सोमवार, १० ऑगस्ट, २०२६
इंडिया स्किल्स कॉम्पटिशनसाठी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
सांगली, दि. 10 (जि.मा.का.) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून, जगभरातील २३ वर्षांखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. इंडिया स्किल्स कॉम्पटिशन ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धा आहे. तरी 2027 मध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स कॉम्पटिशन २०२६-२७ स्पर्धेकरिता प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील इच्छुक पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
ही स्पर्धा देशातील प्रतिभावान युवक-युवतींना विविध व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य क्षेत्रांमध्ये आपली गुणवत्ता, कौशल्ये आणि प्राविण्य प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे स्पर्धक राष्ट्रीय निवड प्रक्रियेतून पुढे जातात आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवतात.
इंडिया स्किल्स कॉम्पटिशन २०२६-२७ स्पर्धेकरिता नावनोंदणी सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने २०२७ मध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने कौशल्य क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने इंडिया स्किल्स कॉम्पटिश्न २०२६-२७ आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील India Skills Competition २०२६-२७ करिता नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
इंडिया स्किल्स कॉम्पटिश्न २०२६-२७ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ५६ क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००३ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, सायबर सुरक्षा, उद्योग ४.०, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट प्रणाली एकत्रीकरण या Team स्किल्सकरिता उमेदवाराचा जन्म दि.१ जानेवारी, २००३ आणि Autonomous Mobile Robotics, Concrete Construction Work, Landscape Gardening या Team स्किल्सकरिता उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००६ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणी केलेल्या उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईल, तसेच अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे प्रत्यक्ष अथवा जिल्हा कौशल्य विकास सहायक अमोल बोळाज (मो.नं.८५५४९९२५२४) यांच्याशी संपर्क साधावा.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा