शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५
जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता
- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी शिबीरांतर्गत पार पडले. यामुळे त्या मुलीला अन्नग्रहण करता येऊ लागले आहे. तसेच बोलण्याच्या क्रियेची सुरवात होऊ लागली आहे. सदर मुलीने तिच्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या खर्चिक उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यानींही सदर मुलीची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदि उपस्थित होते.
यावेळी शस्त्रक्रिया पार पडलेल्या वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, कवलापूर येथील डॉ. श्रीनिवास अष्टेकर, डॉ. सचिन मजती, डॉ. सुरेखा बेडसगावकर व डॉ. अनिरुध्द पाटील या टीमने पार पाडली. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांचे कौतुक केले.
00000
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट
सांगली, दि. 26 : बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पार्श्वभूमिवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण / बालगृह व सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींचे निरीक्षण / बालगृह या दोन्ही बालगृहांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, वसतिगृहाचे प्रभारी अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, विजय कांबळे आणि अश्विनी माळी, दादासाहेब जाधव आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, बालनिरीक्षणगृहातील मुलांना पणत्या, आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचे साहित्य घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून मुलांच्या सुप्त कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. या वस्तुंची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाद्वारे विक्री करण्यात आली. तसेच, बालनिरीक्षणगृहातील मुलांसाठी Applus Idiada आणि Worship Earth foundation यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसांची रोबोटिक सेन्सर व ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) शिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बालनिरीक्षण गृहातील मुलांनी तयार केलेल्या वस्तुंची पाहणी करून माहिती जाणून घेतली. मुलांशी संवाद साधताना त्यांनी मुलांना मिळणाऱ्या सुविधांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच, भविष्यात मुलांना काय व्हायला आवडेल, हे जाणून घेऊन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच, वसतिगृहांची पाहणी केली.
दरम्यान बालसंरक्षण कक्षातर्फे बालविवाहमुक्त महाराष्ट्र आपला – संकल्प अभियान जनजागृती कार्यक्रमांतर्गत बालनिरीक्षणगृहात प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच, वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.
दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते वीर बाल दिवसनिमित्त जिल्हा परिषद सभागृहात वीर बालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
00000
जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
- जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिल्या.
विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मा. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर आयुक्त (आस्थापना) पुणे नितीन माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी अपर आयुक्त (विकास) पुणे रवींद्र कणसे, प्रभारी सहाय्यक आयुक्त (तपासणी) पुणे विजय धनवटे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद यंत्रणांचे विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
बालके व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा, शिक्षण, ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता, सुरळीत पाणीपुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदिंबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून कामकाज करावे, असे सूचित करून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवा. यामध्ये दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के व विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांना भेट देऊन आढावा घ्यावा. ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छतेसाठी पूर्ण क्षमतेने काम करून स्वच्छतेबाबत सातत्य ठेवावे. वृक्षारोपणास प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागात उद्योग आले तरच विकास होईल. उद्योग येण्यास काही अडचणी असतील तर त्याकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, असे त्यांनी सूचित केले.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, आक्षेपाबाबत आलेले संदर्भ संबंधितांनी नीट तपासून वाचावे व त्याच्यावर कार्यवाही करावी. यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. शासकीय रकमेचा अपहार झाल्यास तात्काळ कारवाई करा. दिव्यांगासाठी असलेल्या निधीचे उचित नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सांगलीच्या केलेल्या कार्यालय तपासणीचे अहवाल वाचन जिल्हा परिषद सांगलीच्या सभागृहात अपर आयुक्त (आस्थापना) नितीन माने यांनी केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आस्थापना, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायत, मनरेगा, स्वामित्व योजना, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदि विभागांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जीआय सिस्टम पोर्टल, डिजिटल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सिस्टम, ई- ऑफिस आदि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याहस्ते जिल्हा परिषद कार्यक्षेत्रांतर्गत दिव्यांगाना युडीआयडी कार्डचे वाटप, गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, गायरान वाटप प्रमाणपत्र, घरकुल लाभार्थींना चावीचे वितरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पीपीओ वाटप, शंभर टक्के अंधत्व असलेल्या ४० व्यक्तिंना उपकरण वाटप करण्यात आले. तसेच ओडिशा राज्यात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आजींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व त्यांच्या टीमचे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान बैठकीपूर्वी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषद आवारात उमेदच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.
00000
कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : ग्रामपंचायत कवठेपिरान येथील तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प हा सांगली जिल्हा परिषदेचा स्तुत्य पर्यावरणपूरक उपक्रम असून तो शाश्वत चालविण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
त्यांनी कवठेपिरान येथील तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच अनिता माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आणि किरण सायमोते, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता संजय येवले, मिरज गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके, माजी सरपंच भीमराव माने आदि उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, कवठेपिरानच्या या प्लास्टिक व्यवस्थापन युनिटमुळे तालुक्यातील प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होऊन पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती व कार्यपद्धती विषद केली. यावेळी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, उपअभियंता, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बीआरसी प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
00000
व्ही बी जी-राम-जी च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
- समडोळीत व्ही बी ‘जी-राम-जी’ जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा उत्साहात
सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या व्ही बी जी राम जी म्हणजेच 'विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. तसेच, शहरीकरणाकडे होत असलेली प्रगती व विकासाच्या विविध गरजा हे सर्व घटक नियोजन करताना विचारात घेतले जातील. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
मिरज तालुक्यातील समडोळी येथे विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२५ (व्ही बी जी राम जी) या नवीन कायद्याबाबत जनजागृतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये ते बोलत होते. समडोळी ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये आयोजित या ग्रामसभेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सुनीता हजारे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरज गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदि उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, हा कायदा विकसित भारत @ २०४७ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत असा ग्रामीण विकासाचा ढाचा निर्माण करण्यासाठी आहे. ग्रामीण भारतात सक्षमीकरण, विकास, संसाधनांचा समन्वय व सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी हा अधिनियम उपयुक्त ठरणार आहे. या अधिनियमांतर्गत जलसुरक्षेला प्राधान्य, मूलभूत सुविधा, आजीविकेसंबंधी सुविधा आणि तीव्र हवामान घटनांमधून संरक्षण करणारी कामे यांचा समावेश असणार आहे. ही चार क्षेत्रे विकास, सशक्तीकरण, अभिसरण व शाश्वत आजीविकेचा पाया ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, निधीचे योग्य नियोजन करून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येईल. तसेच नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे. ऑनलाइन व नोंदणी-आधारित पाठपुराव्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होईल,” असा विश्वास करत त्यांनी समडोळी ग्रामपंचायतीने विविध शासकीय अभियान, स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यशस्वी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
सरपंच सुनीता हजारे, वैभव पाटील, संजय बेले, दीपक मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक श्री. जेऊर यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नवले यांनी केले. या विशेष ग्रामसभेस उपसरपंच क्रांती पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी व्ही बी जी राम जी योजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चळवळ म्हणून राबवावे असे आवाहन केले.
आभार विस्तार अधिकारी कोळी यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती भोकरे यांनी यांनी केले.
00000
गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
- तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे जात प्रमाणपत्र व लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारा वाटप
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळेल. प्रत्येक स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी लोकांसोबत भेटून नागरिकांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे वाळवा तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप व लक्ष्मी मुक्ती योजना लाभार्थी यांना सातबारा वाटप पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वाळवा विभाग ईश्वरपूर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार सारिका रासकर, आष्टा अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उरूण ईश्वरपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आदि उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, शासन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही चांगल्या योजना राबवत असते. पतीच्या संमतीने सातबारावर पत्नीचे नाव लावण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यात येत आहे. शासन दरबारी होणाऱ्या प्रत्येक कामासाठी ७/१२ लागतो. ७/१२ ला नाव लागल्यानंतर कधी दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती आली आणि आपल्या पिकांचे नुकसान झाले तर ते आपल्या दोघांच्या जॉइंट अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतील. जेणेकरून आपल्यामध्ये कुटुंबांमध्ये वाद होणार नाहीत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मात्र आई-वडील हयात असेपर्यंत सातबारावर निश्चितपणे आई-वडीलांचेच नाव असावे याची काळजी घ्यावी, असा प्रेमळ सल्ला दिला.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, विहीत वेळेत जातीचे प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा लाभ पुढील उच्च शिक्षणासाठी, शासकीय नोकरीसाठी होईल. व्हॅलिडिटी प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत अर्ज करावा त्यामुळे ते तातडीने मिळेल व पुढे कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगून त्यांनी सामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान भारत कार्ड काढून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे राबवत असलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आज जवळपास पावणेदोनशे लोकांना जातीचे दाखले दिले आहेत. आता या दाखल्यांमुळे त्यांच्यासाठी शासनाच्या सर्व लाभाच्या योजनांचे दरवाजे उघडणार आहेत. जातीच्या दाखल्यांपेक्षाही 'लक्ष्मी मुक्ती' योजनेअंतर्गत ज्या आमच्या भगिनी आहेत, त्यांचे नाव त्यांच्या पतीच्या नावाबरोबर एकाच वेळी लावले गेले आहे. दोघांचे नाव मालमत्तेवर एकत्र येणे हा एक नवीन विचार आहे. घराची लक्ष्मी असलेल्या महिलेला तुम्ही सन्मानाने स्थान दिले आहे, त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि ऐश्वर्य नक्कीच येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविक तहसिलदार सारिका रासकर यांनी केले. मंडल अधिकारी रूक्साना तांबोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास लाभार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000
बुधवार, २४ डिसेंबर, २०२५
स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दि. 31 डिसेंबर 2025 अखेर पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 26 डिसेंबर 2024 रोजीच्या च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची नव्याने अंमलबजावणी करण्यात येत असून योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलव्दारे दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता, विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी इत्यादी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांच्याकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत वरीष्ठ कार्यालयास मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगपालिका हद्दीतील व हद्दीपासनु 05 कि.मी. च्या परीसरातील तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयामधील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इ. 11 वी, 12 वी तसेच इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org किंवा MahaIT या पोर्टलवरती त्वरीत अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली व आपल्या तालुक्यातील गृहपाल, मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहामध्ये संपर्क साधावा, असे अवाहन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
00000
दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : दिव्यांग व्यक्तिच्या सक्षमीकरणात नागरिक, नागरी समाज संघटना, संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या संस्थांची अद्याप नोंदणी झाली नसेल, अशा पात्र संस्थांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ४९ ते ५३ अनुसार दिव्यांगांचे कल्याण, विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटना, संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. तथापि, दिव्यांग क्षेत्रात अनेक नागरी समाज संघटना, संस्था वैध नोंदणीशिवाय कार्यरत आहेत. ही बाब दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ५० चे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे सर्व संस्था, संघटनांच्या कामकाजात एकसमानता यावी तसेच त्यांची जबाबदारी आणि सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यात आली आहे. त्याअन्वये संघटना, संस्था यांच्या नोंदणीसाठी पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत.
पात्रतेचे निकष : यात दिव्यांग व्यक्तिचे सक्षमीकरण, विकास व पुनर्वसनासाठी संस्था कार्यरत असावी. सोसायटी नोंदणी कायदा १८६६, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० किंवा कंपनी कायदा २०१३ (कलम ८) अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नागरी समाज संघटना, संस्था दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क नियम २०१७ व महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियम ४ नुसार पात्र असावी.
अशी करा नोंदणी : संघटना, संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. तसेच, स्वतःचे वित्तीय स्त्रोत असणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी अर्ज करताना नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी शुल्क प्रदान केलेल्या पावतीची प्रत, वार्षिक अहवाल, मागील तीन वर्षातील सनदी लेखापरीक्षण, वास्तुची माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या कार्यालयात ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, सांगली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
00000
डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज - आशिष फुलुके
- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : आजचे युग हे ऑनलाईन युग आहे, त्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना, डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे आणि ही सतर्कता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक कॉलेज, कुपवाड एमआयडीसी येथे आयोजित या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, प्राचार्य आण्णासाहेब गाजी, निवृत्त न्यायाधीश ॲड. फारूक कोतवाल, ॲड. ओमकार वांगीकर, ॲड. जयंत नवले, उपप्राचार्य राजेंद्र मेंच, ग्राहक संघटनेचे संजय कोरे, सर्जेराव पाटील, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, मदन शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके म्हणाले, कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे बिल घेऊनच पैसे द्यावेत. फसवणूक झाल्यास त्याची तात्काळ दाद मागावी आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. ग्राहकांनी आपले हक्क सोडू नयेत. आपण एक ग्राहक म्हणून आर्थिक व्यवस्थेचा कणा आहोत. स्वतः जागरूक राहून इतरांनाही यामध्ये सहकार्य करूया, असे सांगून त्यांनी सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख वक्ते ॲड. ओमकार वांगीकर यांनी डिजीटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा या विषयावर सविस्तर सादरीकरण करून मार्गदर्शन केले. फसवणूक झाल्यास ई दाखिल पोर्टलवरून ऑनलाईन घरबसल्या तक्रार कशी दाखल करता येते, त्यामुळे पैसा व वेळेची बचत होण्याबरोबरच लवकर न्याय मिळण्यास मदत होते. यासाठी डिजीटल गोष्टींचा वापर करावा, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. फारूक कोतवाल, प्राचार्य आण्णासाहेब गाजी, ग्राहक संघटनेचे सर्जेराव पाटील यांनीही ग्राहकांचे अधिकार, कर्तव्ये याबाबत सविस्तर विवेचन करून कोणतेही व्यवहार करताना सजग राहण्याचे आवाहन करून फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमला खोत व दर्शनी पाटील यांनी केले. आभार पुरवठा निरीक्षक राजू कदम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.
00000
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी अशोक काकडे
- प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीत सूचना
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापसांमध्ये समन्वय ठेवावा. भटक्या, मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात. याबाबतचा आढावा दर महिन्याला घेतला जाईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन शाखा दत्तात्रय लांघी यांच्यासह विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, ग्रामपंचायत विभाग, जि. प. सांगली, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्थानके व रेल्वे स्थानकांच्या परिसराला कुंपण, भिंती, दरवाजे आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजना करून संबंधित परिसर सुरक्षित करावा. जिल्ह्यातील महामार्गावरील भटकी जनावरे व प्राणी यांना पकडून योग्य आश्रय स्थानामध्ये ठेवावे. भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण, लसीकरण व जंत निर्मूलन करावे. तसेच, त्यांना खाऊ घालण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. तक्रार निवारणकरिता हेल्पलाइन क्रमांक तयार करावेत. तसेच जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी रेबीज प्रतिबंधक लस व इम्युनोग्लोबुलिनचा अनिवार्य साठा उपलब्ध ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या नागरिकांकडे सध्या पाळीव श्वान आहेत त्यांनी आपले श्वान रस्त्यावर फिरवल्यानंतर त्यांची विष्ठेची स्वतः विल्हेवाट लावावी अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी निर्देश दिले. तसेच, शाळांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे होणारे आजार आणि अनुषंगिक उपाययोजना यांच्याबाबत जनजागृती मोहीम घेण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले.
00000
दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना - जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील कर्नाळ गावात गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत लावले जाते. यावेळी तेथील ग्रामस्थ आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताचे जाहीर गायन करून सामाजिक जबाबदारीने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतात. यामधून गावामध्ये देशभक्तीची जोपासना केली जात आहे. याचबरोबर अन्य नाविन्यपूर्ण उपक्रमही येथे राबविले जातात, अशा शब्दात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कौतुक केले.
कर्नाळ ग्रामपंचायत येथे कर्नाळ ग्रामपंचायतच्या सहकार्यातून व रोड स्पेन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे दररोज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत लावले जाते. यावेळी गावातील सर्व नागरिक राष्ट्रगीतासाठी उभे राहत असतात. या राष्ट्रगीतामुळे गावामध्ये राष्ट्रभक्ती, एकता, बंधुता निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रत्यक्ष कर्नाळ गावास आज भेट देऊन राष्ट्रगीत गायनात सहभाग घेतला व या उपक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच रोहन एडके, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, परिविक्षाधीन गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित, तलाठी पुष्पलता पाटील, ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, रोड स्पिन वॉरियर्स ग्रुपचे सदस्य रावसाहेब मोहिते, संदेश कदम, अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक प्रतिनिधी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघ प्रतिनिधी, दिव्यांग संघ प्रतिनिधी, गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राष्ट्रगीत गायन उपक्रमामध्ये कर्नाळ गावातील ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक सर्वजण सहभागी होतात. ग्रामपंचायतीने खूप मेहनतीने अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र, अत्यंत स्वच्छ आणि देखभाल ठेवलेली आहे. वाचनालयामध्ये जवळ जवळ 70 हजारांच्या वर पुस्तके आहेत. येथील ग्रामस्थ अत्यंत विचारपूर्वक आणि भविष्यकालीन उपक्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची गोडी निर्माण केलेली आहे, याबद्दल त्यांनी कर्नाळ गावच्या ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, कर्नाळ गावात चांगल्या प्रकारे प्रगती सुरू आहे. गावात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून राष्ट्रगीत गायन, चित्रकला स्पर्धा घेणे, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक काम, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे चांगले नियोजन केले आहे. तसेच दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून महिलांच्या आरोग्याची काळजी सुद्धा येथे घेण्यात आलेली आहे. याबद्दल त्यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ग्रामपंचायत कर्नाळ, कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन व रोटरॅक्ट क्लब कृष्णा व्हॅली सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ येथे आयोजित 175 विद्यार्थ्यांची निसर्ग चित्र व व्यक्ती शिल्प स्पर्धा या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच कर्नाळ येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1, अंगणवाडी क्रमांक 139 या ठिकाणीही भेट देऊन पाहणी करून शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आरोग्य केंद्र, (खाजगी) ग्रंथालय येथेही भेट देऊन पाहणी केली.
00000
शिकाऊ, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी माहे जानेवारी ते जून 2026 या कालावधीसाठी तालुकानिहाय शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.
उरूण ईश्वरपूर - 5 व 19 जानेवारी, 2, 9 व 16 फेब्रुवारी, 2 व 16 मार्च, 6, 13 व 20 एप्रिल, 4 व 18 मे, 1, 15 व 29 जून. कोकरूड – 5 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 2 मार्च, 6 एप्रिल, 4 मे, 1 जून. विटा – 6, 13 व 28 जानेवारी, 3, 10, 18 व 25 फेब्रुवारी, 4, 18 व 25 मार्च, 1, 8, 17 व 24 एप्रिल, 5, 15 व 26 मे, 2, 9, 17 व 24 जून. कडेगाव - 9 व 21 जानेवारी, 20 फेब्रुवारी, 11 व 23 मार्च, 15 एप्रिल, 6 व 20 मे, 16 जून. पलूस - 16 व 29 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 13 व 27 मार्च, 21 एप्रिल, 11 व 28 मे, 18 जून. आष्टा - 12 व 30 जानेवारी, 11 व 27 फेब्रुवारी, 10 व 30 मार्च, 16 व 29 एप्रिल, 12 व 29 मे, 10 व 25 जून. आटपाडी - 22 जानेवारी, 4 व 24 फेब्रुवारी, 17 मार्च, 2 व 27 एप्रिल, 19 मे, 3 व 22 जून. जत – 7 व 23 जानेवारी, 5 व 23 फेब्रुवारी, 5 व 20 मार्च, 9 व 28 एप्रिल, 7 व 21 मे, 4 व 23 जून. शिराळा - 2 व 20 जानेवारी, 17 फेब्रुवारी, 12 व 25 मार्च, 23 एप्रिल, 13 व 25 मे, 11 जून. तासगाव - 1 व 27 जानेवारी, 13 व 26 फेब्रुवारी, 9 व 24 मार्च, 7 व 22 एप्रिल, 14 व 22 मे, 8 व 19 जून. कवठेमहांकाळ - 8 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च, 10 एप्रिल, 8 मे, 5 जून.
00000
निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सुट्टीच्या दिवशीही स्वीकारण्यात येणार
सांगली, दि. 23 (जि. मा. का.) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025-26 मध्ये नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 30 डिसेंबर 2025 आहे. राखीव प्रवर्गावर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारास / अर्जदारास जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करण्याकरिता गैरसोय होऊ नये याकरिता दि. 25 डिसेंबर 2025 (गुरुवार- नाताळ सुट्टी) दि. 27 डिसेंबर 2025 (शनिवार ) व दि. 28 डिसेंबर 2025 (रविवार) या साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशीही केवळ निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम 2025- 26 जाहीर करण्यात आलेला आहे. राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्जदार/ उमेदवार यांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज https://ccvis.barti.in संकेतस्थळावर भरून निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचे शिफारस पत्र, 15 ए फॉर्मवर निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचा सही, शिक्का, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत व ऑनलाईन अर्ज कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावे. अर्जदार यांनी अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५
अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणिव, माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या अनुषंगाने दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आचारसंहिता नियमांचे पालन करुनच उपस्थित राहावे, असे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दि. 4 नोव्हेंबर 2025 व दि. 15 डिसेंबर 2025 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सदर आदेश विचारात घेऊन अल्पसंख्याक हक्क दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही. तसेच या कार्यक्रमास राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी/प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व आचारसंहिता नियमांचे पालन करुनच या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
सोमवार, १५ डिसेंबर, २०२५
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
- महावितरणच्या पाच नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचेही ऑनलाईन भूमिपूजन
- झोपडपट्टीधारकांना प्रातिनिधीक स्वरूपात पट्टेवाटप
सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित केले. भारतीय संस्कृती पुनरूज्जीवित करण्याचे काम त्यांनी केले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत त्यांचे नाव कायम राहील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील शिंदे मळा, अभयनगर येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्वजीत कदम, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगु सरगर, उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
ज्यांनी आपणास स्वाभिमान दिला, लोकप्रशासन दिले, न्यायआधारित व्यवस्था काय असते याची शिकवण दिली, अशा महान व्यक्तिंचे दर्शन व पुतळ्यांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे 300 वे जन्मवर्ष आहे. यानिमित्त सांगलीत महानगरपालिकेच्या वतीने राज्यातील सर्वात मोठा अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्यात आला, याबद्दल त्यांनी महानगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले.
मध्यम युगातील छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभारात आपणास लोकशाहीची, समतेची तत्त्वे पाहण्यास मिळतात. त्यामुळे अहिल्यादेवींना पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी व मध्य प्रदेश ही त्यांची कर्मभूमी आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या त्या स्नुषा होत्या. अहिल्यादेवींच्या पतींच्या निधनानंतर मल्हाररावांनी त्यांना अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी व आदर्श राज्यकारभारासाठी प्रोत्साहन दिले. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी 28 वर्षे राज्यकारभार केला. आदर्श राणी कशी असावी, याचे त्या उत्तम उदाहरण होत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेव्हा मुघलांनी भारतीय संस्कृतीची पाळेमुळे मिटवण्याचे काम केले. त्यावेळी अहिल्यादेवींनी त्या पुण्यस्थळांचा, धर्माच्या प्रतीकांचा मंदिरांचा जीर्णोद्धार शासकीय तिजोरीतून नव्हे तर स्वखर्चाने करत भारतीय संस्कृतीचे पुनरूत्थान केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वर घाट पुनरूत्थानवेळी व अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी भारतातील मंदिरे वाचवण्याचे काम अहिल्यादेवींनी केल्याबद्दल आवर्जून नामोल्लेख केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस काम केले. न्यायप्रिय राणी म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी विधवांना संपत्तीचा अधिकार बहाल केला. त्या काळी महिलांना शिक्षण, अधिकार, रोजगार अशा अनेक गोष्टी दिल्या. माहेश्वर येथे साडी विणकाम उद्योगास प्रोत्साहन दिले. त्यामुळे माहेश्वरी साडी आज देश विदेशात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर 17 प्रकारचे कारखाने त्यांनी राज्यात उघडले. सैन्यदलाची शस्त्र व साधनसामग्री त्यांनी स्वतःच्या कारखान्यात निर्माण केली. स्थानिकांना एकत्र करत लुटारू टोळींवर कारवाई केली. याचबरोबर त्यांनी पहिल्यांदा महिला सैन्याची तुकडी तयार केली. त्या स्वतःही लढाईत सहभागी होत असत, असे ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने अहिल्यादेवींचे स्मारक करण्याचे काम ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी सर्वप्रथम हाती घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, अहिल्यादेवींच्या 300 व्या जन्मवर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या पुस्तकाची माहिती देत, आताच्या विकास आराखड्यात अहिल्यादेवींनी तयार केलेल्या तलाव, मंदिरे आदिंचे पुनरूज्जीवन करण्याचे काम हाती घेतल्याचे सांगून, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या संविधानाच्या मार्गावर चालत राहू, असा संकल्प आज यानिमित्ताने करू, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिकेने झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप व्यवस्था सुरू केली आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने सांगली कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी ५०० कोटींचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. अहिल्यादेवी होळकर या सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या कठोर प्रशासक होत्या, हे सांगताना त्यांनी समर्पक उदाहरण दिले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घोंगडे व काठी, तसेच अहिल्यादेवींचे शिल्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, रमेश शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. आभार आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी धनगरी ढोलवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आणि प्रकाश शेंडगे, माजी आमदार सुमनताई पाटील, समित कदम, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील व अश्विनी पाटील आदि उपस्थित होते.
पुतळ्याची माहिती
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व कोनशीला अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रिमोटची कळ दाबून करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 10.76 मीटर चबुतऱ्यासहित उंचीचा अश्वारूढ पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक शिंदे मळा, अभयनगर, सांगली येथे उभारण्यात आला आहे. या कामासाठी 1 कोटी 69 लाख इतका खर्च आला आहे.
झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महापालिकेच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यात आले.
महावितरणच्या पाच नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन
यावेळी महावितरणच्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील पाच नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच शहराला एकाच वेळी पाच वीज उपकेंद्रे राज्यात प्रथम देण्यात आली आहेत. या वीज उपकेंद्रांमुळे वीजनिर्मितीत वाढ होऊन नागरिकांची सोय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सांगलीमध्ये शिंदे मळा, कुंभार मळा, मिरजमध्ये गणे मळा व चार्जिंग स्टेशन आणि कुपवाड एमआयडीसी मध्ये उपकेंद्र मंजूर आहेत. या पाच उपकेंद्रांना एकूण अंदाजे १७.४५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
या नवीन उपकेंद्रांमुळे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वीज सेवा मिळण्यास मदत व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे.
दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सांगली येथे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निळ्या रंगाच्या केळी, स्ट्रॉबेरी, पेरू, डाळिंब यांच्या स्टॉलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन माहिती घेतली.
000000
गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५
युवा महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास मदत - जिल्हाधिकारी अशोक काकडे
- जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 उत्साहात संपन्न
- विभागीय युवा महोत्सव आज
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा गुण आवश्यक असून, जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून याची जोपासना होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांच्या वतीने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धकाने आपले सर्वोत्तम योगदान द्यावे. शिक्षण, अभ्यास हे खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचे एक खाद्य आहे. त्याचप्रमाणे क्रीडा, साहित्य, शिक्षण क्षेत्र या सर्व गोष्टींचा समन्वय युवा महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो. या युवा महोत्सवातून आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक अनुभव घेऊन पुढे जावे. जीवन अधिक उत्कृष्ट आणि आनंदित करण्यासाठी विचार करावा. यासाठी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना यातून आपल्या तयारीचा अंदाज येतो. त्यातून स्वतःला अधिक सक्षम घडवावे आणि विजेते होण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे त्याचबरोबर क्रीडा विभागाचे अभिनंदन करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे म्हणाले, खेळामध्ये जय पराजय होत असतो. स्पर्धेत यश न मिळाल्यास निराश न होता पुन्हा अधिक जोमाने प्रयत्न करावेत, यश नक्की मिळेल, असे ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विज्ञान प्रदर्शन स्टॉलना भेटी देवून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली.
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर म्हणाले, जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकगीत, लोकनृत्य, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्त्व स्पर्धा, कथालेखन, कविता लेखन, चित्रकला स्पर्धा या बाबींचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा वयोगट हा 15 ते 29 वर्षे यामधील आहे. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून विजयी स्पर्धकांना विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विभागीय स्तरावरील स्पर्धा दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे होणार आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सुमारे 150 स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आभार क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, परीक्षक, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
रविवार, ७ डिसेंबर, २०२५
'महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना' प्रस्तावासाठी 10 डिसेंबरची मुदत
सांगली, दि. 08, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने 'महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र संस्था व गोपालकांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत सन २०२५-२६ या वर्षापासून दरवर्षी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करणाऱ्या संस्था व व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. पहिल्या पुरस्कारासाठी आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधून एका गोशाळेची निवड केली जाईल. तर दुसऱ्या पुरस्कारासाठी शासकीय/खाजगी गोवंश संवर्धन संस्था, गोवंश प्रक्षेत्रे, कृषि विद्यापीठे, पशुवैद्यक विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी पशुपालक समूह गट किंवा वैयक्तिक गोपालक यांच्यातून एकाची निवड केली जाईल. निवड झालेल्या संस्थांना प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
निवडीचे निकष : पुरस्कार निवडीसाठी संस्थेचे किंवा व्यक्तीचे मागील पाच वर्षांतील कार्य पाहिले जाईल. यामध्ये आत्मनिर्भर गोशाळा, शुद्ध गोवंश पैदास, प्राकृतिक शेतीचा प्रसार, गो-उत्पादनांची निर्मिती आणि बायोगॅस/ सौरऊर्जा वापर यांसारख्या विविध निकषांवर गुणांकन केले जाईल.
इच्छुक व पात्र संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दिनांक 10 डिसेंबर 2025 पर्यंत 'जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, सांगली' येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती कार्यालयात उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
00000
बुधवार, ३ डिसेंबर, २०२५
पासपोर्ट संबंधित समस्या निराकरणासाठी 10 डिसेंबरला संवादसत्र
सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : जनतेच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुधवार, दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट बिल्डींग, सर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत संवादसत्र आयोजित केले असल्याचे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे कडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
संवाद सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात. फाईल क्रमांक, नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर), नाव, प्रश्न थोडक्यात या तपशीलांचा आगाऊ उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर पाठवावा. पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून एक पुष्टीकरण ईमेल पाठवला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्र मध्ये प्रवेश दिला जाईल. ओपन हाऊससाठी नोंदणी दुपारी 2 वाजता सुरू होईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
दिव्यांगांची क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी अशोक काकडे
- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : दिव्यांग मुलांमध्ये खूप कलात्मकता आहे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तीमधील कमतरता न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सुनंदा ठवळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप कोटकर, एसईडीबी, मुंबईचे संस्थापक जमीर ढाले, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून कौशल्य प्रशिक्षणातून त्यांना स्वावलंबी बनविणे आवश्यक आहे. यामधून त्यांच्या आई-वडिलांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. यामध्ये दिव्यांग शाळेतील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असून यासाठी शिक्षकांनी जबाबदारी उचलावी. प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. फक्त मनामध्ये जिद्द असावी लागते. आयुष्यात उद्दिष्ट ठरवून लक्ष केंद्रित करा, नक्की चांगले यश मिळेल, असे सांगून त्यांनी दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांची कायम प्रगती व्हावी, ते सक्षम व्हावेत आणि त्यांना आयुष्यामध्ये उभे राहण्यासाठी जे काही लागत असेल, ते देण्याचा आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी आश्वासित केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात आलेल्या रोबोटिक्स प्रशिक्षण, दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन, UDID तपासणी व वितरण शिबिरे आदि उपक्रमांची माहिती देवून यापुढेही दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
प्रास्ताविकात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता असणारे कायदे व योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा स्तरावर करणार असल्याचे नमूद केले. सहाय्यक सल्लागार श्रीमती मंजिरी जाधव यांनी आभार मानले.
यावेळी दिव्यांगत्वावर मात करून यश संपादन केलेल्या दिव्यांग व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद सांगली व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा सांगली यांच्या अधिनस्त सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या विशेष शाळा /कर्मशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी एकूण ३७ विशेष शाळा/कर्मशाळा सहभागी झाल्या. या कार्यक्रमासाठी ८०० विद्यार्थी, दिव्यांग मुलांचे पालक, विविध संघटना, संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी समाजामध्ये दिव्यांगांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी काढण्यात आली.
00000
एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती
सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : एस. एस. बी. (Service Selection Board) या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 15 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत एस.एस.बी. कोर्स क्र. 64 आयोजित करण्यात येत आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एस.एस.बी. (Service Selection Board) च्या पूर्वतयारीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येतेवेळी उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-64 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.
एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत - कम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट ‘A’ किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस. एस. बी. कॉल लेटर असावे किंवा एस. एस. बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२३३-२९९०७१२ आणि 0253-2451032 किंवा व्हॉटस्ॲप क्र. 9404969145 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला
- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. ३, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. तथापि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने त्यांना सदर परीक्षा देता यावी याकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
दरम्यान, या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दि. २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता दि. ८ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील, त्यांनी दि. ८ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे - नियमित शुल्कासह ८ डिसेंबर २०२५पर्यंत, विलंब शुल्कासह ९ ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर २०२५ पर्यंत, अति विशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत.
३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000
मंगळवार, २ डिसेंबर, २०२५
नगरपरिषद /नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 जिल्ह्यात सरासरी 75.96 टक्के मतदान
- 21 डिसेंबरला होणार मतमोजणी
सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 75.96 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर 2025 ऐवजी सुधारीत निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे.
जिल्ह्यातील उरूण -ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नगरपरिषद /नगरपंचायतनिहाय एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे. उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 64215 पैकी 47608, 74.14 टक्के, विटा नगरपरिषद - 46332 पैकी 36770, 79.36 टक्के, आष्टा नगरपरिषद - 30573 पैकी 22856, 74.76 टक्के, तासगाव नगरपरिषद – 32994 पैकी 23249, 70.46 टक्के, जत नगरपरिषद – 28090 पैकी 20464, 72.85 टक्के, पलूस नगरपरिषद – 22067 पैकी 17716, 80.28 टक्के, शिराळा नगरपंचायत – 13095 पैकी 10879, 83.08 टक्के, आटपाडी नगरपंचायत – 20611 पैकी 16410, 79.62 टक्के.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सह आयुक्त नगरप्रशासन दत्तात्रय लांघी, डॉ. पवन म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील 6 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात चोख पोलीस बंदोबस्तामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली.
आठही नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष सोय करण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. विशेष मतदान केंद्रे तसेच गुलाबी मतदान केंद्रे सजविण्यात आली होती.
00000
रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५
स्वच्छता केवळ कृती नसून, एक संस्कृती - जिल्हाधिकारी अशोक काकडे
- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम
सांगली, दि. 30 (जि. मा. का) : स्वच्छता ही केवळ एक कृती नसून, ती एक संस्कृती आहे. स्वच्छ परिसर व कार्यालयीन वातावरणामुळे कार्यक्षमतेत वाढ होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्वच्छ कार्यालय व परिसर यामुळे सकारात्मकता टिकून राहते आणि नागरिकांना चांगल्या सुविधांचा अनुभव मिळतो. त्यामुळे आपल्या कार्यालयाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नरत रहावे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, तहसिलदार लीना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अनावश्यक वनस्पती जाती निर्मूलन मोहिमेचे देवराई अभ्यासक रोहन पाटील व पर्यावरण प्रेमी कौस्तुभ पोळ यांनी स्वागत केले आहे. रानमोडी, ओसाडी आणि घाणेरी या विदेशी तणांनी जिल्ह्यातील पर्यावरण, शेती आणि स्थानिक जैवविविधतेवर अतिशय धोका निर्माण केला आहे. या तणांमुळे सुपीक जमीन अशक्त होत आहे, पिकांचे उत्पादन कमी होत आहे आणि स्थानिक वनस्पतींचा नाश होत आहे. हे संकट ओळखून जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातून विदेशी तण समूळ नष्ट करण्याची प्रभावी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील कचरा व अनावश्यक वनस्पतीच्या जाती निर्मूलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे व मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
*जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत 9 टन ओला कचरा काढण्यात आला.*
०००००
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद व शिराळा, आटपाडी नगरपंचायत यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 11 नोव्हेंबर 2008 च्या आदेशानुसार ज्या दिवशी मतदान अधिकारी/कर्मचारी सर्व मतदान साहित्य घेवून मतदान केंद्राचा ताबा घेतात, त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळांना सुट्टी देणे आवश्यक आहे. तसेच मतदानाच्या दिवशीसुध्दा शाळांना सुट्टी राहील, याची खात्री करण्याची यावी, असे नमूद आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना दि. 26 नोव्हेंबर 2025 अन्वये संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्ये दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दिनांक 01 डिसेंबर, 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार असल्याने मतदान केंद्र असलेल्या शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
00000
पोलीस अंमलदारांना गुन्हे तपास प्रशिक्षणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत - पोलीस अधीक्षक संदीप घुगे
- 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपास प्रशिक्षणाची सांगता
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : गुन्हे तपासविषयक प्रशिक्षण घेतलेले पदवीधर पोलीस अंमलदार हे त्यांच्याकडे सोपविलेल्या कोणत्याही गुन्ह्यांचा तपास बिनचूक व शास्त्रशुद्ध पद्धतीने करतील. त्यातून दोषसिद्धत्वाचे प्रमाण वाढण्यास मदत होऊन, याद्वारे ते समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची - तासगाव येथील राज्य पोलीस दलातील विविध घटकातील 07 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपासविषयक प्रशिक्षण सत्र क्र. 1 च्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची-तासगावचे प्राचार्य धीरज पाटील, पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक एकता पवार, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
गुन्हे तपासाचे व दोषसिद्धीचे महत्त्व विशद करताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईम, आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप क्लिष्ट झाले आहे. अशा गुन्ह्यांची शास्त्रशुद्धपणे उकल होऊन त्यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात गुन्ह्याच्या तपासावेळी निश्चितच फायदा होणार आहे. काहीवेळा केवळ गुन्हे तपासातील त्रुटींमुळे व पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात, अशावेळी दोषसिद्धीकरिता या प्रशिक्षणातील ज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल व त्यामुळे गुन्ह्यातील दोषसिद्धत्व होवून अन्यायग्रस्त पीडितास न्याय मिळवून देण्याचा आनंद फार मोठा असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी प्रशिक्षणाथींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील म्हणाले, गुन्हे तपास विषयक प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये राज्यातील विविध घटकातून उपस्थित राहिलेले सर्व पात्र पदवीधर पोलीस अंमलदार हे आता सर्व प्रकारच्या आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा शास्त्रोक्त तपास व उकल करण्याकरिता सर्वार्थाने सज्ज झाले आहेत. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे यातील ज्ञानाचा वापर करून सर्वजण तपासी अंमलदाराची भूमिका उत्कृष्टपणे बजावतील, असे मत व्यक्त करून त्यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पदवीधर पोलीस अंमलदार यांचे गुन्हे तपासविषयक प्रशिक्षणाचे सत्र क्र. १ हे ३ नोव्हेंबरपासून ४ आठवडे कालावधीकरिता आयोजित करण्यात आले होते. त्यामधील 471 पदवीधर पोलीस अंमलदार हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, धाराशिव, लातूर, बीड, पालघर, ठाणे ग्रामीण, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण आणि लोहमार्ग-मुंबई, लोहमार्ग-पुणे अशा एकूण 15 पोलीस घटकांमधून आलेले होते.
या 4 आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांना गुन्हे तपासाच्या अनुषंगाने, सुधारित भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच किरकोळ कायदे यामधील महाराष्ट्र पोलीस अधिनियम दारूबंदी अधिनियम, जुगार प्रतिबंधक अधिनियम, मोटार वाहन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम, JJ Act, इत्यादी कायदे आणि पोलीस स्टेशनला एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा एफ. आय. आर., घटनास्थळ पंचनामा, पुरावे गोळा करणे, जबाब घेणे, आरोपी अटक करताना घ्यावयाची दक्षता, आरोपींची विचारपूस, तंत्र, पोलीस स्टेशनला दाखल होणारे अकस्मात जळीत, मोटार अपघाताचे गुन्हे, चोरीचे गुन्हे, अंगुली मुद्रा, सायबर गुन्हे या विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले आहे.
प्रशिक्षणाअंती, घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये 469 प्रशिक्षणार्थी पदवीधर पोलीस अंमलदार हे उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थींना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक एकता पवार यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ यांनी मानले.
00000
शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५
नगरपरिषद व नगरपचांयत क्षेत्रात 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी - जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि. 28 (जि.मा.का) : नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या मतदारसंघात पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव, विटा या नगरपरिषदा तसेच आटपाडी आणि शिराळा या नगरपचांयतींच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.
मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागू राहणार आहे. निवडणूक होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
00000
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता 1 डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार
सांगली, दि. 28 (जि.मा.का) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावे ; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे सुधाारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
पणजी येथे 9 डिसेंबरला डाक अदालत
सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत दि. 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्र पणजी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2025 आहे, असे प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तु, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, बचत बँक खाते इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नांव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह 1 डिसेंबर पर्यंत सहाय्यक निदेशक डाक सेवा, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी ४०३००१ यांचे नावे पाठवावेत, असे प्रवर डाक अधीक्षक सांगली यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
000000
ालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात - जिल्हाधिकारी अशोक काकडे
ब
- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये बाल विवाह मुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प हे अभियान यशस्वीरित्या पार पाडावे. सर्व विभाग प्रमुख व विवाहसंबंधित खाजगी व्यवसायिकांनी बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
महिला व बालविकास विभागासह संबंधित यंत्रणा, विवाह नोंदणी संस्था, गाव कामगार पोलीस पाटील, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल सरंक्षण समिती, स्वयंसेवी संस्था, प्रामुख्याने सामाजिक / धार्मिक नेते तसेच विवाह संबंधीत सेवा पुरवठाधारक, बँड पथक, कॅटरर्स / आचारी यांनी बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात. आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
मंगल कार्यालय हॉल मालक / हॉटेल मालक, मंडप, डेकोरेशन मालक, विवाह पत्रिका छापताना प्रिटिंग प्रेस मालक यांनी अल्पवयीन मुलींची लग्नाची पत्रिका छापू नये. याबाबतची माहिती निदर्शनास आल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सांगली या कार्यालयाशी संपर्क करावा किंवा 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
बालविवाह हा एक खोलवर रुजलेला सामाजिक प्रश्न आहे, जो विशेषत: मुलींच्या हक्कांवर, आरोग्यावर आणि भविष्यावर परिणाम करतो. यामुळे मुलींचे शिक्षण खंडीत होते. अल्पवयीन गर्भधारणा व लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रभावित होते. शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतरही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बालविवाहाचे प्रकार आढळतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राज्यव्यापी अभियान “बालविवाह मुक्त महाराष्ट्र - आपला संकल्प” 15 ऑक्टोबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी शासकीय विभाग, सामाजिक नेते, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, बालविवाहासाठी व नागरिक यांना एकत्र आणून सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करावयाचा असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५
नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 प्रसारमाध्यमे समन्वय अधिकारीपदी डॉ. पवन म्हेत्रे
सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा, जत, पलूस नगरपरिषद तसेच शिराळा व आटपाडी नगरपंचायत अशा एकूण 8 नगरपरिषदा/नगरपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत प्रसारमाध्यमे यांच्याकरिता संपर्क व समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9860010308 असा आहे, असे नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५
नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार
- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार
सांगली, दि. 15 (जि.मा.का.) : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा (उरुण- ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस) व 2 नगरपंचायत (शिराळा, आटपाडी) यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा दि. 10 नोव्हेंबर 2025 ते दि. 17 नोव्हेंबर 2025 (सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 पर्यंत) आहे. तसेच या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे.
परंतु, आता संगणकप्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेले असल्याने तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५
मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन - फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम 1 (ब) रहदारी अधिकारान्वये सुधारित वाहतूक नियोजन जाहिरनामा कायमस्वरूपी प्रसिध्द केला आहे. यानुसार मिरजेतील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक व दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे.
मिरज शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्यालगत ज्युबिली कन्या शाळा व इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने त्याचबरोबर दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक हा शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता तांदूळ मार्केट, महानगरपालिका कार्यालय, तलाठी कार्यालय असल्याने एस.टी. बसेस व जड वाहने नमूद रोडवरुन ये-जा करी असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होते.
शहरातील वाहतूक सुरळीतपणे विना अपघात चालू रहावी यासाठी मिरज शहरातील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी तसेच दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक जाणारा रस्ता एकेरी वाहतुक (वन वे) आवश्यक आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातास आळा बसेल. तसेच वाहतूक सुरळीत चालू राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होणार नाही. सदर भागातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या इंधनाचा वेळेचा अपव्यय होणार नाही. सदर भागातील मागणीनुसार खालीलप्रमाणे एकेरी वाहतूक मार्ग (वन वे) करण्यात आला आहे.
एकेरी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - फुलारी कॉर्नर ते दत्त चौक - फुलारी कॉर्नर ते दत्त चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी (वन वे) करण्यात आला आहे. दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे जाता येईल.
दत्त चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौकातून दत्त चौकाकडे दुचाकी वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनचालक यांना महाराणा प्रताप चौकातून डावीकडे उत्तरेस वळण घेऊन फुलारी कॉर्नर मार्गे दत्त चौक व गाडवे चौकाकडे जाता येईल.
सदरचा जाहिरनामा दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पासून कायमस्वरुपी करण्यात आला असून, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.
00000
मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन
मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन
- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम 1 (ब) रहदारी अधिकारान्वये सुधारित वाहतूक नियोजन जाहिरनामा कायमस्वरूपी प्रसिध्द केला आहे. यानुसार मिरजेतील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक व दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे.
मिरज शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्यालगत ज्युबिली कन्या शाळा व इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने त्याचबरोबर दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक हा शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता तांदूळ मार्केट, महानगरपालिका कार्यालय, तलाठी कार्यालय असल्याने एस.टी. बसेस व जड वाहने नमूद रोडवरुन ये-जा करी असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होते.
शहरातील वाहतूक सुरळीतपणे विना अपघात चालू रहावी यासाठी मिरज शहरातील फुलारी कॉर्नर ते दत्त चौक जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी तसेच दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक जाणारा रस्ता एकेरी वाहतुक (वन वे) आवश्यक आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातास आळा बसेल. तसेच वाहतूक सुरळीत चालू राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होणार नाही. सदर भागातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या इंधनाचा वेळेचा अपव्यय होणार नाही. सदर भागातील मागणीनुसार खालीलप्रमाणे एकेरी वाहतूक मार्ग (वन वे) करण्यात आला आहे.
एकेरी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - फुलारी कॉर्नर ते दत्त चौक - फुलारी कॉर्नर ते दत्त चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी (वन वे) करण्यात आला आहे. दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे जाता येईल.
दत्त चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला आहे. महाराणा प्रताप चौकातून दत्त चौकाकडे दुचाकी वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. नमूद वाहनचालक यांना महाराणा प्रताप चौकातून डावीकडे उत्तरेस वळण घेऊन फुलारी कॉर्नर मार्गे दत्त चौक व गाडवे चौकाकडे जाता येईल.
सदरचा जाहिरनामा दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पासून कायमस्वरुपी करण्यात आला असून, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.
00000
परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका, शेतमालावर प्रकिया काळाची गरज - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- उत्पादक खरेदीदार संमेलनात प्रतिपादन
- संमेलनास शेतकरी, निर्यातदारांचा उत्स्फूर्त सहभाग
- 48 शेतकरी गटांचे स्टॉल, 45 निर्यातदार / खरेदीदारांचा सहभाग
- 14.39 कोटींच्या 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार
सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका. शेतीपूरक व्यवसाय सुरू केल्याशिवाय शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार नाही. शेतमालावर प्रकिया ही काळाची गरज असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
सांगली पॅटर्न - चला शेतकऱ्याला व्यापारी करू… या घोषवाक्यासह आयोजित उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दीपायन हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास कृषि आयुक्त सूरज मांढरे व अपेडाचे संचालक डॉ. परशुराम पाटील हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उत्पादक खरेदीदार संमेलनातून शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होत आहे. शेतीमाल निर्यात क्षेत्रात शेतकरी महिलांनाही प्रोत्साहन द्यावे. अशा संधी उपलब्ध होण्यासाठी अपेडाने पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले. यावेळी त्यांनी स्वानुभवाचे विविध दाखले देत शेतीमधील स्वप्रयोगांची माहिती दिली. तसेच, संमेलनाच्या आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे व कृषि विभागाचे अभिनंदन केले.
उत्पादक खरेदीदार कृषि संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन करुन दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना कृषि आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतीमालाचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. यासाठी उत्पादक व खरेदीदारांनी परस्पर सुसंवाद ठेवावा. जगाच्या बाजारपेठेची स्थिती व गरज शेतकरी बांधवांनी जाणून घेण्याची गरज आहे. त्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांनी व्यावसायिक पद्धतीने शेती करावी. जी. आय. मानांकित उत्पादने घ्यावीत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत. त्यासाठी हे संमेलन दिशादर्शक ठरेल. यातून चांगले करार होऊन संमेलनाचे सार्थक होईल, असा विश्वास व्यक्त करून यावेळी त्यांनी यासाठी राज्यस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कृष्णाकाठच्या व येरळा, वारणा आदि उपनद्यांच्या परिसरात वसलेल्या सांगली जिल्ह्यातील नररत्नांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती दिली आहे. जिल्ह्याला राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, कृषि क्षेत्रात मोठा वारसा आहे. या सर्वांनी सांगली जिल्ह्याला आकार दिला आहे. शेती सांगलीची शान असून, इथल्या द्राक्ष, डाळिंब, केळी, ड्रॅगनफ्रुट आदिंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्याचा लाभ होऊन इथल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, या हेतूने हे संमेलन आयोजित केले आहे. या उत्पादक खरेदीदार कृषि संमेलनातून केवळ एकच दिवस नव्हे तर दोघांतही नियमित सकारात्मक संवाद व्हावा. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या उपक्रमाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यात या संमेलनाचे योगदान राहील, असे सांगून त्यांनी आपण पाहिलेले हे सर्वोत्तम संमेलन असल्याचे सांगितले.
यावेळी अपेडाचे संचालक डॉ. परशुराम पाटील, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, मित्राचे केदार पवार, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, पशुसंवर्धन उपयुक्त अजयनाथ थोरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विवेक कुंभार यांनी केले. आभार राजेश शहा यांनी मानले. सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले. रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. तसेच, कृषि विभागाने तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, अपेडा व कृषि विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
14.39 कोटीचे खरेदी विक्रीबाबत करार
जतचे उपविभागीय अधिकारी गणेश श्रीखंडे म्हणाले, यावेळी 145 शेतकऱ्यांची 14.39 कोटी रूपयांची 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार पार पडले. त्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 48 शेतकरी गटांनी या संमेलनात स्टॉल लावले होते. 45 निर्यातदार / खरेदीदारांनी संमेलनात व 145 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष संवादात सहभाग नोंदवला. जवळपास दीड हजारच्या आसपास शेतकरी उपस्थित होते. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संमेलनात विविध संलग्न विभागाचे अधिकारी, जिल्ह्यासह राज्यभरातील निर्यातदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
00000
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त युनिटी पदयात्रा उत्साहात संपन्न
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सरदार @150 एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा आज उत्साहात संपन्न झाली. तरुण भारत स्टेडियम येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पदयात्रेची सुरूवात करण्यात आली.
जिल्हा प्रशासन व मेरा युवा भारत सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही पदयात्रा तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन सिटी पोस्ट मार्गे शिवाजी क्रीडांगण या ठिकाणी या पदयात्रेची सांगता झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, लेखालिपिक व कार्यक्रम पर्यवेक्षक सिद्धार्थ चव्हाण आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी एकतेची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्र वरील शाहिरी पथकाच्या पोवाड्याने झाली तर सांगता राष्ट्रीय एकतेवरील सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.
या पदयात्रेत मेरा युवा भारत सांगली, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स, जिल्हा आरोग्य विभाग व आरोग्य पथक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात ही पदयात्रा आयोजित करण्यात आली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सागर व्हनमाने, महेंद्र साठे, शुभम कानडे, प्रशांत पाटील,राजमती वाडकर यांनी परिश्रम घेतले.
00000
बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५
नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर करण्यात आला आहे. राखीव जागांसाठी निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत. सदर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२५ मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीची असून अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000
मल्लखांब खेळातून मानसिक, शारीरिक संतुलन - जिल्हाधिकारी अशोक काकडे
- राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात सुरू
सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : मल्लखांब हा भारताचा प्राचीन खेळ आहे. या खेळामध्ये मानसिक, शारीरिक संतुलन आणि धैर्य सुध्दा आहे. अनेक छत्रपती पुरस्कारार्थी या खेळामधील आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे या खेळाचा वसा आणि वारसा खेळाडुंनी जपावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल मिरज येथे आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते बाबासाहेब समलेवाले, तालुका क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी नरेश सावंत, क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांच्यासह खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, खेळाडुंनी त्यांच्यामधील जे उत्तम आहे ते प्रकट करावे. या स्पर्धा निकोप वातावरणात पूर्ण कराव्यात. खेळाडुंनी खेळाचा आनंद मनमुराद लुटावा. आपल्याला विपरित परिस्थितीत संतुलन साधता आले पाहिजे, हे सर्व मल्लखांब खेळातून शक्य होते. या खेळाचे नाव देशभरात जगभरात, नेण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच ही स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी येथील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
यावेळी आशियाई ॲक्रोबेटिक्स स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडुंचा सन्मान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यातील एकूण आठ विभागातून चार मुले व चार मुली तसेच पंच, निवड समिती सदस्य, तांत्रिक अधिकारी असे एकूण 125 खेळाडू व अधिकारी यांचा सहभाग आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडू उज्जैन (मध्य प्रदेश) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी केले. आभार तालुका क्रीडा अधिकारी विकास माने यांनी मानले.
00000
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा आजपासून
सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मिरज या ठिकाणी दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या स्पर्धेसाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर व लातूर अशा 8 विभागातून एकूण 64 स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामधून राज्याच्या टीमसाठी निवड केली जाणार आहे. स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवासाची व भोजनाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
0000
नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता काय करावे? व काय करू नये?
नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता
काय करावे? व काय करू नये?
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी व मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा या 6 नगरपरिषदा आणि आटपाडी व शिराळा या 2 नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने काय करावे व काय करू नये याबाबतची सूची जाणून घेऊया. ही सूची उदाहरणदाखल असून ती सर्वसमावेशक नाही. या व्यतिरिक्त वेळोवेळी जारी केलेले आदेश, निर्देश / सूचना यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
काय करावे?
१. चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरू ठेवता येतील.
२. ज्याविषयी शंका निर्माण होईल, अशा बाबींच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग /महानगरपालिका आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण / मान्यता प्राप्त करण्यात यावी.
३. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व या संदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील.
४. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.
५. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना / निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना/ निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे.
६. विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरे बाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत.
७. इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी.
८. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे.
९. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात.
१०. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांच पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी अर्ज केले पाहिजेत व वेळीच अशी सवलत मिळविली पाहिजे.
११. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिक्षेपक (Loudspeaker) किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी योग्य परवानगी मिळविली पाहिजे.
१२. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचे सहाय्य मिळविण्यात यावे.
१३. कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची वेळ व जागा, मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरवणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.
१४. मिरवणूक ज्या वस्तीमधून जात असेल, त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्या विषयी खात्री करुन त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे, त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधांचे अनुपालन करण्यात यावे.
१५. मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये.
१६. ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू मिरवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत.
१७. मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पडावे यासाठी सर्वतोपरी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य देण्यात यावे. उमेदवार व त्याच्या अधिकृत कार्यकर्त्यांनी विहित परवानगी घेऊन योग्य असे बिल्ले व ओळखपत्रे, निवडणूक प्रशासनाकडून मिळवावीत व ती निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ती दर्शनी भागावर लावावीत.
१८. मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा निर्देश असणार नाही.
१९. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे.
२०. राज्य निवडणूक आयोगाचे, महानगरपालिका आयुक्त यांचे अथवा जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा त्यांनी प्रधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याहीवेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही.
२१. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी/ क्षेत्र/ प्रभाग दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.
२२. राज्य निवडणूक आयोग / आयुक्त, महानगरपालिका/ जिल्हाधिकारी / निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबींविषयीचे निर्देश / आदेश/अनुदेश यांचे पालन करण्यात यावे.
काय करु नये?
१. शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनात पुढील कार्यालयाच्या वाहनाचा समावेश असेल.
(१) केंद्र शासन (२) राज्य शासन (३) केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळे (४) केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम (५) स्थानिक स्वराज्य संस्था (६) महानगरपालिका (७) नगर परिषदा / नगर पंचायती (८) पणन मंडळ (कोणत्याही नावाचे) (९) सहकारी संस्था (१०) जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या ग्रामपंचायती (११) ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्श्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतवण्यात आला आहे, अशी कोणतीही संस्था व (१२) संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, राज्य शासन, केंद्रीय पोलिस संघटना इत्यादीच्या मालकीची असलेली पुढील वाहने - मालमोटारी, लॉरी, टेंपो, जीपगाड्या, मोटारगाड्या, ऑटोरिक्षा, बसगाड्या, विमाने, हेलिकॉप्टर, जहाजे, बोटी, हॉवर क्रॉफ्ट व इतर सर्व वाहने.
२. सत्तेमध्ये असलेला पक्ष/शासन यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये.
३. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इ. बांधण्याचे वचन देणे इत्यादी गोष्टी करू नयेत.
४. शासन/सार्वजनिक उपक्रम याच्या सेवेत कोणत्याही तदर्थ (Ad hoc) नियुक्त्या करु नयेत.
५. मंत्री (राज्यमंत्री व उपमंत्रीसहित) हे उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाहीत.
६. निवडणूक मोहीम/प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये.
७. मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये.
८. मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये.
९. विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद जामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्यः वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.
१०. इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
११. ज्यांचा खरेखोटेपणा पडताळून पाहिलेला नाही, असे आरोप ठेवून किंवा त्यास विकृत स्वरुप देऊन इतर पक्ष किवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर टीका करण्यात येऊ नये.
१२. निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी साठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करण्यात येऊ नये.
१३. लाच देणे, आवजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहेत.
१४. व्यक्तींची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नये.
१५. कोणत्याही व्यक्तीला, अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत आवारभिंत इत्यादींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवानगीखेरीज करणे, ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे इत्यादी करता येणार नाही. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व खाजगी जागांचा समावेश असेल.
१६. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये किंवा मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये.
१७. एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मिरवणूक काढण्यात येऊ नये.
१८. दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भित्तीपत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत. मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिसांच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे.
१९. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षाजवळ प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये.
२०. ध्वनिक्षेपकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी ६.०० वाजण्यापूर्वी किंवा रात्री १०.०० वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये. तसेच याबाबत असलेले The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
२१. तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मिरवणुकीत किंवा प्रचारफेरीत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. अशा सभा/ प्रचारफेरी रात्री १०.०० वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच घालून दिलेल्या अटींचे पालन करावे. याखेरीज, स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवश्यकतेचा स्थानिक दृष्टीकोन आणि हवामान, सणासुदीचे दिवस, परिक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असतील.
२२. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पैशाचे, मद्याचे, वस्तूंचे वाटप करण्यात येऊ नये.
(संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)
सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५
शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन - जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : शेतकऱ्यांना हमखास व स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभ घेता यावा, तसेच जिल्ह्यातील कृषी उद्योगास व निर्यातीस चालना मिळण्यासाठी सांगली येथे शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्पादक खरेदीदार (बायर-सेलर मीट) संमेलन घेण्यात येणार आहे. हे संमेलन दीपायन बँक्वेट हॉल, जुने आरटीओ ऑफिस समोर, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या उत्पादक खरेदीदार संमेलनामध्ये 100 पेक्षा जास्त खरेदीदार सहभाग घेणार आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला या माध्यमातून नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे. या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्षे, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी व इतर तृणधान्य प्रक्रिया केलेली उत्पादने यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील काही भाग पूर्वी दुष्काळी होता. परंतु, आता ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या उपसा जलसिंचन योजनांमुळे पूर्णपणे बागायत झालेला आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आता सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी या फळपिकांचे उत्पादन करण्यात येते व देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात येते. विशेषतः द्राक्ष व बेदाणा निर्यातीसाठी सांगली जिल्ह्याची विशेष ओळख आहे. या फळपिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या नवीन बाजारपेठांची ओळख शेतकऱ्यांना होण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
00000
नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025
नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये अडीच लाख मतदार, 291 मतदान केंद्रे
- जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. या सर्व नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 इतके मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रे आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदेपैकी उरूण-ईश्वरपूर व विटा या ब वर्ग नगरपरिषदा आहेत तर आष्टा, तासगाव, जत, पलूस या क वर्ग नगरपरिषदा आहेत. शिराळा व आटपाडी या नगरपंचायती आहेत. या सर्व नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 इतके मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रे आहेत. एकूण 107 प्रभाग असून एकूण सदस्य संख्या 181 आहे. यापैकी महिला सदस्य संख्या 92 आहे. एकूण 181 सदस्य संख्यैपैकी अनुसूचित जाती 24, अनुसूचित जमाती 01, नागरिकांचा मागास प्रवर्ग 48 व सर्वसाधारण 108 सदस्य संख्या आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिनांक 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरणे व स्वीकारण्याचा कालावधी आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि. 19 ते 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे, अपील असल्यास दि. 21 ते 25 नोव्हेंबर असा आहे. अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दि. 25 नोव्हेंबरपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 26 नोव्हेंबर आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रात होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असे ते यावेळी म्हणाले.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील ब वर्ग नगरपरिषदेसाठी (विटा व उरूण-ईश्वरपूर) थेट अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार व सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार खर्च मर्यादा आहे. क वर्ग नगरपरिषदेसाठी (आष्टा, तासगाव, जत व पलूस) थेट अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार व सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार तर नगरपंचायत (शिराळा व आटपाडी) थेट अध्यक्ष पदासाठी 6 लाख रूपये व सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार रूपये खर्च मर्यादा असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात येत असून या अभियानाचा उद्देश प्रत्येक पात्र मतदाराने आपले मतदानाचे कर्तव्य न चुकवता पार पाडावे आणि लोकशाही बळकट करावी असल्याचे ते यावेळी म्हणाले.
00000
दुचाकी वाहनाकरिता बुधवारपासून नवी मालिका
सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगलीकरिता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई यू (EU) ही नवीन मालिका बुधवार, दि. 12 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दी-पत्रकाव्दारे दिली आहे.
एम एच 10 ई यू (EU) या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहित केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादिंची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा डीडी जो अर्जदार सादर करेल, त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत, उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा
सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी सांगली येथे व शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी उरूण ईश्वरपूरमध्ये पदयात्रेचे आयोजन केल्याची माहिती मेरा युवा भारत, सांगलीचे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हा कार्यक्रम आणि उपक्रम माय भारत पोर्टलवर होत आहे. या पोर्टलवर नोंद करून जिल्ह्यातील नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होऊन सक्रियपणे सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.
पहिली “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी समाप्त होईल. तसेच दुसरी जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वा. उरूण ईश्वरपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी काढण्यात येणार आहे.
मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात या दोन “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” आयोजित केल्या जात आहेत.
या पदयात्रेसोबत स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती मोहीम, सरदार पटेल यांच्या विचारावर चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमात जिल्हा प्रशासन, माय भारत, शाळा, महाविद्यालय, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स यांचा सहभाग असेल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५
एक दिवा सैनिकांसाठी - दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात
सांगली, दि. १९ (जि. मा. का.) : 'दिवाळी सकाळ सैनिका परिवारासोबत' साजरी करण्याच्या उद्देशाने सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून 'एक दिवा सैनिकांसाठी' हा अभिनव उपक्रम आज महावीर चक्र विजेते शहीद पांडुरंग साळुंखे संकुल सांगली येथे उत्साहात पार पडला.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, विंग कमांडर प्रकाश नवले (शौर्य चक्र) (निवृत्त), ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, कर्नल भूषण कल्याणी (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी 'सांगली व्हिजन २०३०' बाबत सर्व सैनिकांना माहिती दिली. देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांचे पाठबळ प्रशासनाला मिळावे, या उद्देशाने माजी सैनिकांनी समाजात सक्रिय कार्य करावे, असे आवाहन केले. सैनिकांप्रती असणारे त्यांचे प्रेम, भावना आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना घेता आला.
ग्रुप कॅप्टन श्री. वालवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. भीमसेन चवदार यांनी प्रास्ताविक केले. ध्वज दिन निधीसाठी सुषमा सुरेश बाळ यांनी 1 लाख रूपये, मिलिंद तनवडे यांनी 30 हजार रूपये, ॲड. सत्यजित शेगूंशी यांनी 21 हजार रूपये धनादेश सुपूर्द केल्याबद्दल तसेच प्राचार्य ए.व्ही. कुलकर्णी यांनी 5 लाख रूपयांची सैनिक संकुलात विकास कामे केल्याबद्दल डॉ. चवदार यांनी या सर्वांचे आभार मानून 12 वर्षात प्रथमच ध्वज दिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण गवळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मुलांचे वसतिगृह अधीक्षक गजानन जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला वीरपत्नी, वीरमाता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबित तसेच तालुका निहाय सैनिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक, सैनिकी वसतिगृहातील मुले व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रगीत व राज्य गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिक-अधिकाऱ्यांनी सैनिक परिवारासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
०००००
जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना
जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन!
- सांगली पॅटर्न - एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!
सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 25 टन पेरू, टोमॅटो व दहा हजार अंडी नेण्यासाठी एक विशेष वॅगन पहिल्यांदाच जोडण्यात आली. आज पहाटे सव्वा पाच वाजता “दर्शन एक्सप्रेस" या रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठविण्यात आली.
मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे व समित कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून “दर्शन एक्सप्रेस" रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
प्रायोगिक तत्वावर फळे, भाजीपाला पाठविला असून तो पुढील काळात बाजार मागणीनुसार दररोज किंवा आठवड्यातून एकदा रेल्वेने पाठविण्याबाबत नियोजन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे व रेल्वे विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते. त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचे ही आभार मानले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार व त्यांचे सर्व अधिकारी श्री. पाटील, श्री. माळी आदींनी यासाठी मेहनत घेतली.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
00000
शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
- 31 ऑक्टोबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे दिले निर्देश
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत कार्यान्वयीन यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
सन 2025-26 च्या प्रशासकीय मान्यताप्राप्त कामे सुरू करण्याचे आदेश देऊन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत कामांना, योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्याला एक महिना मुदतवाढ मिूळून जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रातील योजनांतर्गत जिल्हास्तरीय कामांकरिता तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित अवधी पाहता व तसेच सुटीचा कालावधी लक्षात घेता सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करावी. यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत जिल्ह्यातील विविध राज्यस्तरीय कार्यान्वयीन यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस दल, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती, अर्थसंकल्पिय तरतूद आदिंचा आढावा घेतला.
जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यातील राज्यस्तर यंत्रणा, जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभाग, महानगरपालिका आदिंसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)