मंगळवार, ४ जुलै, २०२३
खरीप पिकासाठी लाभ मिळणार फक्त एक रुपयात पीकविमा कवच
सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा उतरविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप विमा उतरविण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत.
केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाचा खरीप हंगाम 2023 ते आणि आगामी रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीतील खरीप व रबी हंगामातील पिकासाठी ही 'सर्वसमावेशक पीक विमा योजना (कप अँड कॅप मॉडेल ८०:११०) राबविण्यास मंजुरी दिली आहे. या विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे. सध्या ही योजना केवळ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकासाठी लागू करण्यात आली आहे. ती ऐच्छिक आहे. शेतकऱ्याव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकासाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे.
योजनेचे उद्देश
पिकांच्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे, स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे.
नुकसान भरपाई
हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आग, बीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे (भात, ऊस व ताग पीक वगळून) भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान. 'सर्वसमावेशक पीक विमा योजना' मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे.
समाविष्ट पिकनिहाय तालुके
भात (जि) - वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा.
ख. ज्वारी - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ.
बाजरी - मिरज, जत, खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ.
तुर - जत.
मका - मिरज, वाळवा, जत, खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ.
उडीद - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ.
मुग - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ.
भुईमुग - मिरज, जत, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ.
सोयाबीन - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ.
कापुस - आटपाडी.
पीकनिहाय तालुक्यातील अधिसूचित मंडळामध्ये पिकविमा लागू आहे.
वातावरणात होत असलेला बदल व पावसाची अनिश्चितता यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, तूर, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठी जिल्ह्यात योजना लागू आहे. सर्व शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा पीक विमा घ्यावा, योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांचे ज्या बँकेत खाते आहे तेथे अथवा विमा कंपनीच्या कार्यालयात सार्वजनिक सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.
केवळ एक रुपया पीकविमा हप्ता भरून शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पीक विमा योजना मध्ये सहभागी व्हावे व पिकविमा कवच मिळवावे. सांगली जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती झालेली असून टोल फ्री क्र. 1800 4195004 असून e-mail: pikvima@aicofindia.com असा आहे.
संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
चित्ररथाव्दारे पीक विमा योजनेची प्रचार प्रसिद्धी प्रचार प्रसिद्धी रथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा
सांगली दि. 4 (जि.मा.का.) : सांगली जिल्हा खरीप हंगाम २०२३ प्रधानमंत्री पीक विमा योजना ही भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पीक विमा योजनेची प्रचार प्रसिध्दी चित्ररथाव्दारे करण्यात येत आहे. प्रचार प्रसिध्दी चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पीक विमा प्रचार प्रसिद्धी सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला.
शेतकऱ्यांना एक रुपयात विमा भरता येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले. विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी संदीप पाटील व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढवावे - वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ
सांगली दि. 4 (जि.मा.का.) : आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश केल्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. पौष्टिक तृणधान्य पिकांचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहु भागात होते. कोरडवाहु भागातील शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्याची पीक पध्दती टिकून रहावी, यासाठी अटल भूजल योजनेतून प्रचार प्रसिध्दी करण्यात येत असून शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढवावे, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी केले.
सन 2023 हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढावे व अटल भूजल योजनेतील गावांमध्ये शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरील पिकांची लागवड करावी म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून अटल भूजल योजनेतील समाविष्ठ कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, बनेवाडी, मोघमवाडी, थबडेवाडी तसेच जत तालुक्यातील बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, जिरग्याळ या गावामध्ये मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, कवठेमहांकाळचे तालुका कृषि अधिकारी एस.जी. तोडकर, कृषि तज्ज्ञ नागनाथ पाटील, बोरगावचे नामदेव पाटील, बोरगावचे ग्रामसेवक श्री. बनसोडे, वनराई संस्थेच्या समन्वयक अंजली वाघे, कृषि तज्ज्ञ व लाभार्थी उपस्थित होते.
तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे, आहारामध्ये वापर वाढविणे, त्यासाठी प्रचार व प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. केंद्र पुरस्कृत व जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना सांगली जिल्ह्यामधील ९५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये जलसुरक्षा आराखड्यामध्ये सूचविल्याप्रमाणे पुरवठा आधारित व मागणी आधारित कामे सुरु करण्यात आलेली आहेत. भूजलातील पाण्याची होत असलेली घसरण थांबविणे व कार्यक्षम पाण्याचा वापर करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे, कमी पाण्यावरील पिकांची लागवड करणे, प्लॉस्टिक मल्चिंगचा वापर करणे, मुरघास बाबींवर मार्गदर्शन करण्यात येत असून सूक्ष्म सिंचनासाठी वाढीव २५ ते ३० टक्के अनुदान योजनेमधून देण्यात येत आहे.
00000
शुक्रवार, ३० जून, २०२३
आपत्ती व्यवस्थापनामध्ये गांभिर्याने काम करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
कामात कुचराई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित होणार
सांगली दि. 30 (जि.मा.का.) :- आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कोणतीही दिरंगाई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये यंत्रणांनी गांभिर्याने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून तयारी बैठक संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, कडेगाव उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जत प्रभारी उपविभागीय अधिकारी जीवन बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, धोकादायक शासकीय इमारती, शाळा, तात्पुरती निवारा व्यवस्था यांचे स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करून घ्यावे. जिल्हा परिषदेकडून २३ बोटींची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह पाठवावा. रेस्क्यूची आवश्यकता भासल्यास स्थानिक लोकांची मदत मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, पोहणारे, स्थानिक मंडळे, संस्था यांची बैठक घ्यावी. चारा उपलब्धतेसाठी मागणी व पुर्ततेचे नियोजन कळवावे. जलजीवन मिशनची खुदाईची कामे मान्सून मध्ये बंद ठेवावीत. कामासाठी खुदाई केलेले रस्ते सुस्थितीत करावेत. एमएसईबीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पुरेशा व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. शासकीय यंत्रणांनी अभिलेखे भिजून नुकसान होवू नये यासाठी सुव्यवस्थित ठेवावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील म्हणाले, संभाव्य महापूरासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. सर्वांनी समन्वयाने संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहू. कृषी विभागाने 2019 ची पाणीपातळी ग्राह्य धरून पंचनाम्यांसाठी पथके तयार करावीत. त्यांना आवश्यक ट्रेनिंग द्यावे. चारा तजवीज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेट लावण्यासाठी तयारी ठेवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच एनडीआरएफची टीम 15 जुलै पासून जिल्ह्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीत 7 जुलै रोजी कर्नाटकेचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यात आंतरराज्य बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)