शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५
गदिमा : शब्दसृष्टीचे ईश्वर
नवी दिल्ली येथे येत्या दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 1954 साली नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. या अनुषंगाने कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दल प्रकाशझोत टाकणारा लेख…
गदिमा : शब्दसृष्टीचे ईश्वर
आता वंदू कवीश्वर
ते शब्दसृष्टीचे ईश्वर
असे समर्थ रामदासांनी कवींच्या बाबत म्हटलेले आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो ते कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर हे खरोखरच शब्दसृष्टीचे ईश्वर होते. त्यांना शब्दांचे अक्षरशः वरदान होते. त्यांना एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की "अण्णा, तुम्हाला असे अचूक, समर्पक आणि चपखल असे शब्द त्या त्या ठिकाणी कसे सुचतात ?" त्यावेळी अण्णा म्हणाले होते, "मला स्वत:लाही त्याबद्दल आश्चर्य वाटते. मात्र माझ्यासमोर शब्द अक्षरश: फेर धरून नाचतात आणि 'मला घ्या मला घ्या, माझा कवितेमध्ये उपयोग करा' असे जणू म्हणतात". इतकी शब्दांवर अण्णांची हुकमत होती.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माडगूळ नावाचे गाव आहे. ते अण्णांचे गाव. आजही तेथे अण्णांच्या आठवणी सांगणारे काहीजण भेटतात. अण्णा त्यांच्या शेतामध्ये बसून शब्दसाधना करीत असत. त्या ठिकाणाला बामणाचा पत्रा असे म्हटले जाते. ते बामणाचा पत्रा हे ठिकाण आजही आपल्याला तेथे पहायला मिळते.
अण्णा हे स्वातंत्र्यसैनिक. महात्मा गांधीजींच्या आदेशाने ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात त्यावेळी उडी घेतली, त्यामध्ये अण्णा अग्रेसर होते. त्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात कलावंतांनी ठिकठिकाणी मेळे सुरू केले होते. या मेळ्यांमध्ये कथानक असे. तसेच ते कथानक विविध गीतांनी सजवलेली असे. स्वातंत्र्ययुद्ध, समाजासमोरचे प्रश्न, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले प्रतिसरकार, ब्रिटिशांच्या दंडुकेशाहीचा आणि समाजातील सावकारशाहीचा बिमोड असे अनेक विषय या गीतांमधून मांडले जात असत.
काँग्रेस सेवादलाच्या अनेक बैठका सांगली जिल्ह्यात (त्यावेळचा सातारा जिल्हा) त्यावेळी होत असत. विशेषतः आटपाडी, कुंडलमध्ये अशा बैठका सातत्याने होत असत. कारण कुंडल हे त्यावेळी औंध संस्थानमध्ये होते. त्या संस्थाचे अधिपती श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचा स्वातंत्र्ययुद्धाला पूर्ण पाठिंबा होता. अण्णा स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक बैठकांना हजर असायचे. क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, शाहीर शंकरराव निकम असे त्यावेळी हजर असायचे. पूज्य साने गुरुजीही अशा बैठकांसाठी यायचे आणि त्यावेळी सेवादलाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायचे. अण्णा अनेक स्फूर्तीदायक अशी गीते रचत असत. त्या गीतांचे गायन त्यावेळी अतिशय प्रसिद्ध असलेल्या मेळ्यांमध्ये आणि काँग्रेस सेवादलाच्या बैठकांमध्ये आंदोलनांमध्ये होत असे. त्या गीतांमुळे स्वातंत्र्यसैनिकांना प्रेम मिळत असे.
अण्णांनी नंतर मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन तसेच पटकथालेखन सुरू केले. अतिशय भावमधुर अशी गीते अण्णांनी लिहिलेली आहेत. 'नाच रे मोरा आंब्याच्या वनात', हे गीत आजही म्हणजे जवळजवळ 60 ते 65 वर्षानंतरही लोकप्रिय आहे. तमाशाप्रधान, सामाजिक समस्याप्रधान किंवा संतांच्या जीवनावरचे चित्रपट यासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांनाही रसिकांची उदंड पसंती मिळाली.
तमाशाप्रधान चित्रपटातही अण्णांनी अनेक सुंदर अशा लावण्या लिहिल्या की त्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. 'ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी कुणी काढली, बाई माझी करंगळी मोडली', 'बाई मी पतंग उडवीत होते' किंवा 'काठेवाडी घोड्यावरती' अशा त्यांच्या अनेक लावण्या गाजलेल्या होत्या. त्याचवेळी अतिशय नितांत सुंदर आणि समाजाचे उद्बोधन करणारी गीतेही त्यांनी चित्रपटांसाठी तसेच नाटकांसाठीही लिहिली होती.
प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांनी तयार केलेल्या अनेक चित्रपटांचे पटकथा, संवाद आणि गीतलेखन अण्णांनी केले होते. 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातील त्यांची सगळी गाणी आजच्या भाषेत सांगायचे तर अक्षरशः हिट झाली होती. 'तुला पाहते रे तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते रे', 'जग हे बंदीशाळा', 'थकले रे नंदलाला' अशी त्या चित्रपटातील गीते अक्षरश महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यावेळी गाजत होती. आजही त्या गीतांची गोडी आहे. अनेक संतांच्या जीवन चरित्रावरील चित्रपटांसाठी अण्णांनी गीते लिहिली आणि तीही तेवढीच मधुर आहेत. संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली 'उठ पंढरीच्या राजा, वाढवेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला', तसेच समचरण सुंदर, कासे ल्याला पितांबर' ही गीते अतिशय लोकप्रिय झाली होती. संत दामाजीपंत यांच्या जीवनावरील चित्रपटात गदिमांनी लिहिलेले 'निजरूप दाखवा हो, हरिदर्शनासी याहो' हे गीतही असेच गाजले होते.
गदिमांनी अनेक लघुनिबंध लिहिले आहेत. विशेषतः हस्ताचा पाऊस, जांभळाचे दिवस अशी त्यांची लघु निबंधांची पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. अतिशय सहज सोपी शैली आणि लोकांना समजेल असे लेखन हे त्यांच्या साहित्याचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ठ्य आहे. ते नेहमी असे म्हणायचे की माझे लेखन हे सर्वसामान्य लोकांना कळले पाहिजे. केवळ विद्वान किंवा खूप शिकलेल्या लोकांसाठीच नव्हे; तर अगदी खेड्यापाड्यातील सामान्य लोकांसाठी मला लिहायचे आहे.
अण्णांच्यावर लहानपणापासून कीर्तन, तमाशा, भजन, प्रवचन यांचा मोठा प्रभाव झाला होता. संतांच्या साहित्याचे त्यांनी उदंड वाचन केले होते. संत ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत एकनाथ, संत रामदास अशा संतांच्या साहित्याचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. उत्तर भारतातील प्रसिद्ध संत कबीर, तुलसीदास, सूरदास आणि मीराबाई यांच्या साहित्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. साहजिकच त्यांच्या कवितेवर या सर्वांच्या प्रतिमासृष्टीचा आणि प्रतिभेचाही निश्चितच परिणाम झालेला आहे. साहजिकच त्यांची शब्दकळाही त्यामुळे अतिशय ओघवती आणि समृद्ध अशी बनलेली होती.
1952 च्या दरम्यान अण्णांच्या साहित्यिक जीवनात एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आला. तो टप्पा म्हणजे गीत रामायण महाकाव्य. या गीत रामायणाने अफाट लोकप्रियता मिळवली. या गीत रामायणामधील अनेक गाणी ही आठ नऊ कडव्यांचीसुद्धा आहेत. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे गायन आणि गदिमांची शब्दसंपत्ती यामुळे गीतरामायण हे महाकाव्य अक्षरशः प्रचंड लोकप्रिय झाले. त्यावेळी आकाशवाणीच्या पुणे आणि मुंबई या केंद्रावरून या गीत रामायणाचे कार्यक्रम प्रथम प्रसारित झाले होते. त्याची ठराविक वेळ असायची. पहिल्या दोन-तीन दिवसातच या गीत रामायणाबद्दल लोकांना श्रद्धा आणि प्रेम वाटू लागले. तेव्हा रेडिओ फार कमी होते. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या एखाद्या घरात रेडिओ असे. त्या घरात आसपासचे लोक तिथे जमायचे आणि त्या रेडिओची अक्षरशः फुले वाहून आणि त्याच्यासमोर उदबत्ती लावून पूजा करायचे. मग गीत रामायण - ऐकायचे. म्हणजे लोकांनी गदिमांच्या या महाकाव्यावर किती प्रेम केले, किती श्रद्धा ठेवली हे आपल्याला यावरून कळून येईल.
गदिमांनी विपुल लेखन केले आहे. कथा, कविता, नाटक, चित्रपट कथा त्यांनी अनेक लिहिल्या. परंतु असे म्हणतात की गदिमांनी फक्त गीत रामायण जरी लिहिले असते तरीसुद्धा त्यांची कीर्ती दिगंत झाली असती. गीत रामायणामध्ये गदिमांनी अनेक ठिकाणी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. वनवासात असताना अयोध्येचा राजा भरत हा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी येतो. त्यावेळी त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्याला अतिशय हळुवार अशा शब्दात उपदेश केला. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हेच ते प्रसिद्ध गीत आहे. गीत रामायणातील अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत. आजही त्या गीतांचे सातत्याने स्वतंत्र कार्यक्रम होतात. गदिमांच्या या गीतरामायणामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी अशी पदवी मिळाली आणि ती सार्थ अशी आहे.
- प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी
(लेखिका प्राध्यापक आहेत)
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५
साहित्य सोनियाच्या खाणी
नवी दिल्ली येथे येत्या दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 1954 साली नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील साहित्य, साहित्यिक व साहित्य चळवळीवर प्रकाशझोत टाकणारा लेख…
साहित्य सोनियाच्या खाणी
सांगली जिल्ह्याची वाङमयीन परंपरा उज्ज्वल आणि अभिमानास्पद आहे. अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत.
सुप्रसिध्द इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे हे लेखक केशवसुतांचे समकालीन होते. 'समुद्र' हे 132 श्लोकांचे त्यांचे दीर्घकाव्य 1884 साली प्रकाशित झाले. यशवंतराव होळकरांच्या जीवन आणि कर्तृत्वाचे वर्णन करणारे यशवंतराव हे खंडकाव्य 1888 साली प्रकाशित झाले. गुणोत्कर्ष, तारामंडल, चित्रवंचना, कृष्णकांचन, उग्रमंगल आणि शिवसंभव ही त्यांची गाजलेली नाटके. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनादिनी (1 मे 1960) चित्रपती व्ही. शांताराम यांनी बाबूराव पेंढारकरांच्या सहकार्याने 'शिवसंभव' चा मुंबईमध्ये भव्य स्वरूपाचा प्रयोग केला होता. मिरजेचे खरे वाचन मंदिर हे त्यांच्या कार्याचे स्मारक आहे. या ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी होणारी वसंत व्याख्यानमाला एक जुनी आणि नामवंत व्याख्यानमाला असून महाराष्ट्रातल्या नामवंत लेखक, वक्ते, विचारवंत इत्यादिंना या ज्ञानयज्ञातून ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळत असते.
राजकवी साधुदास हे सांगली संस्थानातले एक आदरणीय कवी होते. 'विहार', 'वनविहार', 'रणविहार' अशी त्यांनी रामायणावर आधारित महाकाव्य रचना केली. पेशवे काळावरच्या पौर्णिमा', 'प्रतिपदा' आणि व्दितिया या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत. काव्यविहारी (गद्रे) हे यानंतरचे एक महत्त्वाचे कवी होते. रविकिरण मंडळाच्या काव्यदृष्टीचा आणि रचनापध्दतीचा त्यांच्या काव्यलेखनावर प्रभाव होता. 'काव्यविहार', 'स्फूर्तिलहरी', 'स्फूर्तिनिनाद', 'स्फूर्तिविलास' हे त्यांचे काव्यसंग्रह असून नाट्य सुगंध आणि नाटककार देवल व्यक्ती आणि वाङमय हे त्यांचे नाट्यसमीक्षा ग्रंथही प्रसिध्द आहेत.
विलिंग्डन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य गो. चिं. भाटे यांची 'प्रेम की लौकिक' ही कादंबरी विषयाच्या वेगळेपणामुळे तत्कालीन कादंबरी विश्वात गाजली होती. त्यांनी प्रवास वर्णन हा वाङमय प्रकारही प्राचुर्याने हाताळला. कानडी वाड्.मयात मोलाचे योगदान देणारे प्राचार्य गोकाक आणि प्राचार्य मुगळी यांची वाङमयीन कारकीर्द इथेच बहरली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे प्राथमिक शिक्षणही मिरजेच्या शाळा नं. 1 मध्ये झाले.
उद्योग आणि उन्नतीचे संस्कार मराठी मनावर घडवणारी आणि नव्याने उदयाला येत असलेल्या शिक्षित मध्यमवर्गाची वैचारिक आणि वाङमयीन अभिरूची घडवणारी 'किर्लोस्कर', 'स्त्री' आणि आणिवा ही सुप्रसिध्द मासिके सुरवातीला अनेक वर्षे या जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीतून प्रकाशित होत होती. नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांना अत्यंत महत्वाचे असे स्थान आहे. मासिकांचे संस्थापक संपादक शंकरराव किर्लोस्कर आणि नंतरचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचे या संदर्भातले योगदान मौल्यवान आहे.
