शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता

- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी शिबीरांतर्गत पार पडले. यामुळे त्या मुलीला अन्नग्रहण करता येऊ लागले आहे. तसेच बोलण्याच्या क्रियेची सुरवात होऊ लागली आहे. सदर मुलीने तिच्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या खर्चिक उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यानींही सदर मुलीची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदि उपस्थित होते. यावेळी शस्त्रक्रिया पार पडलेल्या वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, कवलापूर येथील डॉ. श्रीनिवास अष्टेकर, डॉ. सचिन मजती, डॉ. सुरेखा बेडसगावकर व डॉ. अनिरुध्द पाटील या टीमने पार पाडली. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांचे कौतुक केले. 00000

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

सांगली, दि. 26 : बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पार्श्वभूमिवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण / बालगृह व सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींचे निरीक्षण / बालगृह या दोन्ही बालगृहांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, वसतिगृहाचे प्रभारी अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, विजय कांबळे आणि अश्विनी माळी, दादासाहेब जाधव आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, बालनिरीक्षणगृहातील मुलांना पणत्या, आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचे साहित्य घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून मुलांच्या सुप्त कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. या वस्तुंची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाद्वारे विक्री करण्यात आली. तसेच, बालनिरीक्षणगृहातील मुलांसाठी Applus Idiada आणि Worship Earth foundation यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसांची रोबोटिक सेन्सर व ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) शिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बालनिरीक्षण गृहातील मुलांनी तयार केलेल्या वस्तुंची पाहणी करून माहिती जाणून घेतली. मुलांशी संवाद साधताना त्यांनी मुलांना मिळणाऱ्या सुविधांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच, भविष्यात मुलांना काय व्हायला आवडेल, हे जाणून घेऊन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच, वसतिगृहांची पाहणी केली. दरम्यान बालसंरक्षण कक्षातर्फे बालविवाहमुक्त महाराष्ट्र आपला – संकल्प अभियान जनजागृती कार्यक्रमांतर्गत बालनिरीक्षणगृहात प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच, वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते वीर बाल दिवसनिमित्त जिल्हा परिषद सभागृहात वीर बालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 00000

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

- जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिल्या. विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मा. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर आयुक्त (आस्थापना) पुणे नितीन माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी अपर आयुक्त (विकास) पुणे रवींद्र कणसे, प्रभारी सहाय्यक आयुक्त (तपासणी) पुणे विजय धनवटे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद यंत्रणांचे विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. बालके व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा, शिक्षण, ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता, सुरळीत पाणीपुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदिंबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून कामकाज करावे, असे सूचित करून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवा. यामध्ये दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के व विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांना भेट देऊन आढावा घ्यावा. ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छतेसाठी पूर्ण क्षमतेने काम करून स्वच्छतेबाबत सातत्य ठेवावे. वृक्षारोपणास प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागात उद्योग आले तरच विकास होईल. उद्योग येण्यास काही अडचणी असतील तर त्याकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, असे त्यांनी सूचित केले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, आक्षेपाबाबत आलेले संदर्भ संबंधितांनी नीट तपासून वाचावे व त्याच्यावर कार्यवाही करावी. यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. शासकीय रकमेचा अपहार झाल्यास तात्काळ कारवाई करा. दिव्यांगासाठी असलेल्या निधीचे उचित नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सांगलीच्या केलेल्या कार्यालय तपासणीचे अहवाल वाचन जिल्हा परिषद सांगलीच्या सभागृहात अपर आयुक्त (आस्थापना) नितीन माने यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आस्थापना, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायत, मनरेगा, स्वामित्व योजना, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदि विभागांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जीआय सिस्टम पोर्टल, डिजिटल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सिस्टम, ई- ऑफिस आदि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याहस्ते जिल्हा परिषद कार्यक्षेत्रांतर्गत दिव्यांगाना युडीआयडी कार्डचे वाटप, गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, गायरान वाटप प्रमाणपत्र, घरकुल लाभार्थींना चावीचे वितरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पीपीओ वाटप, शंभर टक्के अंधत्व असलेल्या ४० व्यक्तिंना उपकरण वाटप करण्यात आले. तसेच ओडिशा राज्यात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आजींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व त्यांच्या टीमचे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान बैठकीपूर्वी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषद आवारात उमेदच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. 00000

कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : ग्रामपंचायत कवठेपिरान येथील तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प हा सांगली जिल्हा परिषदेचा स्तुत्य पर्यावरणपूरक उपक्रम असून तो शाश्वत चालविण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. त्यांनी कवठेपिरान येथील तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच अनिता माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आणि किरण सायमोते, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता संजय येवले, मिरज गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके, माजी सरपंच भीमराव माने आदि उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, कवठेपिरानच्या या प्लास्टिक व्यवस्थापन युनिटमुळे तालुक्यातील प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होऊन पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती व कार्यपद्धती विषद केली. यावेळी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, उपअभियंता, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बीआरसी प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 00000

व्ही बी जी-राम-जी च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

- समडोळीत व्ही बी ‘जी-राम-जी’ जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा उत्साहात सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या व्ही बी जी राम जी म्हणजेच 'विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. तसेच, शहरीकरणाकडे होत असलेली प्रगती व विकासाच्या विविध गरजा हे सर्व घटक नियोजन करताना विचारात घेतले जातील. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. मिरज तालुक्यातील समडोळी येथे विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२५ (व्ही बी जी राम जी) या नवीन कायद्याबाबत जनजागृतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये ते बोलत होते. समडोळी ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये आयोजित या ग्रामसभेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सुनीता हजारे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरज गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदि उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, हा कायदा विकसित भारत @ २०४७ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत असा ग्रामीण विकासाचा ढाचा निर्माण करण्यासाठी आहे. ग्रामीण भारतात सक्षमीकरण, विकास, संसाधनांचा समन्वय व सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी हा अधिनियम उपयुक्त ठरणार आहे. या अधिनियमांतर्गत जलसुरक्षेला प्राधान्य, मूलभूत सुविधा, आजीविकेसंबंधी सुविधा आणि तीव्र हवामान घटनांमधून संरक्षण करणारी कामे यांचा समावेश असणार आहे. ही चार क्षेत्रे विकास, सशक्तीकरण, अभिसरण व शाश्वत आजीविकेचा पाया ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, निधीचे योग्य नियोजन करून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येईल. तसेच नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे. ऑनलाइन व नोंदणी-आधारित पाठपुराव्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल,” असा विश्वास करत त्यांनी समडोळी ग्रामपंचायतीने विविध शासकीय अभियान, स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यशस्वी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. सरपंच सुनीता हजारे, वैभव पाटील, संजय बेले, दीपक मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक श्री. जेऊर यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नवले यांनी केले. या विशेष ग्रामसभेस उपसरपंच क्रांती पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी व्ही बी जी राम जी योजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चळवळ म्हणून राबवावे असे आवाहन केले. आभार विस्तार अधिकारी कोळी यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती भोकरे यांनी यांनी केले. 00000

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

- तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे जात प्रमाणपत्र व लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारा वाटप सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळेल. प्रत्येक स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी लोकांसोबत भेटून नागरिकांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे वाळवा तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप व लक्ष्मी मुक्ती योजना लाभार्थी यांना सातबारा वाटप पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वाळवा विभाग ईश्वरपूर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार सारिका रासकर, आष्टा अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उरूण ईश्वरपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आदि उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, शासन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही चांगल्या योजना राबवत असते. पतीच्या संमतीने सातबारावर पत्नीचे नाव लावण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यात येत आहे. शासन दरबारी होणाऱ्या प्रत्येक कामासाठी ७/१२ लागतो. ७/१२ ला नाव लागल्यानंतर कधी दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती आली आणि आपल्या पिकांचे नुकसान झाले तर ते आपल्या दोघांच्या जॉइंट अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतील. जेणेकरून आपल्यामध्ये कुटुंबांमध्ये वाद होणार नाहीत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मात्र आई-वडील हयात असेपर्यंत सातबारावर निश्चितपणे आई-वडीलांचेच नाव असावे याची काळजी घ्यावी, असा प्रेमळ सल्ला दिला. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, विहीत वेळेत जातीचे प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा लाभ पुढील उच्च शिक्षणासाठी, शासकीय नोकरीसाठी होईल. व्हॅलिडिटी प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत अर्ज करावा त्यामुळे ते तातडीने मिळेल व पुढे कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगून त्यांनी सामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान भारत कार्ड काढून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे राबवत असलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आज जवळपास पावणेदोनशे लोकांना जातीचे दाखले दिले आहेत. आता या दाखल्यांमुळे त्यांच्यासाठी शासनाच्या सर्व लाभाच्या योजनांचे दरवाजे उघडणार आहेत. जातीच्या दाखल्यांपेक्षाही 'लक्ष्मी मुक्ती' योजनेअंतर्गत ज्या आमच्या भगिनी आहेत, त्यांचे नाव त्यांच्या पतीच्या नावाबरोबर एकाच वेळी लावले गेले आहे. दोघांचे नाव मालमत्तेवर एकत्र येणे हा एक नवीन विचार आहे. घराची लक्ष्मी असलेल्या महिलेला तुम्ही सन्मानाने स्थान दिले आहे, त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि ऐश्वर्य नक्कीच येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक तहसिलदार सारिका रासकर यांनी केले. मंडल अधिकारी रूक्साना तांबोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास लाभार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 000000

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दि. 31 डिसेंबर 2025 अखेर पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 26 डिसेंबर 2024 रोजीच्या च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची नव्याने अंमलबजावणी करण्यात येत असून योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलव्दारे दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता, विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी इत्यादी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांच्याकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत वरीष्ठ कार्यालयास मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगपालिका हद्दीतील व हद्दीपासनु 05 कि.मी. च्या परीसरातील तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयामधील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इ. 11 वी, 12 वी तसेच इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org किंवा MahaIT या पोर्टलवरती त्वरीत अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली व आपल्या तालुक्यातील गृहपाल, मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहामध्ये संपर्क साधावा, असे अवाहन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 00000

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : दिव्यांग व्यक्तिच्या सक्षमीकरणात नागरिक, नागरी समाज संघटना, संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या संस्थांची अद्याप नोंदणी झाली नसेल, अशा पात्र संस्थांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ४९ ते ५३ अनुसार दिव्यांगांचे कल्याण, विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटना, संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. तथापि, दिव्यांग क्षेत्रात अनेक नागरी समाज संघटना, संस्था वैध नोंदणीशिवाय कार्यरत आहेत. ही बाब दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ५० चे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे सर्व संस्था, संघटनांच्या कामकाजात एकसमानता यावी तसेच त्यांची जबाबदारी आणि सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यात आली आहे. त्याअन्वये संघटना, संस्था यांच्या नोंदणीसाठी पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत. पात्रतेचे निकष : यात दिव्यांग व्यक्तिचे सक्षमीकरण, विकास व पुनर्वसनासाठी संस्था कार्यरत असावी. सोसायटी नोंदणी कायदा १८६६, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० किंवा कंपनी कायदा २०१३ (कलम ८) अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नागरी समाज संघटना, संस्था दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क नियम २०१७ व महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियम ४ नुसार पात्र असावी. अशी करा नोंदणी : संघटना, संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. तसेच, स्वतःचे वित्तीय स्त्रोत असणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी अर्ज करताना नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी शुल्क प्रदान केलेल्या पावतीची प्रत, वार्षिक अहवाल, मागील तीन वर्षातील सनदी लेखापरीक्षण, वास्तुची माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या कार्यालयात ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, सांगली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे. 00000

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज - आशिष फुलुके

- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : आजचे युग हे ऑनलाईन युग आहे, त्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना, डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे आणि ही सतर्कता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक कॉलेज, कुपवाड एमआयडीसी येथे आयोजित या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, प्राचार्य आण्णासाहेब गाजी, निवृत्त न्यायाधीश ॲड. फारूक कोतवाल, ॲड. ओमकार वांगीकर, ॲड. जयंत नवले, उपप्राचार्य राजेंद्र मेंच, ग्राहक संघटनेचे संजय कोरे, सर्जेराव पाटील, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, मदन शहा आदि मान्यवर उपस्थित होते. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके म्हणाले, कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे बिल घेऊनच पैसे द्यावेत. फसवणूक झाल्यास त्याची तात्काळ दाद मागावी आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. ग्राहकांनी आपले हक्क सोडू नयेत. आपण एक ग्राहक म्हणून आर्थिक व्यवस्थेचा कणा आहोत. स्वतः जागरूक राहून इतरांनाही यामध्ये सहकार्य करूया, असे सांगून त्यांनी सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख वक्ते ॲड. ओमकार वांगीकर यांनी डिजीटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा या विषयावर सविस्तर सादरीकरण करून मार्गदर्शन केले. फसवणूक झाल्यास ई दाखिल पोर्टलवरून ऑनलाईन घरबसल्या तक्रार कशी दाखल करता येते, त्यामुळे पैसा व वेळेची बचत होण्याबरोबरच लवकर न्याय मिळण्यास मदत होते. यासाठी डिजीटल गोष्टींचा वापर करावा, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ॲड. फारूक कोतवाल, प्राचार्य आण्णासाहेब गाजी, ग्राहक संघटनेचे सर्जेराव पाटील यांनीही ग्राहकांचे अधिकार, कर्तव्ये याबाबत सविस्तर विवेचन करून कोणतेही व्यवहार करताना सजग राहण्याचे आवाहन करून फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमला खोत व दर्शनी पाटील यांनी केले. आभार पुरवठा निरीक्षक राजू कदम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते. 00000

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीत सूचना सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापसांमध्ये समन्वय ठेवावा. भटक्या, मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात. याबाबतचा आढावा दर महिन्याला घेतला जाईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या. प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन शाखा दत्तात्रय लांघी यांच्यासह विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, ग्रामपंचायत विभाग, जि. प. सांगली, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके व रेल्वे स्थानकांच्या परिसराला कुंपण, भिंती, दरवाजे आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजना करून संबंधित परिसर सुरक्षित करावा. जिल्ह्यातील महामार्गावरील भटकी जनावरे व प्राणी यांना पकडून योग्य आश्रय स्थानामध्ये ठेवावे. भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण, लसीकरण व जंत निर्मूलन करावे. तसेच, त्यांना खाऊ घालण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. तक्रार निवारणकरिता हेल्पलाइन क्रमांक तयार करावेत. तसेच जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी रेबीज प्रतिबंधक लस व इम्युनोग्लोबुलिनचा अनिवार्य साठा उपलब्ध ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या नागरिकांकडे सध्या पाळीव श्वान आहेत त्यांनी आपले श्वान रस्त्यावर फिरवल्यानंतर त्यांची विष्ठेची स्वतः विल्हेवाट लावावी अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी निर्देश दिले. तसेच, शाळांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे होणारे आजार आणि अनुषंगिक उपाययोजना यांच्याबाबत जनजागृती मोहीम घेण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले. 00000

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील कर्नाळ गावात गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत लावले जाते. यावेळी तेथील ग्रामस्थ आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताचे जाहीर गायन करून सामाजिक जबाबदारीने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतात. यामधून गावामध्ये देशभक्तीची जोपासना केली जात आहे. याचबरोबर अन्य नाविन्यपूर्ण उपक्रमही येथे राबविले जातात, अशा शब्दात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कौतुक केले. कर्नाळ ग्रामपंचायत येथे कर्नाळ ग्रामपंचायतच्या सहकार्यातून व रोड स्पेन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे दररोज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत लावले जाते. यावेळी गावातील सर्व नागरिक राष्ट्रगीतासाठी उभे राहत असतात. या राष्ट्रगीतामुळे गावामध्ये राष्ट्रभक्ती, एकता, बंधुता निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रत्यक्ष कर्नाळ गावास आज भेट देऊन राष्ट्रगीत गायनात सहभाग घेतला व या उपक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच रोहन एडके, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, परिविक्षाधीन गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित, तलाठी पुष्पलता पाटील, ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, रोड स्पिन वॉरियर्स ग्रुपचे सदस्य रावसाहेब मोहिते, संदेश कदम, अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक प्रतिनिधी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघ प्रतिनिधी, दिव्यांग संघ प्रतिनिधी, गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राष्ट्रगीत गायन उपक्रमामध्ये कर्नाळ गावातील ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक सर्वजण सहभागी होतात. ग्रामपंचायतीने खूप मेहनतीने अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र, अत्यंत स्वच्छ आणि देखभाल ठेवलेली आहे. वाचनालयामध्ये जवळ जवळ 70 हजारांच्या वर पुस्तके आहेत. येथील ग्रामस्थ अत्यंत विचारपूर्वक आणि भविष्यकालीन उपक्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची गोडी निर्माण केलेली आहे, याबद्दल त्यांनी कर्नाळ गावच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, कर्नाळ गावात चांगल्या प्रकारे प्रगती सुरू आहे. गावात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून राष्ट्रगीत गायन, चित्रकला स्पर्धा घेणे, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक काम, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे चांगले नियोजन केले आहे. तसेच दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून महिलांच्या आरोग्याची काळजी सुद्धा येथे घेण्यात आलेली आहे. याबद्दल त्यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ग्रामपंचायत कर्नाळ, कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन व रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅली सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ येथे आयोजित 175 विद्यार्थ्यांची निसर्ग चित्र व व्यक्ती शिल्प स्पर्धा या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच कर्नाळ येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1, अंगणवाडी क्रमांक 139 या ठिकाणीही भेट देऊन पाहणी करून शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आरोग्य केंद्र, (खाजगी) ग्रंथालय येथेही भेट देऊन पाहणी केली. 00000

शिकाऊ, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी माहे जानेवारी ते जून 2026 या कालावधीसाठी तालुकानिहाय शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे. उरूण ईश्वरपूर - 5 व 19 जानेवारी, 2, 9 व 16 फेब्रुवारी, 2 व 16 मार्च, 6, 13 व 20 एप्रिल, 4 व 18 मे, 1, 15 व 29 जून. कोकरूड – 5 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 2 मार्च, 6 एप्रिल, 4 मे, 1 जून. विटा – 6, 13 व 28 जानेवारी, 3, 10, 18 व 25 फेब्रुवारी, 4, 18 व 25 मार्च, 1, 8, 17 व 24 एप्रिल, 5, 15 व 26 मे, 2, 9, 17 व 24 जून. कडेगाव - 9 व 21 जानेवारी, 20 फेब्रुवारी, 11 व 23 मार्च, 15 एप्रिल, 6 व 20 मे, 16 जून. पलूस - 16 व 29 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 13 व 27 मार्च, 21 एप्रिल, 11 व 28 मे, 18 जून. आष्टा - 12 व 30 जानेवारी, 11 व 27 फेब्रुवारी, 10 व 30 मार्च, 16 व 29 एप्रिल, 12 व 29 मे, 10 व 25 जून. आटपाडी - 22 जानेवारी, 4 व 24 फेब्रुवारी, 17 मार्च, 2 व 27 एप्रिल, 19 मे, 3 व 22 जून. जत – 7 व 23 जानेवारी, 5 व 23 फेब्रुवारी, 5 व 20 मार्च, 9 व 28 एप्रिल, 7 व 21 मे, 4 व 23 जून. ‍‍शिराळा - 2 व 20 जानेवारी, 17 फेब्रुवारी, 12 व 25 मार्च, 23 एप्रिल, 13 व 25 मे, 11 जून. ‍‍तासगाव - 1 व 27 जानेवारी, 13 व 26 फेब्रुवारी, 9 व 24 मार्च, 7 व 22 एप्रिल, 14 व 22 मे, 8 व 19 जून. ‍‍कवठेमहांकाळ - 8 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च, 10 एप्रिल, 8 मे, 5 जून. 00000

निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सुट्टीच्या दिवशीही स्वीकारण्यात येणार

सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025-26 मध्ये नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 30 डिसेंबर 2025 आहे. राखीव प्रवर्गावर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारास / अर्जदारास जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करण्याकरिता गैरसोय होऊ नये याकरिता दि. 25 डिसेंबर 2025 (गुरुवार- नाताळ सुट्टी) दि. 27 डिसेंबर 2025 (शनिवार ) व दि. 28 डिसेंबर 2025 (रविवार) या साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशीही केवळ निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम 2025- 26 जाहीर करण्यात आलेला आहे. राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्जदार/ उमेदवार यांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज https://ccvis.barti.in संकेतस्थळावर भरून निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचे शिफारस पत्र, 15 ए फॉर्मवर निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचा सही, शिक्का, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत व ऑनलाईन अर्ज कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावे. अर्जदार यांनी अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणिव, माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या अनुषंगाने दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आचारसंहिता नियमांचे पालन करुनच उपस्थित राहावे, असे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दि. 4 नोव्हेंबर 2025 व दि. 15 डिसेंबर 2025 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सदर आदेश विचारात घेऊन अल्पसंख्याक हक्क दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही. तसेच या कार्यक्रमास राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी/प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व आचारसंहिता नियमांचे पालन करुनच या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण - महावितरणच्या पाच नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचेही ऑनलाईन भूमिपूजन - झोपडपट्टीधारकांना प्रातिनिधीक स्वरूपात पट्टेवाटप सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित केले. भारतीय संस्कृती पुनरूज्जीवित करण्याचे काम त्यांनी केले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत त्यांचे नाव कायम राहील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील शिंदे मळा, अभयनगर येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्वजीत कदम, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगु सरगर, उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. ज्यांनी आपणास स्वाभिमान दिला, लोकप्रशासन दिले, न्यायआधारित व्यवस्था काय असते याची शिकवण दिली, अशा महान व्यक्तिंचे दर्शन व पुतळ्यांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे 300 वे जन्मवर्ष आहे. यानिमित्त सांगलीत महानगरपालिकेच्या वतीने राज्यातील सर्वात मोठा अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यात आला, याबद्दल त्यांनी महानगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले. मध्यम युगातील छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभारात आपणास लोकशाहीची, समतेची तत्त्वे पाहण्यास मिळतात. त्यामुळे अहिल्यादेवींना पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी व मध्य प्रदेश ही त्यांची कर्मभूमी आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या त्या स्नुषा होत्या. अहिल्यादेवींच्या पतींच्या निधनानंतर मल्हाररावांनी त्यांना अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी व आदर्श राज्यकारभारासाठी प्रोत्साहन दिले. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी 28 वर्षे राज्यकारभार केला. आदर्श राणी कशी असावी, याचे त्या उत्तम उदाहरण होत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेव्हा मुघलांनी भारतीय संस्कृतीची पाळेमुळे मिटवण्याचे काम केले. त्यावेळी अहिल्यादेवींनी त्या पुण्यस्थळांचा, धर्माच्या प्रतीकांचा मंदिरांचा जीर्णोद्धार शासकीय तिजोरीतून नव्हे तर स्वखर्चाने करत भारतीय संस्कृतीचे पुनरूत्थान केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वर घाट पुनरूत्थानवेळी व अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी भारतातील मंदिरे वाचवण्याचे काम अहिल्यादेवींनी केल्याबद्दल आवर्जून नामोल्लेख केला असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस काम केले. न्यायप्रिय राणी म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी विधवांना संपत्तीचा अधिकार बहाल केला. त्या काळी महिलांना शिक्षण, अधिकार, रोजगार अशा अनेक गोष्टी दिल्या. माहेश्वर येथे साडी विणकाम उद्योगास प्रोत्साहन दिले. त्यामुळे माहेश्वरी साडी आज देश विदेशात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर 17 प्रकारचे कारखाने त्यांनी राज्यात उघडले. सैन्यदलाची शस्त्र व साधनसामग्री त्यांनी स्वतःच्या कारखान्यात निर्माण केली. स्थानिकांना एकत्र करत लुटारू टोळींवर कारवाई केली. याचबरोबर त्यांनी पहिल्यांदा महिला सैन्याची तुकडी तयार केली. त्या स्वतःही लढाईत सहभागी होत असत, असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने अहिल्यादेवींचे स्मारक करण्याचे काम ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी सर्वप्रथम हाती घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, अहिल्यादेवींच्या 300 व्या जन्मवर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या पुस्तकाची माहिती देत, आताच्या विकास आराखड्यात अहिल्यादेवींनी तयार केलेल्या तलाव, मंदिरे आदिंचे पुनरूज्जीवन करण्याचे काम हाती घेतल्याचे सांगून, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या संविधानाच्या मार्गावर चालत राहू, असा संकल्प आज यानिमित्ताने करू, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिकेने झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप व्यवस्था सुरू केली आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने सांगली कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी ५०० कोटींचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. अहिल्यादेवी होळकर या सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या कठोर प्रशासक होत्या, हे सांगताना त्यांनी समर्पक उदाहरण दिले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घोंगडे व काठी, तसेच अहिल्यादेवींचे शिल्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, रमेश शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. आभार आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी धनगरी ढोलवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आणि प्रकाश शेंडगे, माजी आमदार सुमनताई पाटील, समित कदम, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील व अश्विनी पाटील आदि उपस्थित होते. पुतळ्याची माहिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व कोनशीला अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रिमोटची कळ दाबून करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 10.76 मीटर चबुतऱ्यासहित उंचीचा अश्वारूढ पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक शिंदे मळा, अभयनगर, सांगली येथे उभारण्यात आला आहे. या कामासाठी 1 कोटी 69 लाख इतका खर्च आला आहे. झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महापालिकेच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यात आले. महावितरणच्या पाच नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन यावेळी महावितरणच्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील पाच नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच शहराला एकाच वेळी पाच वीज उपकेंद्रे राज्यात प्रथम देण्यात आली आहेत. या वीज उपकेंद्रांमुळे वीजनिर्मितीत वाढ होऊन नागरिकांची सोय होईल, असा विश्वास व्यक्त केला. सांगलीमध्ये शिंदे मळा, कुंभार मळा, मिरजमध्ये गणे मळा व चार्जिंग स्टेशन आणि कुपवाड एमआयडीसी मध्ये उपकेंद्र मंजूर आहेत. या पाच उपकेंद्रांना एकूण अंदाजे १७.४५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या नवीन उपकेंद्रांमुळे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वीज सेवा मिळण्यास मदत व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सांगली येथे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निळ्या रंगाच्या केळी, स्ट्रॉबेरी, पेरू, डाळिंब यांच्या स्टॉलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन माहिती घेतली. 000000

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

युवा महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास मदत - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 उत्साहात संपन्न - विभागीय युवा महोत्सव आज सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा गुण आवश्यक असून, जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून याची जोपासना होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांच्या वतीने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धकाने आपले सर्वोत्तम योगदान द्यावे. शिक्षण, अभ्यास हे खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचे एक खाद्य आहे. त्याचप्रमाणे क्रीडा, साहित्य, शिक्षण क्षेत्र या सर्व गोष्टींचा समन्वय युवा महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो. या युवा महोत्सवातून आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक अनुभव घेऊन पुढे जावे. जीवन अधिक उत्कृष्ट आणि आनंदित करण्यासाठी विचार करावा. यासाठी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना यातून आपल्या तयारीचा अंदाज येतो. त्यातून स्वतःला अधिक सक्षम घडवावे आणि विजेते होण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे त्याचबरोबर क्रीडा विभागाचे अभिनंदन करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे म्हणाले, खेळामध्ये जय पराजय होत असतो. स्पर्धेत यश न मिळाल्यास निराश न होता पुन्हा अधिक जोमाने प्रयत्न करावेत, यश नक्की मिळेल, असे ते यावेळी म्हणाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विज्ञान प्रदर्शन स्टॉलना भेटी देवून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली. प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर म्हणाले, जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकगीत, लोकनृत्य, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्त्व स्पर्धा, कथालेखन, कविता लेखन, चित्रकला स्पर्धा या बाबींचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा वयोगट हा 15 ते 29 वर्षे यामधील आहे. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून विजयी स्पर्धकांना विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विभागीय स्तरावरील स्पर्धा दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे होणार आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सुमारे 150 स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. आभार क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, परीक्षक, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

'महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना' प्रस्तावासाठी 10 डिसेंबरची मुदत

सांगली, दि. 08, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने 'महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र संस्था व गोपालकांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत सन २०२५-२६ या वर्षापासून दरवर्षी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करणाऱ्या संस्था व व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. पहिल्या पुरस्कारासाठी आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधून एका गोशाळेची निवड केली जाईल. तर दुसऱ्या पुरस्कारासाठी शासकीय/खाजगी गोवंश संवर्धन संस्था, गोवंश प्रक्षेत्रे, कृषि विद्यापीठे, पशुवैद्यक विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी पशुपालक समूह गट किंवा वैयक्तिक गोपालक यांच्यातून एकाची निवड केली जाईल. निवड झालेल्या संस्थांना प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. निवडीचे निकष : पुरस्कार निवडीसाठी संस्थेचे किंवा व्यक्तीचे मागील पाच वर्षांतील कार्य पाहिले जाईल. यामध्ये आत्मनिर्भर गोशाळा, शुद्ध गोवंश पैदास, प्राकृतिक शेतीचा प्रसार, गो-उत्पादनांची निर्मिती आणि बायोगॅस/ सौरऊर्जा वापर यांसारख्या विविध निकषांवर गुणांकन केले जाईल. इच्छुक व पात्र संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दिनांक 10 डिसेंबर 2025 पर्यंत 'जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, सांगली' येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती कार्यालयात उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 00000

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

पासपोर्ट संबंधित समस्या निराकरणासाठी 10 डिसेंबरला संवादसत्र

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : जनतेच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुधवार, दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट बिल्डींग, सर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत संवादसत्र आयोजित केले असल्याचे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे कडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. संवाद सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात. फाईल क्रमांक, नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर), नाव, प्रश्न थोडक्यात या तपशीलांचा आगाऊ उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर पाठवावा. पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून एक पुष्टीकरण ईमेल पाठवला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्र मध्ये प्रवेश दिला जाईल. ओपन हाऊससाठी नोंदणी दुपारी 2 वाजता सुरू होईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

दिव्यांगांची क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी अशोक काकडे

- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : दिव्यांग मुलांमध्ये खूप कलात्मकता आहे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तीमधील कमतरता न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सुनंदा ठवळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप कोटकर, एसईडीबी, मुंबईचे संस्थापक जमीर ढाले, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून कौशल्य प्रशिक्षणातून त्यांना स्वावलंबी बनविणे आवश्यक आहे. यामधून त्यांच्या आई-वडिलांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. यामध्ये दिव्यांग शाळेतील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असून यासाठी शिक्षकांनी जबाबदारी उचलावी. प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. फक्त मनामध्ये जिद्द असावी लागते. आयुष्यात उद्दिष्ट ठरवून लक्ष केंद्रित करा, नक्की चांगले यश मिळेल, असे सांगून त्यांनी दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांची कायम प्रगती व्हावी, ते सक्षम व्हावेत आणि त्यांना आयुष्यामध्ये उभे राहण्यासाठी जे काही लागत असेल, ते देण्याचा आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी आश्वासित केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात आलेल्या रोबोटिक्स प्रशिक्षण, दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन, UDID तपासणी व वितरण शिबिरे आदि उपक्रमांची माहिती देवून यापुढेही दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. प्रास्ताविकात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता असणारे कायदे व योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा स्तरावर करणार असल्याचे नमूद केले. सहाय्यक सल्लागार श्रीमती मंजिरी जाधव यांनी आभार मानले. यावेळी दिव्यांगत्वावर मात करून यश संपादन केलेल्या दिव्यांग व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद सांगली व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा सांगली यांच्या अधिनस्त सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या विशेष शाळा /कर्मशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी एकूण ३७ विशेष शाळा/कर्मशाळा सहभागी झाल्या. या कार्यक्रमासाठी ८०० विद्यार्थी, दिव्यांग मुलांचे पालक, विविध संघटना, संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी समाजामध्ये दिव्यांगांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी काढण्यात आली. 00000

एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : एस. एस. बी. (Service Selection Board) या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 15 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत एस.एस.बी. कोर्स क्र. 64 आयोजित करण्यात येत आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एस.एस.बी. (Service Selection Board) च्या पूर्वतयारीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येतेवेळी उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-64 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत - कम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट ‘A’ किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस. एस. बी. कॉल लेटर असावे किंवा एस. एस. बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२३३-२९९०७१२ आणि 0253-2451032 किंवा व्हॉटस्‌ॲप क्र. 9404969145 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला

- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ सांगली, दि. ३, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. तथापि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने त्यांना सदर परीक्षा देता यावी याकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. दरम्यान, या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दि. २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता दि. ८ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. या परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील, त्यांनी दि. ८ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे - नियमित शुल्कासह ८ डिसेंबर २०२५पर्यंत, विलंब शुल्कासह ९ ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर २०२५ पर्यंत, अति विशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 00000

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

नगरपरिषद /नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 जिल्ह्यात सरासरी 75.96 टक्के मतदान

- 21 डिसेंबरला होणार मतमोजणी सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 75.96 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर 2025 ऐवजी सुधारीत निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे. जिल्ह्यातील उरूण -ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नगरपरिषद /नगरपंचायतनिहाय एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे. उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 64215 पैकी 47608, 74.14 टक्के, विटा नगरपरिषद - 46332 पैकी 36770, 79.36 टक्के, आष्टा नगरपरिषद - 30573 पैकी 22856, 74.76 टक्के, तासगाव नगरपरिषद – 32994 पैकी 23249, 70.46 टक्के, जत नगरपरिषद – 28090 पैकी 20464, 72.85 टक्के, पलूस नगरपरिषद – 22067 पैकी 17716, 80.28 टक्के, शिराळा नगरपंचायत – 13095 पैकी 10879, 83.08 टक्के, आटपाडी नगरपंचायत – 20611 पैकी 16410, 79.62 टक्के. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सह आयुक्त नगरप्रशासन दत्तात्रय लांघी, डॉ. पवन म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील 6 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात चोख पोलीस बंदोबस्तामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. आठही नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष सोय करण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. विशेष मतदान केंद्रे तसेच गुलाबी मतदान केंद्रे सजविण्यात आली होती. 00000