रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

एक दिवा सैनिकांसाठी - दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात

सांगली, दि. १९ (जि. मा. का.) : 'दिवाळी सकाळ सैनिका परिवारासोबत' साजरी करण्याच्या उद्देशाने सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून 'एक दिवा सैनिकांसाठी' हा अभिनव उपक्रम आज महावीर चक्र विजेते शहीद पांडुरंग साळुंखे संकुल सांगली येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, विंग कमांडर प्रकाश नवले (शौर्य चक्र) (निवृत्त), ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, कर्नल भूषण कल्याणी (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी 'सांगली व्हिजन २०३०' बाबत सर्व सैनिकांना माहिती दिली. देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांचे पाठबळ प्रशासनाला मिळावे, या उद्देशाने माजी सैनिकांनी समाजात सक्रिय कार्य करावे, असे आवाहन केले. सैनिकांप्रती असणारे त्यांचे प्रेम, भावना आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना घेता आला. ग्रुप कॅप्टन श्री. वालवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. भीमसेन चवदार यांनी प्रास्ताविक केले. ध्वज दिन निधीसाठी सुषमा सुरेश बाळ यांनी 1 लाख रूपये, मिलिंद तनवडे यांनी 30 हजार रूपये, ॲड. सत्यजित शेगूंशी यांनी 21 हजार रूपये धनादेश सुपूर्द केल्याबद्दल तसेच प्राचार्य ए.व्ही. कुलकर्णी यांनी 5 लाख रूपयांची सैनिक संकुलात विकास कामे केल्याबद्दल डॉ. चवदार यांनी या सर्वांचे आभार मानून 12 वर्षात प्रथमच ध्वज दिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण गवळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मुलांचे वसतिगृह अधीक्षक गजानन जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला वीरपत्नी, वीरमाता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबित तसेच तालुका निहाय सैनिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक, सैनिकी वसतिगृहातील मुले व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रगीत व राज्य गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिक-अधिकाऱ्यांनी सैनिक परिवारासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. ०००००

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना

जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! - सांगली पॅटर्न - एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !! सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 25 टन पेरू, टोमॅटो व दहा हजार अंडी नेण्यासाठी एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली. आज पहाटे सव्वा पाच वाजता “दर्शन एक्सप्रेस" या रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठविण्यात आली. मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे व समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून “दर्शन एक्सप्रेस" रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. प्रायोगिक तत्वावर फळे, भाजीपाला पाठविला असून तो पुढील काळात बाजार मागणीनुसार दररोज किंवा आठवड्यातून एकदा रेल्वेने पाठविण्याबाबत नियोजन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे व रेल्वे विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते. त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचे ही आभार मानले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार व त्यांचे सर्व अधिकारी श्री. पाटील, श्री. माळी आदींनी यासाठी मेहनत घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 00000

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

- 31 ऑक्टोबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे दिले निर्देश सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत कार्यान्वयीन यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. सन 2025-26 च्या प्रशासकीय मान्यताप्राप्त कामे सुरू करण्याचे आदेश देऊन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत कामांना, योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्याला एक महिना मुदतवाढ मिूळून जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रातील योजनांतर्गत जिल्हास्तरीय कामांकरिता तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित अवधी पाहता व तसेच सुटीचा कालावधी लक्षात घेता सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करावी. यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत जिल्ह्यातील विविध राज्यस्तरीय कार्यान्वयीन यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस दल, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती, अर्थसंकल्पिय तरतूद आदिंचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यातील राज्यस्तर यंत्रणा, जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभाग, महानगरपालिका आदिंसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. 00000

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी - सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे

- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोहीम - 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस - आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : अन्नपदार्थ विक्रेत्यांनी सर्व अन्नपदार्थ चांगल्या, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये बनवून विक्री करावेत. शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. ग्राहकांनीही सतर्क राहून कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी परिमंडळ-1 रा. अ. समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, अन्न व औषध प्रशासन, सांगली यांच्यावतीने सणासुदीच्या पार्श्वभूमिवर दि. 11 ऑगस्ट 2025 पासून सांगली जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जात असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये दि. 11 ऑगस्ट 2025 पासून ते आजपर्यंत अन्न विक्री करणाऱ्या एकूण 174 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दूध 38, खवा मावा 14, तूप 28, खाद्यतेल 36, मिठाई 58, ड्रायफ्रुटस 18, चॉकलेट 20, भगर 14 व इतर अन्नपदार्थ (रवा, बेसन, आटा इत्यादी) चे 43 नमुने असे एकूण 269 अन्न नमुने घेतले असून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीच्या अनुषंगाने 51 अन्न व्यावसायिकांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या असून 09 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, 4 अन्न आस्थापनांच्या तपासण्या करुन 984 लिटरचा व 3 लाख 83 हजार 581 रुपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका अन्न आस्थापनेमधून 46 किलो वजनाचा 14 हजार 375 रुपये किंमतीचा बर्फीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका अन्न आस्थापनेमधून 47.3 किलो वजनाचा 4 हजार 557 रुपये किंमतीचा भगर व भगरपीठाचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ग्राहकांनीही मिठाई व इतर दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर खावून संपवावेत किंवा रेफ्रिजरेटरमध्ये योग्य तापमानास साठवावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे. 00000

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज ग्रंथप्रदर्शन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते होणार उद्घाटन

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा मराठी भाषा समिती व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शन दालन, पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, जुने स्टेशन चौक, सांगली येथे हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते सकाळी 9 वाजता होणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने “घेवूया एकच वसा मराठीला बनवू या ज्ञानभाषा” या संकल्पनेनुसार मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ऐतिहासिक व संदर्भ मूल्य असलेले वैविध्यपूर्ण ग्रंथ या प्रदर्शनात अवलोकनार्थ व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 00000

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण-2025 जाहीर

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : सांगली जिल्‍ह्यातील दहा पंचायत समितीमधील सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्‍हा नियोजन समिती सभागृहात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, तहसीलदार (सर्वसाधारण) लिना खरात आदि उपस्थित होते. आरक्षण सोडतीनुसार पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे. खानापूर-विटा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), मिरज – अनुसूचित जाती (स्त्री), कवठेमहांकाळ – सर्वसाधारण (स्त्री), आटपाडी – सर्वसाधारण, जत – सर्वसाधारण (स्त्री), वाळवा – सर्वसाधारण, पलूस – नागरिकांचा मागास प्रवर्ग, तासगाव – सर्वसाधारण (स्त्री), कडेगाव – सर्वसाधारण, शिराळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग. 00000

वाचन प्रेरणा दिनानिमित्त बुधवारी ऐतिहासिक मूल्य असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दि. 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या औचित्याने मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन व संवर्धन होण्याच्या अनुषंगाने बुधवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, जुने स्टेशन चौक येथे ऐतिहासिक मूल्य असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या. महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2021 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने गठित जिल्हा मराठी भाषा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस तहसीलदार लीना खरात, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, अशासकीय सदस्य अविनाश सप्रे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, महापालिकेचे संतोष बेलवलकर आदि उपस्थित होते. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे नेटके आयोजन करावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, “घेवूया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा” ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून या प्रदर्शनात जिल्ह्यातील ऐतिहासिक मूल्य असलेली ग्रंथसंपदा, संदर्भ मूल्य असलेले ग्रंथ, संस्थानकालिन गॅझेटियर, सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांचे जुने दस्तावेज, महनीय व्यक्तिंकडून स्वाक्षरीत साहित्यसंपदा आदिंचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, शाळांमधील ग्रंथालयांतील ग्रंथसंपदा अवलोकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत शालेय स्तरावरील ग्रंथपालांना सूचित करावे. पीएच. डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले. 00000

फळप्रक्रिया उद्योगातून सांगली जिल्ह्याचा ब्रँड निर्माण करावा - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील फळांवर प्रक्रिया करून सांगली जिल्ह्याचा एक ब्रँड निर्माण करावा. त्यासाठी शासकीय योजनांची मदत घ्यावी. चांगल्या दर्जाचे प्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांना देण्याच्या उपक्रमाला सदैव पाठिंबा राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. कुपवाड येथील पियुष कॅनिंग अँड फ्रुट प्रोसेसिंग युनिट येथे फळे व कृषि मालावरील मूल्यवर्धनाच्या संधी व महत्त्व आणि महिला बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या नवीन संधी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, युनिटच्या प्रमुख मीनल भोसले व प्रतापराव भोसले, प्रतापराव पाटील, बचत गटातील महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महिला उद्योजकांच्या मालाची विक्री व शहरातील बाजारपेठेची अडचण सोडविण्यासाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर काम कसे सोपे होईल याबाबत सांगितले. त्यासाठी लगेचच खरेदीदार, विक्रेत्यांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना यावेळी दिल्या. उत्पादकांच्या पॅकिंगवर “आमची सांगली, आमचा अभिमान” हे ब्रीद वाक्य त्यांनी यावेळी सुचविले. कुंदन शिनगारे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्ह्यातील सुरू असलेल्या बचत गटांच्या उपक्रमांची व प्रकल्पांची माहिती विषद केली. फळ प्रक्रिया, कौशल्य प्रशिक्षण यामध्ये महिलांच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या व्यवसायांची वृद्धी करता येण्याची जिल्ह्याची प्रचंड क्षमता असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविकात मीनल भोसले व प्रतापराव भोसले यांनी पियुष स्कॅनिंग युनिटची गेल्या 30 वर्षातील मूल्यवर्धनातील कामगिरी विषद केली. तसेच बाजारपेठेतील प्रक्रियायुक्त आणि मुख्यतः आंबा, द्राक्षे, पेरू, चिंच, सीताफळ इत्यादी वरील मूल्यवर्धनामुळे किती नफा मिळू शकतो व उच्च दर्जा कसे टिकवता येईल याविषयी माहिती दिली. 00000

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

महिला आयोग आपल्या दारी' बुधवारी सांगली जिल्ह्यात

'महिला आयोग आपल्या दारी' बुधवारी सांगली जिल्ह्यात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन मुंबई दि. 9 ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात बुधवार दि. १५ आँक्टोबर, २०२५ रोजी जनसुनावणी होणार असून, आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर दि. १५ आँक्टोबर, २०२५ रोजी सांगली जिल्ह्यात असणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे. 000000

जिल्हा परिषद निवडणूक विभाग पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत सोमवारी

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषद, 61- निवडणूक विभागाच्या, जिल्हाधिकारी सांगली यांच्यास्तरावर व 10 पंचायत समितीचे, 122- निर्वाचक गणाचे संबंधित तहसिलदार यांच्यास्तरावर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) आरक्षण सोडत दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. यासाठी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निश्चित केलेल्या ठिकाणी सभा होणार आहे. ज्या नागरिकांना या सभेस हजर राहण्याचे आहे त्यांनी संबंधित ठिकाणी विहीत वेळेत हजर रहावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्हा परिषद सांगली साठी एकूण 61 गट असून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सभा होणार आहे. पंचायत समिती निहाय एकूण गण व सभेचे ठिकाण अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – 8 गण, पंचायत समिती आटपाडी येथील बैठक सभागृह, ता.आटपाडी, जि.सांगली. जत – 18 गण, तलाठी भवन, तहसिल कार्यालय जतच्या आवारातील. खानापूर – 8 गण, बैठक सभागृह, तिसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विटा. कडेगाव – 8 गण, बैठक सभागृह, तहसिल कार्यालय कडेगाव, पहिला मजला. तासगाव – 12 गण, शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तासगाव. कवठेमहांकाळ – 8 गण, मा. आर आर (आबा) पाटील सभागृह, पंचायत समिती कवठेमहांकाळ. पलूस – 8 गण, तहसिल कार्यालय पलूस, पहिल्या मजल्यावरील सभागृह. वाळवा – 22 गण, लोकनेते राजारामबापू नाट्यगृह इस्लामपूर. शिराळा – 8 गण, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, तहसिल कार्यालय शिराळा. मिरज – 22 गण, मा. श्री. वसंतरावदादा पाटील सभागृह, पहिला मजला, पंचायत समिती मिरज. वरील नमूद सभेच्या ठिकाणी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

सांगली पॅटर्न - सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!

बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन - जिल्हाधिकारी अशोक काकडे - कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे" सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या सांगली येथील सर्व संस्थेच्या बालगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यासाठी, त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून दिवाळीच्या सजावटीच्या वस्तू तयार करण्यात येत असून त्याचे प्रदर्शन शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला सांगलीकरांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. दिव्यांग विद्यार्थी व इतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीच्या सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व सांगलीकरांसाठी सुरू राहील. या विद्यार्थ्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून त्यांना आपल्या आधाराची व कौतुकाची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी कुटुंबासहित या प्रदर्शनास उपस्थित राहून, स्वतःच्या भविष्याच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या सांगलीमधील दिव्यांग व इतर विद्यार्थ्यांकडून दिवाळीचे साहित्य खरेदी करावे व त्यांना स्वयंरोजगाराच्या वाटेवर चालण्याचा आत्मविश्वास द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. 00000

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

पंचायत समिती सभापती आरक्षण निश्चिती शुक्रवारी

सांगली, दि 6 (जि. मा. का.) : सांगली जिल्‍ह्यातील दहा पंचायत समितीमधील सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालय, सांगली येथील जिल्‍हा नियोजन समिती सभागृह येथे शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता आरक्षण सोडत काढण्याचे निश्चित केले आहे. ज्‍या नागरिकांना सदर सभेस हजर राहणेचे आहे, त्‍यांनी नमूद केलेल्‍या दिनांक, वेळ व ठिकाणी हजर रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समितीचे, सभापती आरक्षण निश्‍चित करणेसाठी महाराष्‍ट्र शासन, ग्रामविकास विभाग, मुंबई यांच्याकडील अधिसूचनेप्रमाणे महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषदा (अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व विषय समित्‍यांचे सभापती) आणि पंचायत समित्‍या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम २ फ यातील तरतुदीनुसार पंचायत समिती सभापतीच्‍या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना प्राप्त आहेत. त्‍यानुषंगाने सांगली जिल्‍ह्यातील १० पंचायत समिती मधील सभापती आरक्षण काढणे आवश्‍यक आहे. हे आरक्षण काढण्यासाठी शासन अधिसूचना लगत अनुसूचीमध्‍ये अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रवर्गासाठी, सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवावयाच्‍या जिल्ह्यातील पंचायत समित्‍यांच्‍या सभापती पदांची संख्‍या ठरवून दिली आहे. त्यानुसार आरक्षणाचा प्रवर्ग व संख्या पुढीलप्रमाणे - अनुसूचित जाती (महिला) – १, नागरिकांचा मागास प्रवर्ग – २, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – १, सर्वसाधारण – ३, सर्वसाधारण (महिला) – ३, एकूण संख्या – १० 00000

अनुकंपा भरतीतून 78 कुटुंबांना मिळाले आर्थिक स्थैर्य आणि जगण्याचा आधार

सांगली, दि 4 (जि. मा. का.) : आपल्या प्रियजनांचा अकाली मृत्यू ही कोणत्याही कुटुंबासाठी मोठी शोकांतिका असते. पण अशा संकटग्रस्त कुटुंबांना शासनाने दिलेली अनुकंपा भरती ही फक्त नोकरी नसून, यातून या उमेदवारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येऊन जगण्याचा आधार मिळणार आहे. शनिवारी सांगली जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वावर 78 उमेदवारांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या 61 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या क्षणाने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले, तर “आजच आमच्या कुटुंबात दिवाळी आली” अशी भावना उमटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवस कार्यक्रमांतर्गत प्रलंबित अनुकंपा प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनेनंतर, ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्यात आली. यातून सांगली जिल्ह्यात गट ‘क’ व गट ‘ड’ मध्ये 78 उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर तर 61 उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अशा एकूण 139 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यासाठी नियुक्त उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा प्रशासनाने मनोमन आभार मानले. मानसिक समाधान मिळाले – श्रेयस मोरे मूळच्या देवराष्ट्रे येथील असलेल्या श्रेयस लालासाहेब मोरे यांना पाटबंधारे विभागात गट क मध्ये दप्तर कारकून पदावर अनुकंपा तत्त्वावर शनिवारी नियुक्तीपत्र मिळाले. शासकीय सेवेत दाखल होत असल्यामुळे मानसिक समाधान मिळाले असल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, माझे वडील लालासाहेब मोरे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा मी नुकताच शासकीय कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. मात्र, वडिलांच्या निधनामुळे आणि मी एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मी घरची शेती करू लागलो. पण, शेती हा व्यवसाय अनिश्चित असल्याने मनात असुरक्षिततेची भावना होती. पण, अनुकंपा भरतीतून मला नियुक्तीपत्र मिळाल्याने आता कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आणि जगण्याचा आधार मिळाला असल्याचे ते म्हणाले. संघर्षास विराम – रत्नाकर कांबळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथील रत्नाकर सिद्धू कांबळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागात लिपिक पदावर नियुक्तीपत्र मिळाले. यामुळे आपला संघर्ष थांबला असल्याची भावना व्यक्त केली आहे. रत्नाकर कांबळे म्हणाले, माझे वडील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विभाग, मिरज येथे कार्यरत होते. पंधरा वर्षांपूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले. तेव्हा मी बारावीत शिकत होतो. घऱची जबाबदारी अंगावर आल्याने शिक्षण पूर्ण करता आले नाही. एमआयडीसी मध्ये मी कामाला जात होतो. आर्थिक व मानसिक परिस्थिती दोन्हींचा संघर्ष सुरू होता. पण, आता मला अनुकंपा मधून नियुक्ती मिळाल्याने माझ्या संघर्षाला विराम मिळाला आहे, असे ते म्हणाले. कुटुंबाचे भविष्य सुरक्षित – यासिन मुतवल्ली मिरज येथील यासिन इब्राहिम मुतवल्ली यांच्या वडिलांचे 11 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचे वडील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विभाग, मिरज येथे कार्यरत होते. वडील गेल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. परंतु, एका मेडिकलमध्ये ते कामाला जात. यासिन मुतवल्ली यांना शासकीय रूग्णालय येथे नियुक्ती मिळाली आहे. आता आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित झाले असून, या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण देता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवा प्रकाश आला असून, शासनाच्या संवेदनशील दृष्टिकोनाचा प्रत्यय आल्याची भावना या प्रातिनिधीक प्रतिक्रियांतून उमटली आहे. शासनाच्या अनुकंपा भरती या एक महत्त्वाचा उपक्रमातून सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांचा अकाली मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटू नये आणि वारसदारांना आधार दिला जातो. त्यामुळेच या उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा प्रशासनाने मनोमन आभार मानले. या भरतीमुळे 78 कुटुंबातील पात्र वारसदारांना रोजगार मिळाला आहे, यापुढे या कुटुंबाचे जीवन सुरळीत चालून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. 00000

नियुक्त उमेदवारांनी शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- जिल्ह्यात अनुकंपा व लिपिक भरती नियुक्तीच्या 139 आदेशांचे वितरण - शासकीय संस्थांच्या बळकटीकरणाला गती देऊ सांगली, दि 4 (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या तसेच अनुकंपा तत्त्वावर आज नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आलेल्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने लोकाभिमुख काम करून शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा, असे मार्गदर्शन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. राज्य शासनाकडून महाराष्ट्रात एकाच दिवशी दहा हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप अंतर्गत राज्य रोजगार मेळाव्याच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, डॉ. सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करुन, शासकीय सेवेत त्यांचे स्वागत करून व चांगल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी दहा हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा राज्य शासनाचा हा महारोजगार मेळावा असून, असा कार्यक्रम राज्याच्या इतिहासात प्रथम होत आहे. शासनाच्या 150 दिवसाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातून या कार्यक्रमाला गती मिळाली. यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले आहेत. यापुढेही प्रतीक्षासूची व रिक्त पदे यांचा वेळोवेळी आढावा घेऊ व अनुकंपा प्रवर्गातील उमेदवारांना न्याय देऊन शासकीय संस्थांचे बळकटीकरण करू. ही प्रक्रिया गतीने करण्यात येईल. ज्या तत्परतेने या नियुक्त्या करण्यात आल्या, त्याच तत्परतेने उमेदवारांनीही जबाबदारीने, शिस्तीने व प्रामाणिकपणे लोकाभिमुख काम करावे, असे त्यांनी सूचित केले. यावेळी अनुकंपा तत्त्वावर गट क व गट ड मध्ये प्रत्येकी 39 व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 61 अशा 139 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी हा राज्य शासनाचा चांगला उपक्रम असून, यातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राज्य शासनाच्या सेवेत आज दाखल झालेल्या उमेदवारांनी आपण शासन व जनता यातील दुवा म्हणून काम करणार आहोत, याची जाणिव कायम ठेवावी. शासकीय कामकाजात शासनाचे धोरण व कायद्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे कार्यालयीन शिस्त, प्रामाणिकपणा यातून तुमच्या कामात सकारात्मक प्रतिबिंब उमटवा. आज नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या विभागाचे सर्व नियम, परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती करून घ्यावी. कालानुरूप अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा. लोकाभिमुख प्रशासन केंद्रित कामकाज करण्याचे ध्येय ठेवून नियमानुसार काम करावे. राज्य शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जीवनात आजच दिवाळी साजरी झाली असल्याचे ते म्हणाले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, राज्य शासनाने या माध्यमातून सर्व विभागांतील रिक्त जागांवर भरती करत एक प्रकारे महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. नियुक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणे व चिकाटीने काम करावे. दिलेली जबाबदारी नीट पार पाडावी, असे सांगत त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित राज्य स्तरावरील मुख्य राज्य रोजगार मेळाव्याचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदानाचा कार्यक्रम पार पडला. रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अमोल कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. राज्यभरात दहा हजारहून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान राज्य स्तरावरील मुख्य राज्य रोजगार मेळावा हा ऐतिहासिक सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करून नियुक्तीपत्रे दिली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा नियुक्ती प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर, राज्यभरात शनिवारी 5 हजारहून अधिक उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 5 हजारहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली गेली असून, या माध्यमातून एकाच दिवशी 10 हजारहून अधिक उमेदवार शासकीय सेवेत दाखल होत आहेत. 00000

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- जखमींची विचारपूस करून दिला धीर सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे शोभेची दारू बनविताना झालेल्या स्फोटातील जखमींच्या पाठिशी शासन व प्रशासन आहे. त्यांच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, असा दिलासा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रूग्णांच्या नातेवाईकांना दिला. कवठेएकंद येथील घटनेतील काही जखमींना मिरज येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, समित कदम, रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय साळुंखे, डॉ. राजकुमार खंबे आदि उपस्थित होते. दसऱ्याच्या रात्री श्री बिऱ्हाडसिध्‍द देवाच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या आतषबाजीसाठी शोभेची दारू तयार करत असताना हा स्फोट झाला होता. या स्फोटात जखमींपैकी गजानन यादव, विवेक पाटील, आनंद यादव, आशुतोष पाटील या रूग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी या जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर 25 लाख रूपयांतून रूग्णालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार देयके अदा करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सदर व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने संबंधितांनी अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबरोबरच पूर्वपरवानगी घ्यावी, असे ते म्हणाले. 00000

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश - महसूल, ग्रामविकास, कृषि विभागाने बांधावर जावून संयुक्त पंचनामे करावेत - नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कार्यवाही करावी - गृहोपयोगी साहित्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणार सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन व प्रशासन भक्कमपणे असून, झालेल्या नुकसानीचे महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून आठ दिवसात संयुक्त पंचनामे करावेत. बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई जमा होईल, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदिंसह नियोजन, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आदि संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तसेच महसूल, नगरविकास, ग्रामविकास व कृषि विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शासनस्तरावर प्रति हेक्टर किती मदत द्यायची, याचा निर्णय झाला कि, तात्काळ संबंधिताच्या खात्यावर रक्कम जमा होईल, यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष बांधावर जावून आठ दिवसात पंचनामे करावेत. दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होईल, या दृष्टीने कार्यवाही करावी. पिकांच्या नुकसानीव्यतिरीक्त जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकारानुसार घरे, गुरे, जीवितहानीसाठी शासन निर्देशानुसार नुकसानभरपाई देण्यात येते. त्याचे वाटपही करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, त्याप्रमाणे संबंधित विभागांनी सुरू असलेली कार्यवाही गतीने करत आठ दिवसात नुकसानभरपाईचे पंचनामे करावेत. पिकांव्यतिरीक्त झालेल्या नुकसानीसाठी पंचनाम्यानुसार प्राप्त निधीचे वाटप तातडीने करावे. जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिकार असलेल्या बाबी प्राधान्याने कराव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान नियमानुसार द्यावे. जिथे मदत देणे ही बाब शासकीय नियमांच्या चौकटीत बसत नाही, अशा काही प्रकरणांचा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी अभ्यास करावा. त्यासाठी प्रातिनिधीक तत्त्वावर जत आणि तासगाव तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने ही केस स्टडी करावी. अशा बाबतीत सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबत सादरीकरण केले. तसेच, पंचनामे गतीने होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी कृषि विभागांतर्गत सादरीकरण केले. यामध्ये खरीप हंगामातील पेरणी, पीकपेरणी अहवाल, गतवर्षी आणि चालू वर्षातील पर्जन्यमान तुलना, दिनांक 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झालेली महसूल मंडळे, सप्टेंबर महिन्यात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झालेली महसूल मंडळे, नैसर्गिक आपत्ती अहवाल यांची माहिती सादर करण्यात आली. 00000