शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

सांगलीत 'स्वच्छता हीच सेवा' अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

#सेवासंकल्पअभियान सांगलीत 'स्वच्छता हीच सेवा' अंतर्गत सांगली,मिरज कुपवाड शहर महानगरपालिका व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्यासह हजारो शालेय विद्यार्थ्यांच्या सह सरकारी घाट परिसराची स्वच्छता केली.

#सेवासंकल्पअभियान

#सेवासंकल्पअभियान वाटेगाव येथे सेवा संकल्प सच्छता हीच सेवा अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

सांगली जिल्ह्यात मिशन सुधार, ई-केवायसी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीत 83.6 टक्के काम पूर्ण - वाळवा तालुका ८६.५४ टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांकावर

सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, सदोषरहित आणि गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ व ई-केवायसी अभियानाला उत्तम यश मिळत असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यात ई-केवायसीचे ८३.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका ८६.५४ टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. जिल्हा प्रशासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. तालुकानिहाय ई-केवायसी पूर्णतेची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. वाळवा ८६.५४ टक्के, कवठेमहांकाळ ८४.७३ टक्के, मिरज ८४.५८ टक्के, जत ८४.३४ टक्के, विटा-खानापूर ८३.७९ टक्के, सांगली ८२.७५ टक्के, तासगाव ८२.७१ टक्के, पलूस ८२.५१ टक्के, कडेगाव ८३.०६ टक्के, शिराळा ७९.६९ टक्के आणि आटपाडी ७९.२५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘मिशन सुधार’ अंतर्गत रास्त भाव दुकाने व शिधापत्रिका व्यवस्थापनाशी संबंधित माहिती शासनाकडून पुरविण्यात आली आहे. यामध्ये Gross Turnover (उलाढाल), Income Group (उत्पन्न गट), Individual as Director (संचालक म्हणून व्यक्ती), PFMS व Postal Services आदी निकषांच्या आधारे पात्र व अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येत आहे. अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना शुभ्र शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ‘GIVE IT UP’ अभियानांतर्गत उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनी अन्न सुरक्षा योजनेतून स्वतःहून नाव कमी करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीचा कारभार अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासाठी महसूल व पुरवठा यंत्रणा कटिबद्ध आहे. ज्या तालुक्यांमध्ये काम प्रलंबित आहे, तेथील अधिकाऱ्यांना हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित काम निश्चित मुदतीत पूर्ण करून सांगली जिल्ह्याला १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे नेण्याचे ध्येय पुरवठा विभागाने ठेवले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

पीकपंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता यंत्रणांना सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

- आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, धावडवाडी येथे पिकांची पाहणी सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार यावर्षी आटपाडी तालुक्यात खरीप हंगाम २०२६ साठीची कळ एक लागू झाली असून, दुष्काळी परिस्थितीमध्ये शासनाच्या आदेशानुसार महसूल, कृषी व अन्य संबंधित यंत्रणा जलद गतीने कार्यवाही करत आहे. ही कार्यवाही वेळेत पूर्ण होण्यासाठी शेतकरी बांधवांनी यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज केले. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, धावडवाडी येथे दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार शितल बंडगर, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बाधित खातेदार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, शासनाच्या सूचनेप्रमाणे १० दिवसात पीक पंचनाम्याचे काम पूर्ण करायचे आहे. मात्र इथे काही स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे विविध कागदपत्रांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यांना अशा अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन करून त्यांनी शेतकऱ्यांनी फक्त आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स आणि फार्मर आयडी एवढीच कागदपत्रे द्यायची असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्याला वैयक्तिक काहीच करायची गरज नसून, पीकपंचनाम्याची सर्व कार्यवाही शासकीय यंत्रणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, सद्यस्थितीत आटपाडी तालुक्यामध्ये पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडले गेले आहे. त्याच्यामुळे तालुक्यात फक्त 5 टँकर चालू आहेत. मागणीनुसार टँकरमंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असून नागरिक व जनावरांना पिण्याचे पाणी तसेच जनावरांना चारा कमतरता भासू नये या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान तसेच पिण्याचे पाणी व चाऱ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. ०००००

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका … पिण्याच्या पाण्यासह चारा उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

- जत तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ व माडग्याळ येथे पिकांची पाहणी सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. नागरिक व पशुधनासाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज दिली. जत तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ व माडग्याळ येथे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान तसेच पिण्याचे पाणी व चाऱ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, संख अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नायब तहसिलदार श्री. धोडमाळ, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बाधित खातेदार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, व्हसपेठ परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन दिवसापूर्वी म्हैसाळ योजनेचे पाणी व्हसपेठ तलावात भरून घेण्यात येत आहे. त्याचा उपयोग परिसरातील सुमारे 10 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी करता येणार आहे. जत तालुक्यातील विविध तलावांमध्ये उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. पिकांचे पंचनामे व पीक कापणी प्रयोग सुरू जत तालुक्यात खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार शेतजमिनींच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. जत हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून, महसूल व कृषी विभागाच्या पथकांकडून प्रत्यक्ष शेतनिहाय पाहणी करून नुकसानीची नोंद घेण्यात येत आहे. मका, मूग, उडीद यासह विविध पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे, त्यांच्यासाठी पीक कापणी प्रयोगही सुरू करण्यात आले आहेत. पंचनाम्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. मागेल त्याला टँकर जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी स्तरावर देण्यात आले असून, टँकरची मागणी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत तातडीने कार्यवाही करता येणार आहे. टँकर भरण्यासाठी आवश्यक पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे. पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाचे संरक्षण करणे महत्त्वाचे असून, पशुधनासाठी पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला असून, ज्या भागातून चाऱ्याची अथवा चारा बियाण्याची मागणी प्राप्त होईल, त्या भागात आवश्यकतेनुसार चारा व चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले. अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जत तालुका मोठा असल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे. तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या अडचणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. पिण्याचे पाणी, चारा किंवा पिकांच्या नुकसानीसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शेतकऱ्यांचे नुकसान व अडचणी दूर करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी स्पष्ट केले. 000000