कवी सुधांशु आणि कथाकार म. भा. भोसले यांनी औदुंबर येथे सुरू केलेले सदानंद साहित्य संमेलन सत्तर वर्षांहून अधिक काळ अखंडपणे दरवर्षी मकर संक्रातीच्या दिवशी भरत असते. महाराष्ट्रातल्या मुख्य साहित्य संमेलनांव्यतिरीक्त ग्रामीण भागात भरणारे महाराष्ट्रातले हे पहिले साहित्य संमेलन होय. या संमेलनाला महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व ख्यातनाम लेखक, कवी, नाटककार, ललित लेखक, समीक्षक अध्यक्ष म्हणून हजर राहिले आहेत. जिल्हास्तरावरची सर्वात जास्त म्हणजे जवळपास 16 साहित्य संमेलने सांगली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी नियमितपणे भरत असतात. मराठीतले मान्यवर ज्येष्ठ लेखक या संमेलनांना अध्यक्ष म्हणून आवर्जून येत असतात.
स्फुटकाव्य आणि खंडकाव्य लिहिणारे रविकिरण मंडळाचे एक संस्थापक सदस्य कवी गिरीश (शं. के कानेटकर) यांचे सांगलीमध्ये वास्तव्य होते. त्यांचे सुपुत्र आणि पुढे महाराष्ट्रातले एक ख्यातनाम नाटककार म्हणून प्रसिध्दी पावलेले वसंत कानेटकर यांचे शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले आणि आपल्या काही महत्त्वाच्या नाटकांचे लेखनही त्यांनी इथेच केले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे हेही विलिंग्डन महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी सांगलीत वास्तव्यास होते. मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि थोर लेखक आणि मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळाला, ते वि. स. खांडेकर मूळचे सांगलीचेच. गणेश आत्माराम खांडेकर हे त्यांचे मूळ नाव. पुढे दत्तक गेल्यावर ते विष्णु सखाराम खांडेकर झाले. त्यांचे शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. नंतरचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विं. दा. करंदीकर यांचे वास्तव्यही शिक्षक म्हणून काही काळ तासगावला होते. सुरवातीच्या कविता त्यांनी इथेच लिहिल्या होत्या. सर्वश्री ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर, ना. सं. इनामदार आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर या सांगली जिल्ह्यातील प्रतिभावंत कवी, लेखक आणि समीक्षकांना मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला.
वंचित, उपेक्षित, बहिष्कृत म्हटल्या गेलेल्या जमातीचे अनोखे दर्शन घडवणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीने बुलंद करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे, लावणीचे अध्वर्यू पठ्ठे बापूराव, अपरिचित अनुभवांचे सशक्त चित्रण करणारे श्री. दा. पानवलकर, दलितांच्या वेदना आणि दुःखांना शब्दरूप देणारे कथाकार बंधुमाधव, ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडणारे चारुता सागर, देवदत्त पाटील, भक्तीरसाचा आविष्कार करणारे कवी सुधांशु, गीतकार पी. सावळाराम, कवी व लोकसाहित्याचे अभ्यासक अशोकजी परांजपे, गीतकार सुधीर मोघे, लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर, तारा भवाळकर, सय्यद अमीन, सुलेखनकार र. कृ. जोशी, जीवनातील विरुपतेचे दर्शन घडविणाऱ्या कमल देसाई, प्राकृत साहित्याचे संशोधक ग. वा. तगारे, पानिपतकार विश्वास पाटील इत्यादींनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने आणि सौंदर्याने सांगली जिल्ह्याचे नाव आणि लौकिक वृध्दिंगत केला आहे. अनिल दामले, शैला सायनाकर, कथाकार वामन होवाळ, कवी अभ्यासक अरुण कांबळे तसेच ललित लेखनाचे नितांत सुंदर रूप दाखवणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी, प्रा, गौतमीपुत्र कांबळे, प्रा. जी. के. ऐनापुरे, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्राप्त वसंत केशव पाटील आणि बलवंत जेऊरकर, प्रा. वैजनाथ महाजन, कमलेश वालावलकर, संजीव खांडेकर यांच्यासारखे अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत.
- अविनाश सप्रे
(लेखक साहित्य अकादमीचे सदस्य आहेत)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)