रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

स्वच्छता केवळ कृती नसून, एक संस्कृती - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम सांगली, दि. 30 (जि. मा. का) : स्वच्छता ही केवळ एक कृती नसून, ती एक संस्कृती आहे. स्वच्छ परिसर व कार्यालयीन वातावरणामुळे कार्यक्षमतेत वाढ होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्वच्छ कार्यालय व परिसर यामुळे सकारात्मकता टिकून राहते आणि नागरिकांना चांगल्या सुविधांचा अनुभव मिळतो. त्यामुळे आपल्या कार्यालयाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नरत रहावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, तहसिलदार लीना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अनावश्यक वनस्पती जाती निर्मूलन मोहिमेचे देवराई अभ्यासक रोहन पाटील व पर्यावरण प्रेमी कौस्तुभ पोळ यांनी स्वागत केले आहे. रानमोडी, ओसाडी आणि घाणेरी या विदेशी तणांनी जिल्ह्यातील पर्यावरण, शेती आणि स्थानिक जैवविविधतेवर अतिशय धोका निर्माण केला आहे. या तणांमुळे सुपीक जमीन अशक्त होत आहे, पिकांचे उत्पादन कमी होत आहे आणि स्थानिक वनस्पतींचा नाश होत आहे. हे संकट ओळखून जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातून विदेशी तण समूळ नष्ट करण्याची प्रभावी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील कचरा व अनावश्यक वनस्पतीच्या जाती निर्मूलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे व मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. *जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत 9 टन ओला कचरा काढण्यात आला.* ०००००

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी

सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत. सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 11 नोव्हेंबर 2008 च्या आदेशानुसार ज्या दिवशी मतदान अधिकारी/कर्मचारी सर्व मतदान साहित्य घेवून मतदान केंद्राचा ताबा घेतात, त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळांना सुट्टी देणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या दिवशीसुध्दा शाळांना सुट्टी राहील, याची खात्री करण्याची यावी, असे नमूद आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना दि. 26 नोव्हेंबर 2025 अन्वये संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्ये दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर, 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार असल्याने मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 00000

पोलीस अंमलदारांना गुन्हे तपास प्रशिक्षणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत - पोलीस अधीक्षक संदीप घुगे

- 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपास प्रशिक्षणाची सांगता सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : गुन्हे तपासविषयक प्रशिक्षण घेतलेले पदवीधर पोलीस अंमलदार हे त्यांच्याकडे सोपविलेल्या कोणत्याही गुन्ह्यांचा तपास बिनचूक व शास्त्रशुद्ध पद्धतीने करतील. त्यातून दोषसिद्धत्वाचे प्रमाण वाढण्यास मदत होऊन, याद्वारे ते समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला. पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची - तासगाव येथील राज्य पोलीस दलातील विविध घटकातील 07 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपासविषयक प्रशिक्षण सत्र क्र. 1 च्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची-तासगावचे प्राचार्य धीरज पाटील, पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक एकता पवार, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. गुन्हे तपासाचे व दोषसिद्धीचे महत्त्व विशद करताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईम, आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप क्लिष्ट झाले आहे. अशा गुन्ह्यांची शास्त्रशुद्धपणे उकल होऊन त्यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात गुन्ह्याच्या तपासावेळी निश्चितच फायदा होणार आहे. काहीवेळा केवळ गुन्हे तपासातील त्रुटींमुळे व पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात, अशावेळी दोषसिद्धीकरिता या प्रशिक्षणातील ज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल व त्यामुळे गुन्ह्यातील दोषसिद्धत्व होवून अन्यायग्रस्त पीडितास न्याय मिळवून देण्याचा आनंद फार मोठा असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी प्रशिक्षणाथींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील म्हणाले, गुन्हे तपास विषयक प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये राज्यातील विविध घटकातून उपस्थित राहिलेले सर्व पात्र पदवीधर पोलीस अंमलदार हे आता सर्व प्रकारच्या आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा शास्त्रोक्त तपास व उकल करण्याकरिता सर्वार्थाने सज्ज झाले आहेत. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे यातील ज्ञानाचा वापर करून सर्वजण तपासी अंमलदाराची भूमिका उत्कृष्टपणे बजावतील, असे मत व्यक्त करून त्यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पदवीधर पोलीस अंमलदार यांचे गुन्हे तपासविषयक प्रशिक्षणाचे सत्र क्र. १ हे ३ नोव्हेंबरपासून ४ आठवडे कालावधीकरिता आयोजित करण्यात आले होते. त्यामधील 471 पदवीधर पोलीस अंमलदार हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, धाराशिव, लातूर, बीड, पालघर, ठाणे ग्रामीण, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण आणि लोहमार्ग-मुंबई, लोहमार्ग-पुणे अशा एकूण 15 पोलीस घटकांमधून आलेले होते. या 4 आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांना गुन्हे तपासाच्या अनुषंगाने, सुधारित भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच किरकोळ कायदे यामधील महाराष्ट्र पोलीस अधिनियम दारूबंदी अधिनियम, जुगार प्रतिबंधक अधिनियम, मोटार वाहन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम, JJ Act, इत्यादी कायदे आणि पोलीस स्टेशनला एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा एफ. आय. आर., घटनास्थळ पंचनामा, पुरावे गोळा करणे, जबाब घेणे, आरोपी अटक करताना घ्यावयाची दक्षता, आरोपींची विचारपूस, तंत्र, पोलीस स्टेशनला दाखल होणारे अकस्मात जळीत, मोटार अपघाताचे गुन्हे, चोरीचे गुन्हे, अंगुली मुद्रा, सायबर गुन्हे या विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले आहे. प्रशिक्षणाअंती, घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये 469 प्रशिक्षणार्थी पदवीधर पोलीस अंमलदार हे उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थींना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक एकता पवार यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ यांनी मानले. 00000

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

नगरपरिषद व नगरपचांयत क्षेत्रात 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, दि. 28 (जि.मा.का) : नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या मतदारसंघात पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव, विटा या नगरपरिषदा तसेच आटपाडी आणि शिराळा या नगरपचांयतींच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे. मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागू राहणार आहे. निवडणूक होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. 00000

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता 1 डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार

सांगली, दि. 28 (जि.मा.का) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावे ; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे सुधाारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत

सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत दि. 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्र पणजी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025 आहे, असे प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तु, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, बचत बँक खाते इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह 1 डिसेंबर पर्यंत सहाय्यक निदेशक डाक सेवा, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी ४०३००१ यांचे नावे पाठवावेत, असे प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 000000

ालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात - जिल्हाधिकारी अशोक काकडे

ब - संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये बाल विवाह मुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प हे अभियान यशस्वीरित्या पार पाडावे. सर्व विभाग प्रमुख व विवाहसंबंधित खाजगी व्यवसायिकांनी बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागासह संबंधित यंत्रणा, विवाह नोंदणी संस्था, गाव कामगार पोलीस पाटील, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल सरंक्षण समिती, स्वयंसेवी संस्था, प्रामुख्याने सामाजिक / धार्मिक नेते तसेच विवाह संबंधीत सेवा पुरवठाधारक, बँड पथक, कॅटरर्स / आचारी यांनी बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात. आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्पष्ट केले आहे. मंगल कार्यालय हॉल मालक / हॉटेल मालक, मंडप, डेकोरेशन मालक, विवाह पत्रिका छापताना प्रिटिंग प्रेस मालक यांनी अल्पवयीन मुलींची लग्नाची पत्रिका छापू नये. याबाबतची माहिती निदर्शनास आल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सांगली या कार्यालयाशी संपर्क करावा किंवा 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. बालविवाह हा एक खोलवर रुजलेला सामाजिक प्रश्न आहे, जो विशेषत: मुलींच्या हक्कांवर, आरोग्यावर आणि भविष्यावर परिणाम करतो. यामुळे मुलींचे शिक्षण खंडीत होते. अल्पवयीन गर्भधारणा व लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रभावित होते. शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतरही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बालविवाहाचे प्रकार आढळतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राज्यव्यापी अभियान “बालविवाह मुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प” 15 ऑक्टोबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी शासकीय विभाग, सामाजिक नेते, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, बालविवाहासाठी व नागरिक यांना एकत्र आणून सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करावयाचा असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 प्रसारमाध्यमे समन्वय अधिकारीपदी डॉ. पवन म्हेत्रे

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा, जत, पलूस नगरपरिषद तसेच शिराळा व आटपाडी नगरपंचायत अशा एकूण 8 नगरपरिषदा/नगरपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत प्रसारमाध्यमे यांच्याकरिता संपर्क व समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9860010308 असा आहे, असे नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार

- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार सांगली, दि. 15 (जि.मा.का.) : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा (उरुण- ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस) व 2 नगरपंचायत (शिराळा, आटपाडी) यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा दि. 10 नोव्हेंबर 2025 ते दि. 17 नोव्हेंबर 2025 (सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 पर्यंत) आहे. तसेच या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे. परंतु, आता संगणकप्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेले असल्याने तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन - फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम 1 (ब) रहदारी अधिकारान्वये सुधारित वाहतूक नियोजन जाहिरनामा कायमस्वरूपी प्रसिध्द केला आहे. यानुसार मिरजेतील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक व दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. मिरज शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्यालगत ज्युबिली कन्या शाळा व इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने त्याचबरोबर दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक हा शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता तांदूळ मार्केट, महानगरपालिका कार्यालय, तलाठी कार्यालय असल्याने एस.टी. बसेस व जड वाहने नमूद रोडवरुन ये-जा करी असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होते. शहरातील वाहतूक सुरळीतपणे विना अपघात चालू रहावी यासाठी मिरज शहरातील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी तसेच दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक जाणारा रस्ता एकेरी वाहतुक (वन वे) आवश्यक आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातास आळा बसेल. तसेच वाहतूक सुरळीत चालू राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होणार नाही. सदर भागातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या इंधनाचा वेळेचा अपव्यय होणार नाही. सदर भागातील मागणीनुसार खालीलप्रमाणे एकेरी वाहतूक मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. एकेरी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - फुलारी कॉर्नर ते दत्त चौक - फुलारी कॉर्नर ते दत्त चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी (वन वे) करण्यात आला आहे. दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे जाता येईल. दत्त चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौकातून दत्त चौकाकडे दुचाकी वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनचालक यांना महाराणा प्रताप चौकातून डावीकडे उत्तरेस वळण घेऊन फुलारी कॉर्नर मार्गे दत्त चौक व गाडवे चौकाकडे जाता येईल. सदरचा जाहिरनामा दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पासून कायमस्वरुपी करण्यात आला असून, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे त्यात म्हटले आहे. 00000

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन - फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम 1 (ब) रहदारी अधिकारान्वये सुधारित वाहतूक नियोजन जाहिरनामा कायमस्वरूपी प्रसिध्द केला आहे. यानुसार मिरजेतील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक व दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. मिरज शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्यालगत ज्युबिली कन्या शाळा व इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने त्याचबरोबर दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक हा शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता तांदूळ मार्केट, महानगरपालिका कार्यालय, तलाठी कार्यालय असल्याने एस.टी. बसेस व जड वाहने नमूद रोडवरुन ये-जा करी असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होते. शहरातील वाहतूक सुरळीतपणे विना अपघात चालू रहावी यासाठी मिरज शहरातील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी तसेच दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक जाणारा रस्ता एकेरी वाहतुक (वन वे) आवश्यक आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातास आळा बसेल. तसेच वाहतूक सुरळीत चालू राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होणार नाही. सदर भागातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या इंधनाचा वेळेचा अपव्यय होणार नाही. सदर भागातील मागणीनुसार खालीलप्रमाणे एकेरी वाहतूक मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. एकेरी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - फुलारी कॉर्नर ते दत्त चौक - फुलारी कॉर्नर ते दत्त चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी (वन वे) करण्यात आला आहे. दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे जाता येईल. दत्त चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौकातून दत्त चौकाकडे दुचाकी वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनचालक यांना महाराणा प्रताप चौकातून डावीकडे उत्तरेस वळण घेऊन फुलारी कॉर्नर मार्गे दत्त चौक व गाडवे चौकाकडे जाता येईल. सदरचा जाहिरनामा दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पासून कायमस्वरुपी करण्यात आला असून, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे त्यात म्हटले आहे. 00000

परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका, शेतमालावर प्रकिया काळाची गरज - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- उत्पादक खरेदीदार संमेलनात प्रतिपादन - संमेलनास शेतकरी, निर्यातदारांचा उत्स्फूर्त सहभाग - 48 शेतकरी गटांचे स्टॉल, 45 निर्यातदार / खरेदीदारांचा सहभाग - ⁠14.39 कोटींच्या 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका. शेतीपूरक व्यवसाय सुरू केल्याशिवाय शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार नाही. शेतमालावर प्रकिया ही काळाची गरज असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. सांगली पॅटर्न - चला शेतकऱ्याला व्यापारी करू… या घोषवाक्यासह आयोजित उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दीपायन हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास कृषि आयुक्त सूरज मांढरे व अपेडाचे संचालक डॉ. परशुराम पाटील हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदि उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उत्पादक खरेदीदार संमेलनातून शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होत आहे. शेतीमाल निर्यात क्षेत्रात शेतकरी महिलांनाही प्रोत्साहन द्यावे. अशा संधी उपलब्ध होण्यासाठी अपेडाने पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले. यावेळी त्यांनी स्वानुभवाचे विविध दाखले देत शेतीमधील स्वप्रयोगांची माहिती दिली. तसेच, संमेलनाच्या आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे व कृषि विभागाचे अभिनंदन केले. उत्पादक खरेदीदार कृषि संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन करुन दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना कृषि आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतीमालाचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. यासाठी उत्पादक व खरेदीदारांनी परस्पर सुसंवाद ठेवावा. जगाच्या बाजारपेठेची स्थिती व गरज शेतकरी बांधवांनी जाणून घेण्याची गरज आहे. त्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांनी व्यावसायिक पद्धतीने शेती करावी. जी. आय. मानांकित उत्पादने घ्यावीत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत. त्यासाठी हे संमेलन दिशादर्शक ठरेल. यातून चांगले करार होऊन संमेलनाचे सार्थक होईल, असा विश्वास व्यक्त करून यावेळी त्यांनी यासाठी राज्यस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे सांगितले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कृष्णाकाठच्या व येरळा, वारणा आदि उपनद्यांच्या परिसरात वसलेल्या सांगली जिल्ह्यातील नररत्नांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती दिली आहे. जिल्ह्याला राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, कृषि क्षेत्रात मोठा वारसा आहे. या सर्वांनी सांगली जिल्ह्याला आकार दिला आहे. शेती सांगलीची शान असून, इथल्या द्राक्ष, डाळिंब, केळी, ड्रॅगनफ्रुट आदिंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्याचा लाभ होऊन इथल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, या हेतूने हे संमेलन आयोजित केले आहे. या उत्पादक खरेदीदार कृषि संमेलनातून केवळ एकच दिवस नव्हे तर दोघांतही नियमित सकारात्मक संवाद व्हावा. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या उपक्रमाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यात या संमेलनाचे योगदान राहील, असे सांगून त्यांनी आपण पाहिलेले हे सर्वोत्तम संमेलन असल्याचे सांगितले. यावेळी अपेडाचे संचालक डॉ. परशुराम पाटील, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, मित्राचे केदार पवार, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, पशुसंवर्धन उपयुक्त अजयनाथ थोरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विवेक कुंभार यांनी केले. आभार राजेश शहा यांनी मानले. सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले. रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. तसेच, कृषि विभागाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, अपेडा व कृषि विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 14.39 कोटीचे खरेदी विक्रीबाबत करार जतचे उपविभागीय अधिकारी गणेश श्रीखंडे म्हणाले, यावेळी 145 शेतकऱ्यांची 14.39 कोटी रूपयांची 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार पार पडले. त्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 48 शेतकरी गटांनी या संमेलनात स्टॉल लावले होते. 45 निर्यातदार / खरेदीदारांनी संमेलनात व 145 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष संवादात सहभाग नोंदवला. जवळपास दीड हजारच्या आसपास शेतकरी उपस्थित होते. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनात विविध संलग्न विभागाचे अधिकारी, जिल्ह्यासह राज्यभरातील निर्यातदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. 00000

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त युनिटी पदयात्रा उत्साहात संपन्न

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सरदार @150 एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा आज उत्साहात संपन्न झाली. तरुण भारत स्टेडियम येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. जिल्हा प्रशासन व मेरा युवा भारत सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही पदयात्रा तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन सिटी पोस्ट मार्गे शिवाजी क्रीडांगण या ठिकाणी या पदयात्रेची सांगता झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, लेखालिपिक व कार्यक्रम पर्यवेक्षक सिद्धार्थ चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी एकतेची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्र वरील शाहिरी पथकाच्या पोवाड्याने झाली तर सांगता राष्ट्रीय एकतेवरील सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. या पदयात्रेत मेरा युवा भारत सांगली, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स, जिल्हा आरोग्य विभाग व आरोग्य पथक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात ही पदयात्रा आयोजित करण्यात आली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सागर व्हनमाने, महेंद्र साठे, शुभम कानडे, प्रशांत पाटील,राजमती वाडकर यांनी परिश्रम घेतले. 00000

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर करण्यात आला आहे. राखीव जागांसाठी निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत. सदर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२५ मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीची असून अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

मल्लखांब खेळातून मानसिक, शारीरिक संतुलन - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात सुरू सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : मल्लखांब हा भारताचा प्राचीन खेळ आहे. या खेळामध्ये मानसिक, शारीरिक संतुलन आणि धैर्य सुध्दा आहे. अनेक छत्रपती पुरस्कारार्थी या खेळामधील आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे या खेळाचा वसा आणि वारसा खेळाडुंनी जपावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल मिरज येथे आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते बाबासाहेब समलेवाले, तालुका क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी नरेश सावंत, क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांच्यासह खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, खेळाडुंनी त्यांच्यामधील जे उत्तम आहे ते प्रकट करावे. या स्पर्धा निकोप वातावरणात पूर्ण कराव्यात. खेळाडुंनी खेळाचा आनंद मनमुराद लुटावा. आपल्याला विपरित परिस्थितीत संतुलन साधता आले पाहिजे, हे सर्व मल्लखांब खेळातून शक्य होते. या खेळाचे नाव देशभरात जगभरात, नेण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच ही स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी येथील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. यावेळी आशियाई ॲक्रोबेटिक्स स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडुंचा सन्मान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यातील एकूण आठ विभागातून चार मुले व चार मुली तसेच पंच, निवड समिती सदस्य, तांत्रिक अधिकारी असे एकूण 125 खेळाडू व अधिकारी यांचा सहभाग आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडू उज्जैन (मध्य प्रदेश) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी केले. आभार तालुका क्रीडा अधिकारी विकास माने यांनी मानले. 00000

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा आजपासून

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मिरज या ठिकाणी दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर व लातूर अशा 8 विभागातून एकूण 64 स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामधून राज्याच्या टीमसाठी निवड केली जाणार आहे. स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवासाची व भोजनाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 0000

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता काय करावे? व काय करू नये?

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता काय करावे? व काय करू नये? राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी व मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा या 6 नगरपरिषदा आणि आटपाडी व शिराळा या 2 नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने काय करावे व काय करू नये याबाबतची सूची जाणून घेऊया. ही सूची उदाहरणदाखल असून ती सर्वसमावेशक नाही. या व्यतिरिक्त वेळोवेळी जारी केलेले आदेश, निर्देश / सूचना यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. काय करावे? १. चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरू ठेवता येतील. २. ज्याविषयी शंका निर्माण होईल, अशा बाबींच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग /महानगरपालिका आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण / मान्यता प्राप्त करण्यात यावी. ३. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व या संदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील. ४. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. ५. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना / निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना/ निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे. ६. विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरे बाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत. ७. इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी. ८. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे. ९. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात. १०. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांच पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी अर्ज केले पाहिजेत व वेळीच अशी सवलत मिळविली पाहिजे. ११. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिक्षेपक (Loudspeaker) किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी योग्य परवानगी मिळविली पाहिजे. १२. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचे सहाय्य मिळविण्यात यावे. १३. कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची वेळ व जागा, मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरवणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. १४. मिरवणूक ज्या वस्तीमधून जात असेल, त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्या विषयी खात्री करुन त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे, त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधांचे अनुपालन करण्यात यावे. १५. मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. १६. ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू मिरवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत. १७. मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पडावे यासाठी सर्वतोपरी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य देण्यात यावे. उमेदवार व त्याच्या अधिकृत कार्यकर्त्यांनी विहित परवानगी घेऊन योग्य असे बिल्ले व ओळखपत्रे, निवडणूक प्रशासनाकडून मिळवावीत व ती निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ती दर्शनी भागावर लावावीत. १८. मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा निर्देश असणार नाही. १९. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. २०. राज्य निवडणूक आयोगाचे, महानगरपालिका आयुक्त यांचे अथवा जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा त्यांनी प्रधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याहीवेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही. २१. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी/ क्षेत्र/ प्रभाग दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. २२. राज्य निवडणूक आयोग / आयुक्त, महानगरपालिका/ जिल्हाधिकारी / निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबींविषयीचे निर्देश / आदेश/अनुदेश यांचे पालन करण्यात यावे. काय करु नये? १. शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनात पुढील कार्यालयाच्या वाहनाचा समावेश असेल. (१) केंद्र शासन (२) राज्य शासन (३) केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळे (४) केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम (५) स्थानिक स्वराज्य संस्था (६) महानगरपालिका (७) नगर परिषदा / नगर पंचायती (८) पणन मंडळ (कोणत्याही नावाचे) (९) सहकारी संस्था (१०) जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या ग्रामपंचायती (११) ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्श्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतवण्यात आला आहे, अशी कोणतीही संस्था व (१२) संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य शासन, केंद्रीय पोलिस संघटना इत्यादीच्या मालकीची असलेली पुढील वाहने - मालमोटारी, लॉरी, टेंपो, जीपगाड्या, मोटारगाड्या, ऑटोरिक्षा, बसगाड्या, विमाने, हेलिकॉप्टर, जहाजे, बोटी, हॉवर क्रॉफ्ट व इतर सर्व वाहने. २. सत्तेमध्ये असलेला पक्ष/शासन यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये. ३. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इ. बांधण्याचे वचन देणे इत्यादी गोष्टी करू नयेत. ४. शासन/सार्वजनिक उपक्रम याच्या सेवेत कोणत्याही तदर्थ (Ad hoc) नियुक्त्या करु नयेत. ५. मंत्री (राज्यमंत्री व उपमंत्रीसहित) हे उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाहीत. ६. निवडणूक मोहीम/प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये. ७. मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये. ८. मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये. ९. विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद जामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्यः वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. १०. इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ११. ज्यांचा खरेखोटेपणा पडताळून पाहिलेला नाही, असे आरोप ठेवून किंवा त्यास विकृत स्वरुप देऊन इतर पक्ष किवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका करण्यात येऊ नये. १२. निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी साठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करण्यात येऊ नये. १३. लाच देणे, आवजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहेत. १४. व्यक्तींची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नये. १५. कोणत्याही व्यक्तीला, अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत आवारभिंत इत्यादींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवानगीखेरीज करणे, ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे इत्यादी करता येणार नाही. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खाजगी जागांचा समावेश असेल. १६. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये किंवा मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये. १७. एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मिरवणूक काढण्यात येऊ नये. १८. दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भित्तीपत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत. मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिसांच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे. १९. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षाजवळ प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये. २०. ध्वनिक्षेपकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी ६.०० वाजण्यापूर्वी किंवा रात्री १०.०० वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये. तसेच याबाबत असलेले The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. २१. तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मिरवणुकीत किंवा प्रचारफेरीत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. अशा सभा/ प्रचारफेरी रात्री १०.०० वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच घालून दिलेल्या अटींचे पालन करावे. याखेरीज, स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवश्यकतेचा स्थानिक दृष्टीकोन आणि हवामान, सणासुदीचे दिवस, परिक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असतील. २२. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पैशाचे, मद्याचे, वस्तूंचे वाटप करण्यात येऊ नये. (संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)

सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : शेतकऱ्यांना हमखास व स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभ घेता यावा, तसेच जिल्ह्यातील कृषी उद्योगास व निर्यातीस चालना मिळण्यासाठी सांगली येथे शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलन घेण्यात येणार आहे. हे संमेलन दीपायन बँक्वेट हॉल, जुने आरटीओ ऑफिस समोर, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या उत्पादक खरेदीदार संमेलनामध्ये 100 पेक्षा जास्त खरेदीदार सहभाग घेणार आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला या माध्यमातून नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील काही भाग पूर्वी दुष्काळी होता. परंतु, आता ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या उपसा जलसिंचन योजनांमुळे पूर्णपणे बागायत झालेला आहे. शेतक‌ऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आता सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी या फळपिकांचे उत्पादन करण्यात येते व देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात येते. विशेषतः द्राक्ष व बेदाणा निर्यातीसाठी सांगली जिल्ह्याची विशेष ओळख आहे. या फळपिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या नवीन बाजारपेठांची ओळख शेतकऱ्यांना होण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 00000

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025

नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये अडीच लाख मतदार, 291 मतदान केंद्रे - जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. या सर्व नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 इतके मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रे आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदेपैकी उरूण-ईश्वरपूर व विटा या ब वर्ग नगरपरिषदा आहेत तर आष्टा, तासगाव, जत, पलूस या क वर्ग नगरपरिषदा आहेत. शिराळा व आटपाडी या नगरपंचायती आहेत. या सर्व नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 इतके मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रे आहेत. एकूण 107 प्रभाग असून एकूण सदस्य संख्या 181 आहे. यापैकी महिला सदस्य संख्या 92 आहे. एकूण 181 सदस्य संख्यैपैकी अनुसूचित जाती 24, अनुसूचित जमाती 01, नागरिकांचा मागास प्रवर्ग 48 व सर्वसाधारण 108 सदस्य संख्या आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिनांक 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरणे व स्वीकारण्याचा कालावधी आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि. 19 ते 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे, अपील असल्यास दि. 21 ते 25 नोव्हेंबर असा आहे. अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दि. 25 नोव्हेंबरपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 26 नोव्हेंबर आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रात होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असे ते यावेळी म्हणाले. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील ब वर्ग नगरपरिषदेसाठी (विटा व उरूण-ईश्वरपूर) थेट अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार व सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार खर्च मर्यादा आहे. क वर्ग नगरपरिषदेसाठी (आष्टा, तासगाव, जत व पलूस) थेट अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार व सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार तर नगरपंचायत (शिराळा व आटपाडी) थेट अध्यक्ष पदासाठी 6 लाख रूपये व सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार रूपये खर्च मर्यादा असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले. स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात येत असून या अभियानाचा उद्देश प्रत्येक पात्र मतदाराने आपले मतदानाचे कर्तव्य न चुकवता पार पाडावे आणि लोकशाही बळकट करावी असल्याचे ते यावेळी म्हणाले. 00000

दुचाकी वाहनाकरिता बुधवारपासून नवी मालिका

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगलीकरिता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई यू (EU) ही नवीन मालिका बुधवार, दि. 12 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दी-पत्रकाव्दारे दिली आहे. एम एच 10 ई यू (EU) या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहित केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादिंची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा डीडी जो अर्जदार सादर करेल, त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत, उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी सांगली येथे व शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी उरूण ईश्वरपूरमध्ये पदयात्रेचे आयोजन केल्याची माहिती मेरा युवा भारत, सांगलीचे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हा कार्यक्रम आणि उपक्रम माय भारत पोर्टलवर होत आहे. या पोर्टलवर नोंद करून जिल्ह्यातील नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होऊन सक्रियपणे सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे. पहिली “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी समाप्त होईल. तसेच दुसरी जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वा. उरूण ईश्वरपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी काढण्यात येणार आहे. मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात या दोन “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” आयोजित केल्या जात आहेत. या पदयात्रेसोबत स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती मोहीम, सरदार पटेल यांच्या विचारावर चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमात जिल्हा प्रशासन, माय भारत, शाळा, महाविद्यालय, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स यांचा सहभाग असेल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000