सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

मिरज विधानसभा मतदारसंघात 12 ते 14 ऑगस्टदरम्यान एसआयआरसाठी विशेष शिबिराचे आयोजन

सांगली, दि. 10 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शिल्लक राहिलेल्या मतदारांचे गणना फॉर्म (Enumeration Form-EF) भरून घेण्यासाठी दि. 12, 13 व 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत तहसील कार्यालय, मिरज येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया यादव यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मतदारसंघातील ज्या मतदारांनी अद्याप गणना फॉर्म भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा केलेला नाही, अशा सर्व मतदारांनी शिबिराचा लाभ घेऊन आपला गणना फॉर्म भरून पुढील कार्यवाहीसाठी जमा करावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजना उंबरहांडे, उपायुक्त स्मृती पाटील व गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने दि. 14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्रासह 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदारांना गणना फॉर्मचे वाटप, त्याची ERONET प्रणालीमध्ये नोंद, भरलेले फॉर्म स्वीकारणे, स्कॅनिंग व अपलोडिंग आदी कार्यवाही करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या दि. 5 ऑगस्ट 2026 रोजीच्या सुधारित निर्देशांनुसार ही कार्यवाही दि. 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. मिरज मतदारसंघातील गणना फॉर्मच्या डिजिटायझेशनचे काम 94.76 टक्के पूर्ण झाले असून 5.24 टक्के काम शिल्लक आहे. शिल्लक कामामध्ये अद्याप गणना फॉर्म जमा न केलेले मतदार तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मयत, दुबार अथवा अन्य ठिकाणी मॅप झालेले मतदार असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर शिल्लक राहिलेल्या मतदारांनी दि. 12, 13 व 14 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय, मिरज येथे आयोजित शिबिरात गणना फॉर्म घेऊन उपस्थित राहावे. शिबिरात संबंधित भागाचे BLO, BLO पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) तसेच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले बूथ लेव्हल एजंट (BLA) उपस्थित राहणार आहेत. गणना फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरणही या शिबिरात करण्यात येणार आहे. शिल्लक राहिलेल्या सर्व मतदारांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपला गणना फॉर्म वेळेत जमा करावा, जेणेकरून आगामी मतदार यादीतील नोंदणीची कार्यवाही पूर्ण करता येईल, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा