सोमवार, ८ जानेवारी, २०२४
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके 31 जानेवारी पर्यंत पाठविता येणार
सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२३ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठविता येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२३ Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2024 या विहित कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक/ प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकिटावर 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 राहील. विहित कालमर्यादेनंतर (1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४
विकसीत भारत संकल्प यात्रेमुळे केंद्र पुरस्कृत योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
विकसित भारत संकल्प यात्रेची ग्रामीण स्तरावरील सांगता
सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे याबाबतचे प्रबोधन जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून 11 व्हॅनव्दारे करण्यात आले. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.
कवलापूर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या ग्रामीण स्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खासदार संजय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कवलापूरच्या सरपंचा उज्ज्वला गुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, भानुदास पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कवलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्ह्यात दिनांक २४ नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली. तेव्हापासून आजअखेर ११ व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींमध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कालावधीत जवळपास दीड लाख नागरिक या यात्रेत सहभागी झाले. तर जवळपास ३ हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली गेली, वंचित लाभार्थींची नोंदणी केली गेली व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला गेला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या यात्रेंतर्गत जिल्ह्यात आयुष्मान कार्डच्या वाटपामध्ये भरीव कामगिरी झाली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आयुष्मान कार्ड मिळाल्यामुळे 5 लाख रूपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कवलापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही कवलापूरच्या विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
खासदार संजय पाटील म्हणाले, सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचवली गेली. लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला गेला. यामध्ये जवळपास ४ लाख आयुष्मान कार्ड वाटप केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
विविध प्रमाणपत्र वाटप
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अटल बांधकाम कामगार घरकुल योजना, मोदी आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री, दिव्यांग कल्याण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना आदि योजनांच्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची चित्रफीत दाखवण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपट्यास पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवरानी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये आयुष्मान भारत, रोजगार हमी योजना, महा आवास योजना, महसूल विभाग चावडी, पुरवठा विभाग, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जलजीवन मिशन, पोस्ट विभाग, जिल्हा मध्यवर्ती बँक या शासकीय विभागासह महिला बचत गटांच्या स्टॉलना उपस्थित लाभार्थीनी भेट देऊन माहिती घेतली.
शोभा यात्रा
मान्यवरांची शोभा यात्रा स्मार्ट पीएचसी ते ग्रामपंचायत कार्यालय पटांगण ते कार्यक्रमस्थळ अशी काढण्यात आली.
स्वागत सरपंच उज्ज्वला गुंडे यांनी केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले. लाभार्थीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यात्रा कालावधीत सहकार्य केलेल्याप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले. भानुदास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन
प्रारंभी आयुष्मान आरोग्य मंदिर (स्मार्ट पीएचसी) कवलापूरचे उद्गाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट पीएचसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
00000
गुरुवार, ४ जानेवारी, २०२४
राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची सूचना
सांगली, दि. 04 (जि. मा. का.) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले असून सदरचे अतिक्रमण अथवा विनापरवाना बांधकाम ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याची नोटीस प्राधिकरणाचे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निदेशक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविली आहे. सदरची नोटीस राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम, 2002 च्या कलम 26 च्या उप कलम (2) अंतर्गत दि. ३ जानेवारी रोजी प्रदर्शित आली आहे.
नोटिशीत म्हटले आहे कि, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. सदरच्या अतिक्रमणामुळे रा. म. क्र. 166 बोरगाव - वाटंबरे सेक्शन कि.मी. 224/000 ते कि.मी.276/000 (सांगली जिल्ह्यातील सा.क.224/000 ते सा.क. 253/000 पर्यंत) पॅकेज-2 या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम करण्यास अडथळा होत आहे. रा. म. क. 166 च्या रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस रस्त्याच्या हद्दीपर्यंत (Row) अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विना परवाना बांधकाम सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत स्वखर्चाने त्वरित काढून घेण्यात यावे. अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट 2002 अन्वये निष्कासित करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबधित धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यान्वयन इकाई सोलापूर चे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निदेशक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
शासनाच्या क्रीडा पुरस्कारांसाठी 22 जानेवारीपर्यंत अर्जमागणी
सांगली, दि. 04 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारांसाठी दि. ८ ते २२ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. पुरस्काराकरिता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांचेद्वारा अर्ज मागविण्यात आले असून विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. ८ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत दि. २२ जानेवारी, २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
00000
मंगळवार, २ जानेवारी, २०२४
पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा, वितरण सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष - प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
- जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा
- पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत
- नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कार्पोरेशन या तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमिवर पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून, पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.
तिन्ही कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनातर्फे महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी, एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल इंधन डेपो व्यवस्थापक, तिन्ही कंपन्यांचे समन्वयक, वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी व अन्य विक्री व्यवस्थापक यांची तातडीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात घेण्यात आलेल्या या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, तिन्ही कंपन्यांचे अधिकारी, समन्वयक, वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा, तसेच संपामुळे पेट्रोल डिझेलच्या वाहतूक व वितरणावर झालेल्या परिणामाचा, वाहतूकदारांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. वाहतूकदार संघटना व डेपो व्यवस्थापक यांनी त्यांची बाजू मांडली. तसेच, प्रत्येक डेपोला गरजेनुसार २ पोलिसांचा बंदोबस्त देण्याचे तयारी जिल्हा प्रशासनातर्फे दर्शवण्यात आली.
प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत पेट्रोल व डिझेलचा जीवनावश्यक वस्तू म्हणून अंतर्भाव होतो. या अधिनियमांतर्गत पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमिवर वाहनचालक व वाहतूकदार यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या वितरणात अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के इंधन वितरण एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल या तीन कंपन्यांकडून केले जाते. या तिन्ही कंपन्यांकडून टँकर्सद्वारे पेट्रोल पंप चालकांना सुरळीत इंधन वितरण सुरू असल्याची खात्री केली आहे. जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलजन्य पदार्थांच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर विपरित परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, डेपो मॅनेजर, वाहतूकदार व डीलर्स यांच्यामध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. याचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची पथके तयार करून पेट्रोलपंपांच्या इंधनाचा साठा तपासला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, भविष्यात संपांची वेळ आली तर आगाऊ साठा करून ठेवण्याचे निर्देश देऊन त्यांनी तिन्ही कंपन्यांनी सांगली जिल्ह्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अपवादात्मक स्थितीत पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे वाहनचालक वाहतुकीस विरोध करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
00000
शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३
मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
- १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ
- राज्यात ७५ अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारणार
- नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासावी. मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा वने, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
१०० व्या नाट्य संमेलनाच्या मुहुर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार संजय पाटील, १०० वे नाट्य संमेलन स्वागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नाट्य परिषद सांगली शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
१०० व्या नाट्य संमेलनासाठी शुभेच्छा व्यक्त करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला प्रगल्भ नाट्यपरंपरा आहे. ही नाट्यसंस्कृती रसिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी, हा नाट्यसंमेलनाचा उद्देश आहे. मराठी रंगभूमी, नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवावी. शासन नाट्यकर्मींच्या पाठीशी आहे. दर्दी रसिकांच्या पाठिंब्यावर मराठी रंगभूमी एक हजाराव्या नाट्यसंमेलनाचा टप्पा गाठेल. याच विचाराने संबंधित सर्वांनी कृती करावी, असे ते म्हणाले.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाटक हृदयापर्यंत आशयभाव पोहोचवते. नाटकामध्ये मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता करण्याची ताकद आहे. २१ व्या शतकात विविध आव्हानांवर मात करून नाटककार, कलावंत आणि रसिकांनी नाट्यसंस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंमेलनामध्ये रंगभूमीपुढील आव्हाने व त्यावर मात करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ८६ नाट्यगृहे असून त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. नगर विकास विभागाकडून सदर ५२ नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर राज्यात नवीन ७५ सौर ऊर्जा वापरणारी अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारण्यासाठी मंजुरी प्राप्त असून, नाट्यगृहांमध्ये कलाकार व रसिक प्रेक्षकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही नाट्यगृहे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, याअंतर्गत नाटके प्रायोजित करावीत, असे त्यांनी सूचित केले. तसेच नाट्यप्रयोगांसाठी अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीची नाट्यपंढरी अशी ओळख असून, १०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ असल्याबद्दल स्वागत व शुभेच्छा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सध्या रंगभूमीसमोर इलेक्ट्रॉनिक व अन्य माध्यमांचे आव्हान उभे आहे. मात्र, नाटकांची क्रेझ पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नाट्य संमेलनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपणही सांगलीचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिरास सी.एस.आर. मधून वातानुकुलित यंत्रणेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
प्रेमानंद गज्वी यांनी मार्गदर्शन केले.
१०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ सांगलीत होत असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त करून स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, समस्त सांगलीकर आणि नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर यांच्यामुळे सांगलीची ओळख नाट्यपंढरी म्हणून निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
सध्या नाटकांच्या प्रयोगांमुळे सर्व कलाकारांना एकत्र येणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्र यायला मिळते, असे सांगून ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांची देखभाल, अद्ययावत नाट्यगृहांमध्ये सोलर सिस्टीम व नवोदित कलाकारांची मुंबईत निवास व्यवस्था व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, कलाकार म्हणून आम्हीही आमची जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित भुरे यांनी मनोगत व्यक्त केले
मुकुंद पटवर्धन म्हणाले, दिग्गज कलावंत सांगलीत घडले. सांगलीत हे पाचवे नाट्य संमेलन होत आहे. १०० वे नाट्य संमेलन विभागवार ६ ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख एकच व्यासपीठावर आले आहेत. यातून रंगभूमीला नवी दिशा, विचार व नजर मिळेल. सांगलीची आलौकिक नाट्यपरंपरा पुन्हा प्रकाशमय होत असल्याचे ते म्हणाले.
नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, संमेलन समिती प्रमुख विजय चौगुले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नांदी सादर करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शमी, आंबा व उंबराच्या फांद्यांना मुहुर्तमेढ बांधण्यात आली. तसेच संहितापूजन करण्यात आले. प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून मुहुर्तमेढ करण्यात आली. सदर घंटा ६ विभागीय संमेलनात वाजवली जाणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार राजेंद्र पोळ यांच्या १० नाट्यकृतींच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्कारप्राप्त डॉ. तारा भवाळकर, सदानंद कदम, पंडित हृषिकेश बोडस, शाहीर देवानंद माळी यांचा श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
00000
शारीरिक तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश गरजेचा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
जिल्हास्तरीय कृषि महोत्सव उत्साहात संपन्न
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : शारीरिक तंदुरूस्तीसाठी व आरोग्याचे सौख्य राखण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.
जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ॲग्री मॉल परिसर (फळरोपवाटिका कुपवाड प्रक्षेत्र), विजयनगर सांगली येथे आयोजित या कृषि महोत्सव उद्घाटन प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, प्रकल्प संचालक (आत्मा) जांबूवंत घोडके, उपविभागीय कृषि अधिकारी जत मनोज वेताळ, उपविभागीय कृषि अधिकारी विटा प्रकाश कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, प्रकल्प उपसंचालक श्री. खरात, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन करून व या महोत्सवास शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपला देश जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. बदलत्या व धकाधकीच्या जीवनात तंदुरूस्त राहण्यासाठी तृणधान्यांचा उपयोग मोठा आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा तृणधान्यांचा आपल्या आहारातील समावेश वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्यांचे सेवन केल्याने शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती मिळते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच, तृणधान्यांवर प्रक्रिया करून युवा पिढीला आवडतील असे विविध पदार्थ केले जात आहेत. त्यामुळे सशक्त पिढीसाठी व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दैनंदिन आहारात तृणधान्यांच्या पदार्थांचा समावेश करण्याची गरज करून त्यांनी याबाबत जनजागृती करण्याचे मत व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2023-24 महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत हा एकदिवसीय जिल्हास्तरीय कृषि महोत्सव घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय व उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय मिरज यांच्या समन्वयाने याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख, आहारातील महत्त्व याबाबत प्रचार प्रसिध्दी, व्याख्यान, विविध नमुने, विविध पदार्थांचे 35 स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ व प्रक्रिया संयत्र स्टॉलचा समावेश होता.
पौष्टिक तृणधान्य रॅली
दरम्यान, कृषि महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली. ही रॅली विलिंग्डन कॉलेज ते विजयनगर चौक मार्गे ॲग्री मॉल परिसर अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, तालुका कृषि अधिकारी, कृषि विभागाचे कर्मचारी, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन व्यवस्थापन महाविद्यालय सांगली महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या महोत्सवास शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट व स्थानिक नागरिक यांनी भेट देवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)