गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६
कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
सांगली, दि. 13, (जि. मा. का.): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या वतीने श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब व समाजावरही विपरीत परिणाम होतो. नशामुक्त भारताच्या उद्देशाने नागरिकांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती सर्वांनी केले पाहिजे. तरुण पिढी ही देशाची भविष्यातील ताकद असल्याने विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले.
या शिबिरात लोकअभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य न्यायरक्षक अॅड. सम्राट कोकाटे यांनी रॅगिंगविरोधी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी मुलींना तुमच्या सोबत रॅगिंग घडत असेल तर तुमच्या वरिष्ठांना याची कल्पना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे प्रा. प्रशांत जरंडीकर, यांनी सायबर क्राईमबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मोबाईलव्दारे होणारे सायबर क्राईम कसे होतात याचे माहिती दिली. त्यांनी उपस्थितांना विविध सायबर क्राईमचे प्रकार सांगितले. डिजीटल मीडियावरुन माध्यमाव्दारे इतर अनोळखी व्यक्तींना देवाणघेवाण करु नये आणि फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. आर. व्ही. कुपवाडे यांनी स्वागत केले. उपप्राचार्य एम. बी. मोहिरे यांनी प्रास्ताविक केले, तर पर्यवेक्षक डॉ. बी. बी. पाटील यांनी उपस्थितांची ओळख करून दिली. श्रीमती पाटील व श्रीमती ऐनापुरे यांनी सूत्रसंचालन केले. पी. जे. मगदूम यांनी आभार मानले. शिबिरास एकूण १६८ विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा