मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशअर्जाची 15 सप्टेंबर मुदत
सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी दि. 15 सप्टेंबर 2026 अखेर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज ७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्वीकारले जाणार असून, प्रवेशाची यादी २२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत. वसतिगृहामध्ये भोजन, निवास, निर्वाह भत्ता, आवश्यक स्टेशनरी इत्यादी सोयी - सुविधा मोफत उपलब्ध आहेत. मात्र, गुणवत्तेनुसार अथवा जागा रिक्त नसल्याने विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यास स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही. मात्र, त्यासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी दि. 15 सप्टेंबर 2026 अखेर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नवीन शासन नियमानुसार स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या महाविद्यालयाच्या नजिकच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलवर https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार अथवा जागा रिक्त नसल्याने विद्यार्थी/विद्यार्थिनीस शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास अशा विद्यार्थी/विद्यार्थिनींना स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना स्वाधार योजना व वसतिगृह या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच चालू शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेस थेट अर्ज करता येणार नाही. तसेच ता. शिराळा, जि. सांगली येथे मुलींचे शासकीस वसतिगृह नसल्याने त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी हा नियम शिथिल करण्यात येत आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा