शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६
जतच्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन -वाहनांची फिटनेस तपासणी होणार अधिक पारदर्शक
सांगली, दि. 14 (जि.मा.का.): उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जत येथील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे (Automatic Testing Station – ATS) भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वाहनांची फिटनेस तपासणी अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जतचे उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वाहनचालक आणि वाहनमालकांना वाहनांची आवश्यक तपासणी करून घेण्यासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आतापर्यंत वाहनांची फिटनेस तपासणी अनेक वर्षे मॅन्युअल पद्धतीने केली जात होती. या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता होती. त्यामुळे केंद्र सरकारने वाहनांची फिटनेस तपासणी स्वयंचलित पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र असावे, या उद्देशाने ही व्यवस्था निर्माण केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर जत येथे अतिरिक्त स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र मंजूर झाले असून, त्याच्या उभारणीसाठी आज भूमिपूजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
संबंधित कंत्राटदाराने केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कालमर्यादेचा विचार करून काम तातडीने सुरू करावे. हे केंद्र शक्य तितक्या लवकर कार्यान्वित झाल्यास वाहनचालक व वाहनमालकांना मोठी सुविधा उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
स्वयंचलित चाचणी केंद्रात वाहनाच्या विविध तांत्रिक बाबी मशीन / संगणकाच्या सहाय्याने तपासल्या जाणार आहेत. वाहनांची रस्त्यावर धावण्यास योग्यस्थिती (Fitness) तपासण्या, प्रदूषण नियंत्रणास मदत करणे, वाहनांच्या ब्रेक, स्टीयरिंग, दिवे, टायर इ. ची वस्तुनिष्ठ तपासणी करणे. मानवी हस्तक्षेप कमी करून पारदर्शक वाहन फिटनेस तपासणी करणे. जुन्या व धोकादायक वाहनांचे योग्यरित्या परिक्षण करणे, रस्ता सुरक्षा सुधारण्यास मदत करणे आदी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे प्रमुख उद्देश आहेत.
ATS मध्ये ब्रेक कार्यक्षमता,स्टीयरिंग व सस्पेशन, हेड लॅम्पस् / लाईटस्, टायर / चाके, वाहनांचे उत्सर्जन / प्रदूषण, हॉर्न, वाहनांची एकूण तांत्रिक स्थिती आवश्यक कागदपत्रे यांची तपासणी होणार आहे.
महाराष्ट्रात वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र महत्त्वाचे आहे. विशेषत: व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीमध्ये स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने तीन नवीन ठिकाणी जत, इचलकरंजी, पुणे स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र म्हणजेच गाड्याची कॉम्युटरव्दारे तपासणी करणारी केंद्रे उभारण्यासाठी Sarvasya Merchandisers PVT LTD या कंपनीला 5 वर्षाचा ठेका दिला आहे.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा