मुंबई कायदा क्रंमाक ४) च्या कलम ५ व ५ अ, अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदान व मतमोजणी च्या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार तसेच इतर कोणत्याही गावात / ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास सदर आठवडा बाजार, पुढे ढकलण्यात येवून ते गुरुवार, दि. 9 मे व 6 जून 2024 रोजी भरविण्याचे आदेश दिले आहेत.
000000
मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी
सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान दि. 7 मे 2024 रोजी होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी, तसेच जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, या करीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व 2 हजार 448 मतदान केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालचे परिसरात दि. 7 मे 2024 रोजीचे सकाळी 06.00 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरणे, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई केली आहे. झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करणेस मनाई केली आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दि. 7 मे 2024 रोजीचे सकाळी 06:00 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
000000
स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांची आज सांगली आकाशवाणीवर मुलाखत
सांगली दि.3 ( जि.मा.का.) : जिल्ह्यातील ' मतदार जागृती मोहीम ' या विषयावर स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सांगली) शशिकांत शिंदे यांची मुलाखत आज शनिवार, दि. 4 मे रोजी सकाळी 10.15 वाजता आकाशवाणी सांगली केंद्रावर प्रसारित होईल . ही मुलाखत 1251 किलोहर्टझ या ए.एम. वाहिनीवर, तसेच 100.6 एफ एम वर आणि न्यूज ऑन ए आयआर या मोबाईल ॲपवर ऐकता येईल.
जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृतीसाठी आखण्यात आलेल्या विविध मोहिमा, या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान (सांगली ) यांनी ही मुलाखत घेतली आहे . मतदान टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती श्री . शिंदे यांनी या मुलाखतीमध्ये विशद केली आहे.
0000000
गुरुवार, २ मे, २०२४
संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर संवाद यात्रेत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला मतदारांशी संवाद; मतदान करण्याचे केले आवाहन
सांगली दि. 2 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले.
जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज सांगली शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र संजयनगर ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडांगण या मार्गावर संवाद यात्रा काढण्यात आली. संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जिल्हास्तरीय स्वीप समितीचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला मतदारांशी संवाद
मतदान करून लोकशाही बळकट करूया असे मतदारांना आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या संवाद यात्रेत महिला, ज्येष्ठ मतदार, युवा मतदार यांच्याशी संवाद साधून 7 मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यास पुढे यावे,असे आवाहन केले.
संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर
संवाद यात्रेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिलांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. एक मत लोकशाहीसाठी, मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो अशा घोषवाक्याचे फलक दर्शवत मतदारांना आवाहन करण्यात आले. या संवाद यात्रेतून मतदार जागृतीचा जागर घुमला.
मतदान आवाहन पत्राचे मतदारांना वाटप
संवाद यात्रेत मतदारांशी संवाद साधताना मतदान करण्याचे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांना मतदान आवाहन पत्रे दिली. मतदारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर , अत्यावश्यक आरोग्य सुविधाची सोय करण्यात आल्या आहेत. मतदारांनी, निर्भयपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)