सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६
शाश्वत जलसमृद्धीसाठी जलयुक्त शिवार अभियान
जलसंधारण सप्ताह विशेष लेखमाला भाग 1
राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानाचा गाभा केवळ नवीन जलस्रोत निर्माण करणे हा नाही. गावातील उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाणलोट क्षेत्राचा विकास, नाला खोलीकरण, बंधारे, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, मृदसंधारण आणि भूजल पुनर्भरण अशा विविध उपाययोजनांचा एकात्मिक वापर हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे.
शासनाने 2015 ते 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला. जलयुक्त शिवार अभियानामध्ये एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी करून नियोजनबद्धरित्या कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात आली. ही कामे केंद्र / राज्य सरकार / DPDC च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात आली. तसेच लोकसहभाग, विविध कंपन्यांकडून CSR, अनेक मंदिर न्यासाकडूनही निधी प्राप्त झाला.
पहिल्या टप्प्यात विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे एकूण 22,593 गावांत मोहीम स्वरूपात राबविण्यात आली. यामध्ये 6,32,896 कामे पूर्ण झाली असून 20,544 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. अभियानांतर्गत झालेल्या कामामुळे जवळपास 27 लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण होऊन सुमारे 39 लाख हेक्टर शेतीसाठी संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. या अभियानाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या जनचळवळीतून कृषि क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्यास मदत झाली.
जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे जलसंधारणासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आदर्श गाव योजना अशा काही योजना राबविल्या गेल्या. या सर्व योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये झालेल्या कामांची देखभाल दुरुस्ती करणे, मूलस्थानी जलसंधारणाचे उपचार राबविणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविण्याच्या अनुषंगाने जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा गेली तीन वर्षे राबवण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षरता द्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर या करीता प्रयत्न करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करणे हे उद्दिष्ट ठेवून दुसरा टप्पा राबवण्यात येत आहे.
सामूहिक सिंचन सुविधा
शेतकऱ्यांना सामूहिक सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. सामूहिक सिंचन सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र राहतील. किमान 20 शेतकरी व सिंचनाखाली येणारे 20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. सामूहिक सिंचन योजनेसाठी प्रति हेक्टरी 1 लाख रुपये किंवा जास्तीत जास्त 25 लाख रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येईल. तसेच सामूहिक सिंचन सुविधेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा वापर बंधनकारक असून, ठिबक सिंचनासाठी PMKSY मधून प्राधान्याने अनुदान देण्यात येते.
प्लास्टीक अस्तरीकरण असलेल्या शेततळ्यामध्ये पाणी भरणे व पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी साठवण तलाव निर्माण करणे या बाबीही दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात आल्या आहेत.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या आढावा, सनियंत्रण व प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
एकूणच आज हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पावसाचे स्वरूपही बदलत आहे. काही वेळा कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तर काही काळ पावसाचा खंड पडतो. त्यामुळे पाऊस पडला की वाहून जाऊ देण्याऐवजी तो अडविणे आणि जमिनीत मुरविणे हा शाश्वत विकासाचा मार्ग आहे. जलयुक्त शिवार अभियानातून हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढच्या पिढीसाठी जलसमृद्ध भविष्य घडवण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब गावाच्या शिवारात अडवूया, जमिनीत जिरवूया असा संकल्प करूया.
(संकलन - संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा