sangmahiti
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६
संभाव्य टंचाई व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुपालकांनी पशुधनाचा विमा तातडीने काढून घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर, सांगली जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या मौल्यवान पशुधनाला वेळेत आर्थिक संरक्षण मिळवून देण्यासाठी 'राष्ट्रीय पशुधन विमा योजना' अंतर्गत किमान 1 वर्षाचा विमा तातडीने काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
दुष्काळ व चारा-पाण्याच्या टंचाईच्या काळात साथीचे आजार, कुपोषण, वाढते तापमान, अपघात किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे दुभत्या व उपयुक्त पशुधनाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. अशा कठीण प्रसंगी पशुपालक शेतकरी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी शासनाने अतिशय नाममात्र दरात आणि 85 टक्के अनुदानासह ही विमा योजना कार्यान्वित केली आहे.
भरघोस शासकीय अनुदान
एक वर्षाच्या विम्यासाठी विमा हप्ता दर ४.३० टक्के इतकाच आहे. यामध्ये एकूण विमा हप्त्याच्या ८५ टक्के अनुदान शासन देते, तर पशुपालक शेतकऱ्याला फक्त १५ टक्के रक्कम भरावी लागते. (उदा. ७०,००० रुपयांची दुधाळी गाय किंवा बैल असल्यास 1 वर्षाच्या विम्यासाठी शेतकऱ्याचा हिस्सा फक्त रु. ४५१.५० इतकाच येतो!) कमाल विमा संरक्षण रक्कम (प्रति जनावरास) दुधाळी गाय: रु. ७०,०००/- पर्यंत, दुधाळी म्हैस: रु. ८०,०००/- पर्यंत, बैल: रु. ७०,०००/- पर्यंत, रेडे: रु. ८०,०००/- पर्यंत आहे. अनुदानाची मर्यादा एका कुटुंबातील जास्तीत जास्त १० पशुधनासाठी १ वर्षाचा विमा काढून या सवलतीचा लाभ घेता येतो.
विमा उतरवण्यासाठी काय करावे?
सर्व प्रथम भारतीय कृषी बीमा कंपनी ( AIC ) चे AIC SARAS अँप वर शेतकरी नोंदणी प्रक्रिया करावी. पशुधनाच्या कानात १२ अंकी 'भारत पशुधन प्रणाली' (NDLM) अंतर्गत Ear Tag / UID बिल्ला लावलेला असणे आवश्यक आहे. नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून आरोग्य प्रमाणपत्र मिळवावे. त्यासाठी आधार कार्ड/ओळखपत्र, बँक पासबुक आणि पशुधनाचा कानातील टॅग स्पष्ट दिसेल असा फोटो आदि कागदपत्रे आवश्यक आहेत.
क्लेम प्रक्रिया व थेट मदत :
विमा कालावधीत दुर्दैवाने पशुधनाचा मृत्यू झाल्यास २४ तासांच्या आत विमा कंपनी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे. आवश्यक कागदपत्रे व पोस्ट-मॉर्टम अहवाल सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत विम्याची भरपाई थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केली जाते.
अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक १९६२. दुष्काळ व टंचाईच्या या काळात आपला मुख्य आर्थिक आधार असलेल्या पशुधनाचा बचाव करण्यासाठी व आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी विलंब न करता १ वर्षाचा विमा नक्की काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
निवडणूक निरीक्षक डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2026 :
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी आज सांगली जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक श्री. देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे सावंत आदि उपस्थित होते.
शिक्षक मतदारांची संख्या मर्यादित असली तरी निवडणूक प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच निवडणूक विषयक प्रत्येक बाबीचे जबाबदारीने व गांभीर्याने सूक्ष्म नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ. तुम्मोड यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रे, मनुष्यबळ, आचारसंहिता आदिंचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, आचारसंहिता, निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिका व मतपेटी व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, मतदार यादी व्यवस्थापन, तक्रार निवारण कक्ष, वेबकास्टिंग, मतदान केंद्रावर नियुक्त मनुष्यबळाची सरमिसळ आदि बाबींचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दोन्ही निवडणुकीसाठी सांगली जिल्हा सज्ज असून, जिल्ह्यात निवडणूक अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना, मतदान पथके आदींचे प्रशिक्षण, मतदान केंद्रे, टपाली मतपत्रिका, मतदान केंद्रांवर पुरवावयाच्या किमान आवश्यक सुविधा, मतदान प्रक्रिया, आचारसंहिता आदिंच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण व नियंत्रण कक्ष, स्वीपअंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम आदिंविषयी माहिती सादर केली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पोलीस विभागाच्यावतीने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पोलीस मनुष्यबळाचे नियोजन आदिंची माहिती दिली.
सांगली, मिरजेतील मतदान केंद्रांना दिल्या भेटी
निवडणूक निरीक्षक डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सांगली व मिरज येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. सांगली येथील म.के. आठवले विनयमंदिर, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ तसेच मिरज येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय आणि पीएम श्री मिरज हायस्कूल येथील मतदान केंद्रांना भेट देऊन तयारी व सुविधांचा आढावा घेतला.
00000
वनविभागातर्फे सांगली जिल्ह्यात 247 वनराई बंधारे पूर्ण
- १,५०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने सांगली वनविभागाने वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिलेल्या १,५०० वनराई बंधाऱ्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वनविभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सागर गवते म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली १,५०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्राथमिक टप्प्यात २१० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असताना १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण २४७ वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू असून, या सामूहिक जलसंधारण उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
सन 2026 मधील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खालावलेली भूजल पातळी, जलस्रोतांमधील अपुरा पाणीसाठा आणि कमी पर्जन्यमान या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सात वनपरिक्षेत्रांना प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण २१० बंधारे बांधण्याचे प्राथमिक उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, वनविभागाच्या अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट ओलांडण्यात आले आहे.
विटा वनपरिक्षेत्रात सर्वाधिक ७० बंधारे पूर्ण
वनविभागाने १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलेल्या बंधाऱ्यांची वनपरिक्षेत्रनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. विटा वनपरिक्षेत्रात ७०, शिराळा ६२, सांगली ३०, कडेगाव २६, जत २२, आटपाडी २२ आणि तासगाव वनपरिक्षेत्रात १५ बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. अशा प्रकारे सातही वनपरिक्षेत्रांत मिळून एकूण २४७ वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
लोकसहभागातून जलसंधारणाला चालना
या मोहिमेत वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक सहभागी होत असून, श्रमदानाच्या माध्यमातून वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणीस्रोतांवर बंधारे उभारण्यात येत आहेत. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे आणि मातीची धूप रोखणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्देश आहेत. या कामांमुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यासह पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढण्यास मदत होत आहे.
00000
जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वनराई बंधाऱ्यांची उभारणी
जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने जिल्हाभरात
मोठ्या प्रमाणात वनराई बंधाऱ्यांची उभारणी
- जलसंधारण, भूजल पातळीत वाढ आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्यासाठी तसेच भूजल पुनर्भरणास चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात जवळपास 500 वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यंत्रणा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमात जिल्हाधिकारी श्री. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले.
वनराई बंधारे हे कमी खर्चात आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्याचा वापर करून उभारता येणारे जलसंधारणाचे प्रभावी साधन आहे. नाल्यांमधून व ओढ्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा काही काळ साठा निर्माण करणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे आणि परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यासाठी हातभार लावणे, या दृष्टीने वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व आहे.
जलसंधारणासाठी लोकसहभागावर भर
जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध गावांमध्ये स्थानिक परिस्थिती आणि उपलब्धतेनुसार वनराई बंधारे उभारण्यात आले. जवळपास 500 वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे या जलसंधारणाच्या उद्दिष्टाला चालना देण्यात आली. शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत ग्रामस्थांनीही प्रत्यक्ष सहभाग नोंदवून या उपक्रमाला हातभार लावला.
जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचे महत्त्व जनमानसात रुजविणे आणि गावपातळीवर पाणी अडविणे व पाणी जिरविण्याच्या उपाययोजनांना प्रोत्साहन देणे, हा या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
सामूहिक प्रयत्नांतून जलसमृद्ध गावांकडे वाटचाल
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन, पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर वनराई बंधारे उभारणीसारखे उपक्रम ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरू शकतात. गावातील उपलब्ध मनुष्यबळ, स्थानिक साधनसामग्री आणि प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयातून अशा कामांना गती देणे शक्य आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी. विशाल नरवाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्या सहभागामुळे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांच्या समन्वयातून या मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावपातळीवर समन्वय साधत या उपक्रमात सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे जलसंधारणाच्या कामांबाबत सामूहिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत जिल्हा परिषद सांगलीने जलसंधारणासाठी लोकसहभागातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाभरात उभारण्यात आलेले जवळपास 500 वनराई बंधारे हे जलसंधारणाच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून गावोगावी जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट होऊन भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
00000
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित विविध उपक्रम
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी ग्रंथालय येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा मराठी भाषा समिती (सांगली), जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय (सांगली) आणि महात्मा गांधी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. वाचनाचे महत्त्व सांगणारे व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचे अभिवाचन असे उपक्रम या अंतर्गत घेण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे, महात्मा गांधी ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळाचे कार्यवाह अभयकुमार लाड, गांधी ग्रंथालय विश्वस्त मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. लताताई देशपांडे आदि उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी 'मोबाईलचा मोह सोडा आणि वाचनाशी नाते जोडा' हा विषय विषद करून सांगितला. मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि विचार व ज्ञानविश्व व्यापक करण्यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळाचे कार्यवाह अभयकुमार लाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 'शेतकऱ्यांच्या आसूड' या पुस्तकातील साहित्याचे अभिवाचन केले. टी. एन. सपकाळ यांनी 'एक होता कार्व्हर' या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गांधी ग्रंथालयाच्या विश्वस्त मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. लताताई देशपांडे यांनी केले.
प्रारंभी महात्मा गांधी ग्रंथालयात महात्मा गांधीजी आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे स्वागत आणि प्रास्ताविकात वाचन प्रेरणा दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम केले जात असल्याचे सांगून यावर्षीही पुस्तक प्रदर्शन, व्याख्यान आणि अभिवाचन आयोजित केले आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. ग्रंथपाल दिगंबर सूर्यवंशी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास महात्मा गांधी ग्रंथालयाचे विश्वस्त विलास शहा, शशिकांत पाटणे, शरद शहा, कार्यवाह शरद पाटील, मीनाक्षी चंद्रशेखर, आनंदराव जाधव, दिलीप शिंदे, सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष विकास जोशी, वि. स. खांडेकर वाचनालयाचे अध्यक्ष बेलवलकर, सिकंदर अमीन आदि उपस्थित होते.
00000
सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्ह्यात 54 वनराई बंधाऱ्यांची उभारणी
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग, सांगली यांच्यामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 54 वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रशांत वरूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या मोहिमेंतर्गत आटपाडी तालुक्यात पिंपरी खुर्द येथे 8 व खरसुंडी येथे 2, असे एकूण 10, जत तालुक्यात कंठी येथे 3 तसेच जत व बिरनाळ येथे प्रत्येकी 1, असे एकूण 5 बंधारे, कडेगाव तालुक्यात शाळगाव येथे 13, खानापूर तालुक्यात कार्वे येथे 2 वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. पलूस तालुक्यात बांबवडे येथे 5, शिराळा तालुक्यात करमाळे, भाटवाडी येथे 2 आणि औंढी येथे 2, असे एकूण 5 बंधारे, तासगाव तालुक्यात तासगाव येथे 2, नागाव कवठे येथे 3, मतकुणकी येथे 2 व बस्तवडे येथे 1, असे एकूण 8 बंधारे, मिरज तालुक्यात एरंडोली येथे 4 व भोसे येथे 1, असे एकूण 5 बंधारे, तर वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथे 1 वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.
सामाजिक वनीकरण विभागांतर्गत कार्यरत सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाचे अनियमित प्रमाण, भूजल पातळीत होणारी घट आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वनराई बंधारे हा प्रभावी उपाय ठरत आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. परिणामी, जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढून भूजल पुनर्भरणाला चालना मिळते आणि पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होते.
या उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा सहभाग घेऊन जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या सामूहिक जलसंधारण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना 1370 रास्तभाव दुकानांमधून लाभार्थ्यांना धान्य वाटप - प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यात पात्र लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचे वाटप सुरू असून, सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1 हजार 370 रास्त भाव दुकानांमार्फत हे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 970, तर शहरी भागातील 400 रास्तभाव दुकानांचा समावेश असल्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, उपलब्ध आकडेवारीनुसार, सांगली जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत 28 हजार 937 शिधापत्रिकाधारक, तर प्राधान्य कुटुंब गटातील (PHH) 3 लाख 86 हजार 341 शिधापत्रिकाधारकांची नोंद आहे. या दोन्ही गटांतील अनुक्रमे 1 लाख 8 हजार 66 आणि 16 लाख 3 हजार 258 लाभार्थी घटकांचा (Units) समावेश आहे.
ग्रामीण भागासाठी सर्वाधिक धान्याचे नियतन
ग्रामीण भागासाठी नोव्हेंबर 2026 करिता अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 387.93 मेट्रिक टन गहू आणि 222.34 मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे. प्राधान्य कुटुंब गटासाठी 3 हजार 581.784 मेट्रिक टन गहू आणि 2 हजार 342.86 मेट्रिक टन तांदळाचे नियतन आहे.
शहरी भागासाठी नोव्हेंबर 2026 करिता अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 255.20 मेट्रिक टन गहू आणि 150.80 मेट्रिक टन तांदूळ, तर प्राधान्य कुटुंब गटासाठी 1 हजार 100.922 मेट्रिक टन गहू आणि 733.95 मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे.
एकूण धान्य नियतन
सांगली जिल्ह्यासाठी दोन्ही योजनांतर्गत एकूण नोव्हेंबर 2026 करिता 5 हजार 325.834 मेट्रिक टन गहू आणि 3 हजार 449.943 मेट्रिक टन तांदळाचे नियतन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप सुरू असल्याचे आकडेवारीत नमूद आहे.
या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांसह जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अन्नधान्य उपलब्ध होत असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)