बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६
सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा - अध्यक्ष शेरसिंग डागोर
सांगली, दि. 12 (जि. मा. का.) : सफाई कर्मचाऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक व सेवा विषयक प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहून त्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादा आखून मार्गी लावावेत. लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा. सफाई कामगारांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी आज येथे दिले.
सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अध्यक्ष श्री.डागोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व शासकीय विश्रामगृह येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची व प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतली.
अध्यक्ष शेरसिंग डागोर म्हणाले, सफाई कर्मचारी हा शहराच्या स्वच्छतेचा महत्त्वाचा आधार असून त्यांच्या श्रमाला सन्मान मिळणे आणि त्यांना सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण मिळणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता मानवी दृष्टिकोनातून पाहावे, असे ते म्हणाले.
अध्यक्ष शेरसिंग डागोर म्हणाले, जि्ल्हा प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महापालिका, नगरपालिका स्तरावर व्यापक शिबिरांचे आयोजन करावे. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी. शिबिराच्या आधी योजनांच्या अर्जासोबत जोडावयाच्या आवश्यक कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, जेणेकरून शिबिरावेळी प्रत्यक्ष लाभ देणे सुलभ होईल. अशा शिबिरांच्या आयोजनात सामाजिक संघटनांना सहभागी करून घेतल्यास तळागाळापर्यंत पोहोचता येईल. तसेच, शासकीय कार्यालयातही यासंबंधीच्या सर्व शासकीय निर्णयांबाबत कार्यशाळा घेऊन माहिती द्यावी, असे ते म्हणाले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काने नियुक्तीशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या अनुषंगाने अध्यक्ष शेरसिंग डागोर म्हणाले, लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. या संदर्भात प्रलंबित प्रकरणांच्या अनुषंगाने लागू असलेल्या शासन निर्णयांचा अभ्यास करून पात्र प्रकरणांमध्ये नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी. कोणतेही प्रकरण अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नये, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. सफाई कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक प्रश्न, वारसा हक्काने नियुक्ती, पुनर्वसन, सुरक्षितता, आरोग्यविषयक सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिंबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा