शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६
मुद्देमाल हस्तांतरणातून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दृढ - विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा
- चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरीत
- 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी परत
- 283 मोबाईल, 24500 किलो बेदाण्याचा समावेश
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास कार्यरत असलेल्या पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमानुसार हस्तांतरण करण्यासाठी घेण्यात आलेला मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम हा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या विश्वासाला बळ देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खरे क्लब हाऊसच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी व मुद्देमालाचे विश्वस्त-मालक उपस्थित होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा या दोन्ही बाबींसाठी पोलीस दल कर्तव्यदक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्र शासनाचे पोर्टलच्या माध्यमातूनही कार्यवाही केली जात आहे. आज 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी व 283 मोबाईल आणि 24500 किलो बेदाणा असा जवळपास 4 कोटी रूपयांचा मुद्देमाल परत देण्यात येत आहेत. या माध्यमातून नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास निश्चितच वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले.
नागरिकांनीही दक्ष राहून गुन्हा घडला तर 112 क्रमांकावर तक्रार करावी. तपासासाठी सहकार्य व पाठपुरावा करावा, असे स्पष्ट करून विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरणाचे उद्दिष्टनिहाय काम करावे. महिनावार संबंधितांचे ऐवज परत करावेत. आपल्या माध्यमातून संबंधित पीडिताला दिलासा द्यायचे काम होते, याची जाणिव ठेवून पोलीस दलावरील नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे सांगून त्यांनी गुन्ह्याचा योग्य वेळी छडा लावून, मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल व सदर मुद्देमाल हस्तांतरणाचा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि गुन्हे अन्वेषण हे पोलिसांचे प्रमुख काम असले तरी गुन्ह्यातील संपत्ती संबंधितास परत केला तर पीडितास खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. दागिने हा केवळ ऐवज नसून, संबंधितांची भावनिक गुंतवणूक त्यात झालेली असते. मूर्ती, दागिने यांना सांस्कृतिक महत्त्वही असते. त्यामुळे हा मुद्देमाल परत करताना संबंधिताचे भावनिक मूल्य परत केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविकात अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. आभार मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी मानले.
पोलिसांप्रती कृतज्ञता
कवठेमहांकाळचे डॉ. म्हेत्रे यांच्या घरात 14 सप्टेंबर 2025 रोजी स्पेशल 26 या चित्रपटासारखी घटना घडली. त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचा चमू आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी दोन ते तीन दिवसात मुद्देमाल परत मिळवला. आज त्यांना तो परत देण्यात आला. याबद्दल त्यांनी पोलीस विभागातील सर्व टीमचे आभार व्यक्त केले.
रमाबाई शिवाजी गायकवाड (रा. बाणूरगड) यांचे गंठण हा त्यांच्यासाठी केवळ दागिना नव्हता. त्यांच्या वडिलांनी दिलेले आशीर्वाद होते. त्यामुळे दीड वर्षापूर्वी जेव्हा गंठण हरवले, तेव्हा त्या व्यथित झाल्या. आज त्यांना गंठण परत सुपूर्द केल्यानंतर त्यांनी पोलीस विभागाचे विशेष आभार व्यक्त केले.
बिरोबा देवस्थानचे दागिने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवले जात असत. मात्र, साधारण सहा महिन्यांपूर्वी त्या बँकेच्या शाखेतच दरोडा पडल्याने देवस्थानचे दागिने लुटले गेले. सांगली जिल्ह्यामध्ये घडलेल्या या मोठ्या चोरीचा छडा जिल्हा पोलीस दलाच्या नेतृत्त्वाखाली दोन महिन्यातच लावला गेला. हा मुद्देमाल आज परत ताब्यात देण्यात आला. त्यासाठी बिरोबा देवस्थान व ट्रस्टच्या वतीने विभूतवाडीचे माजी सरपंच व देवस्थानचे पुजारी चंद्रकांत पावणे यांनी पोलीस दलाचे आभार मानले.
एकूणच सांगलीसारख्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातत्याने आव्हाने असलेल्या जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया न राहता पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख पोलीस व्यवस्थेचा संदेश देणारा ठरला आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा