रविवार, ५ जुलै, २०२६
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आजही अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती व्यवसाय टिकवून ठेवत आहे. अतिवृष्टी, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणे कठीण बनते आणि अनेक शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतात.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026" जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश केवळ कर्जमाफी देणे एवढाच नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना दीर्घकालीन स्थैर्य मिळवून देणे हा आहे.
यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तसेच प्रोत्साहनपर लाभ योजना राबवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. मात्र, कर्जमुक्तीनंतरही काही शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत असल्याचे लक्षात आल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शासनाने अधोरेखित केली आहे.
या योजनेंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत प्रोत्साहन मिळणार आहे.
योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. शेती क्षेत्र अधिक सक्षम करणे, बँकिंग व्यवस्था मजबूत करणे तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय राबविण्याचा शासनाचा मानस आहे.
कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभासाठी पात्रता निकष निश्चित करण्यात आले असून, अपात्र लाभार्थ्यांसाठीही अटी व शर्ती स्पष्ट करण्यात आल्या आहेत. संपूर्ण अंमलबजावणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील कृषी कर्जपुरवठा अधिक सुलभ आणि सक्षम करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या स्तरावर 'सहकार स्टॅक' ही कृषी कर्जासाठीची आधार सामुग्री संचयिका विकसित करण्यात आली आहे.
राज्याच्या विकासात शेतकऱ्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करून नव्या उमेदीने शेती करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना निश्चितच मोलाची ठरण्याची अपेक्षा आहे.
- जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
000000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा