रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

स्वच्छता केवळ कृती नसून, एक संस्कृती - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम सांगली, दि. 30 (जि. मा. का) : स्वच्छता ही केवळ एक कृती नसून, ती एक संस्कृती आहे. स्वच्छ परिसर व कार्यालयीन वातावरणामुळे कार्यक्षमतेत वाढ होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्वच्छ कार्यालय व परिसर यामुळे सकारात्मकता टिकून राहते आणि नागरिकांना चांगल्या सुविधांचा अनुभव मिळतो. त्यामुळे आपल्या कार्यालयाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नरत रहावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, तहसिलदार लीना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अनावश्यक वनस्पती जाती निर्मूलन मोहिमेचे देवराई अभ्यासक रोहन पाटील व पर्यावरण प्रेमी कौस्तुभ पोळ यांनी स्वागत केले आहे. रानमोडी, ओसाडी आणि घाणेरी या विदेशी तणांनी जिल्ह्यातील पर्यावरण, शेती आणि स्थानिक जैवविविधतेवर अतिशय धोका निर्माण केला आहे. या तणांमुळे सुपीक जमीन अशक्त होत आहे, पिकांचे उत्पादन कमी होत आहे आणि स्थानिक वनस्पतींचा नाश होत आहे. हे संकट ओळखून जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातून विदेशी तण समूळ नष्ट करण्याची प्रभावी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील कचरा व अनावश्यक वनस्पतीच्या जाती निर्मूलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे व मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. *जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत 9 टन ओला कचरा काढण्यात आला.* ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा