गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

गणेशोत्सवासाठी पोलीस दल सज्ज

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि बकरी ईद निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस दल सज्ज आहे. यासाठी गणेश मंडळे, शांतता समिती बैठकांचा धडाका सुरू असून प्रबोधनपर रॅली, प्रतिबंधक कारवाई, चोख बंदोबस्त करण्यासाठी योग्य पावले उचलण्यात आली आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संपूर्ण गणेश उत्सव, बकरी ईद काळात जिल्ह्यामध्ये 151 पोलीस अधिकारी, 2016 पोलीस कर्मचारी, 1000 होमगार्ड एक एसआरपीएफ कंपनी इतका पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
दिनांक 5 ते दिनांक 15 सप्टेंबर 2016 या कालावधीत गणेशोत्सव दिनांक 12 सप्टेंबर 2016 रोजी बकरी ईद सण आहे. सांगली जिल्ह्यात अंदाजे 4750 इतके सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. हे दोन्ही सण शांतता, सलोखा आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, गणेशोत्सव शांततेत डॉल्बीमुक्त साजरा करण्यासाठी मी स्वतः सात बैठका घेतल्या आहेत. त्याशिवाय, तालुका स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी 25 बैठका आणि स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर प्रभारी अधिकारी यांनी गणेशोत्सव मंडळांच्या 99 बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन आवाहन केले. विशेष म्हणजे पोलीसांच्या या आवाहनास प्रतिसाद देवून आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 101 गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करण्याबाबत वचनपत्र दिले आहे, याबद्दल श्री. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांची स्वतंत्रपणे बैठक घेवून यापूर्वी गणेश उत्सव बंदोबस्तादरम्यान आलेल्या अडचणी उपाय योजना यावर चर्चा करुन मार्गदर्शन केले. तसेच, पोलीस ठाणे स्तरावर शांतता समितीच्या तसेच समाजातील प्रतिष्ठीत हिंदू, मुस्लिम नेत्यांच्या बैठका घेवून गणेशोत्सव बकरी ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवायही इतर अनेक उपक्रम राबवण्यात आले. मिरज शहरामध्ये डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली. गणेशोत्सव दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण           झाल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला आहे. चालू वर्षी गणेश उत्सव, बकरी ईद सण काळात उपद्रवी ठरणाऱ्या 3 हजार 35 व्यक्तिंविरुद्ध प्रतिबंधकात्मक कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. आतापर्यंत 282 व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
मागील वर्षी ध्वनी प्रदूषण अधिनियम सन 2000 चा भंग करण्याविरोधात 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षीही असा व्यक्तिंविरूद्ध कारवाई करण्यासाठी 13 ध्वनीमापक यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 78 पोलीस अधिकारी 325 पोलीस कर्मचारी यांना ध्वनीमापक यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्याशिवाय सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे जातीय सलोखा योजनेंतर्गत "आदर्श गणपती मंडळ" बक्षीस योजना जाहीर केली आहे. डॉल्बी मुक्त, पर्यावरण संरक्षक जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस ठाणे स्तरावर प्रथम बक्षीस 1000 रुपये, द्वितीय बक्षीस 700 रुपये तृतीय बक्षीस 500 रुपये जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस 5000 रुपये, द्वितीय बक्षीस 3000 रुपये तृतीय बक्षीस 2000 रुपये देण्यात येणार आहे. तसेच, डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांचा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
पोलीस दलातर्फे काही विधायक उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये एक गाव एक गणपती डॉल्बीमुक्त गणेशोत्सव आदिंचा समावेश आहे. यावर्षी पोलिसांच्या आवाहनास प्रतिसाद देवून जिल्ह्यातील 79 गावांमध्ये एक गाव गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील 61 मंडळांनी महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवारास आर्थिक मदत करण्याचे ठरविले आहे.
जिल्ह्यामध्ये कृष्णा माई घाट सांगली, गणेश तलाव मिरज, कृष्णा घाट मिरज, हरिपूर घाट, औदुंबर घाट, भिलवडी, ताकारी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन होते. या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीदरम्यान अपघात होवू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

संप्रदा द. बीडकर
                                                          प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                                                                           सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा