मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना प्रतिमहिना 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. इच्छुक पात्र साहित्यिक व कलावंतांनी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मुळ दस्ताऐवजासह आपले सरकार पोर्टलवर http://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांगांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे (दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्षे). कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान, ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे, वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील, कलाकाराचे सर्व मार्गानी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रूपये पेक्षा जास्त नसावे, ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. आदी अटी लागू आहेत.
अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञा पत्र, पती व पत्नी एकत्रीत फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास), राज्य किंवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था /व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), विविध पुरावे आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा