बुधवार, १२ जून, २०२४

जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपसाठी नियमावली जारी आदेशाप्रमाणे आस्थापनांमध्ये बदल करण्यासाठी 22 जून पर्यंत मुदत

जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपसाठी नियमावली जारी आदेशाप्रमाणे आस्थापनांमध्ये बदल करण्यासाठी 22 जून पर्यंत मुदत सांगली दि. 12 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल), अशा तत्सम आस्थापनांना नियमावली घालून देण्यात आली असून या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जारी केले आहेत. आदेशाप्रमाणे संबंधित आस्थापनांमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी संबंधित आस्थापना यांना दिनांक 22 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल), अशा तत्सम आस्थापनांना पुढीलप्रमाणे नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. कॅफे शॉपमधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत यावी अशी सीसीटीव्ही यंत्रणा कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये बसवणे बंधनकारक आहे. कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत, दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत, सर्व बैठक व्यवस्था स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी, अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नयेत, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यासाठी भेट पुस्तिका (व्हिजिट बुक) ठेवावी, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये (डेक, डॉल्बी इतर) ध्वनीक्षेपण व्यवस्था, ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू राहतील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे सक्षम प्राधिकारी असतील. या नियमावली प्रमाणे तपासणीचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना असतील. हा आदेश दिनांक 23 जून 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 22 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

गट-क संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

सांगली दि. 12 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 13 ते 15 जून 2024 या कालावधीत जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील 754 पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे. परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. ही परीक्षा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, सांगली-तासगाव रोड, बुधगाव, टेकवेअर टेक्नोलॉजी, विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधामनी, सांगली व नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, पेठ नाका ता. वाळवा या महाविद्यालयाच्या ठिकाणी दिनांक 13 जून 2024 रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 व दि. 15 जून 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत तर वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड वान्लेसवाडी, सांगली या महाविद्यालयाच्या ठिकाणी दि. 13 ते 15 जून 2024 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत होणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 18 जूनला सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जून महिन्यातील तिसऱ्या सोमवारी दि. 17 जून रोजी बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने माहे जून महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन मंगळवार, 18 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी दिली. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे. 00000

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 12 (जि.मा.का.) :- मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहामध्ये सन 2024-25 या वर्षात 80 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची मोफत सुविधा असून पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जून पर्यंत वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे प्रमुख ना.ना. वाघमारे यांनी केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येत असलेले हे वसतिगृह कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सांगली येथील मिरा हौसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली येथे कार्यरत आहे. वसतिगृहात 8 वी ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी 20 जागा, 11 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी 30 जागा व महाविद्यालयीन विभागातील B.A., BCom आणि BSc च्या विद्यार्थ्यांसाठी 30 जागा आहेत. प्रवेशासाठी 3 जून पासून अर्ज वाटप सुरू असून 30 जून पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विहीत नमुन्यातील भरलेला प्रवेश अर्ज (शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेशाबाबत प्राचार्यांच्या प्रमाणपत्रासह), सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तहसिलदार यांच्याकडील रूपये एक लाख रूपये पर्यंतच्या उत्पन्नाच्या दाखल्याची मूळ प्रत, मागील परीक्षा उत्तीण गुण पत्रकाची सत्यप्रत, पोलीस पाटील यांच्याकडील वर्तुणुकीच्या दाखल्याची मूळ प्रत, गाव कामगार तलाठी यांच्याकडील रहिवासी दाखला मूळ प्रत, मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची सत्य प्रत आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो या कागदपत्रासह अर्ज वसतिगृहामध्ये (शासकीय सुट्टी खेरीज) अर्ज करावा, असे वसतिगृह प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सैनिक मुलां-मुलींचे वसतिगृहात प्रवेशासाठी 25 जून पर्यंत अर्ज करा

सांगली, दि. 12 (जि.मा.का.) :- सैनिक मुलां-मुलींचे वसतिगृह सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता सेवारत सैनिक, माजी सैनिक, विधवा, सिव्हीलियन यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलां-मुलींना गुणवत्तेच्या आधारावर सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुकांनी संबंधित वसतिगृहातून प्रवेश अर्ज प्राप्त करून परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रासह दिनांक 25 जून 2024 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली दुरध्वनी क्रमांक 0233-2990712, अधिक्षक सैनिकी मुलांचे वसतिगृह सांगली दुरध्वनी क्रमांक 9419290797, अधिक्षिका सैनिकी मुलींचे वसतिगृह सांगली दुरध्वनी क्रमांक 8888503873 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. चवदार यांनी केले आहे. 00000

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : यंदा हवामान विभागाने 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीत दक्ष रहावे. तसेच त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सून तयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अर्पणा मोरे, लिना खरात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील नाले व गटार सफाई तात्काळ करून त्यामधील गाळाची योग्य विल्हेवाट लावावी. नागरिकांना दुषित पाणी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी फॉगींग करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांची माहिती एस.टी. व उपप्रादेशिक परिवहन विभागाला त्वरीत द्यावी. त्याचबरोबर महसूल प्रशासन, पोलीस, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्राची पाहणी संयुक्तरित्या करावी. आपत्ती निवारण कामामध्ये एन.डी.आर.एफ.च्या जवानांसह पोलीस तसेच सेवाभावी संस्थांचा सहभाग घ्यावा. पूरपरिस्थितीत वॉटर रिसोर्सेसची तपासणी करत असताना त्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण योग्य राहील याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी. तात्पुरत्या निवारा केंद्रासाठी जिल्ह्यातील मोठ्या मंगल कार्यालयांची यादी तयार करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिले. तर शहरातील धोकादायक इमारतीवर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर कार्यवाही केल्याची माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी दिली. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी जिल्ह्यातील 13 मंडळामध्ये 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात कोठेही जिवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. या बैठकीसाठी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 00000

शनिवार, १ जून, २०२४

समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिज रस्त्यावर मनाई आदेश जारी

सांगली दि. 1 (जि.मा.का.) :- 44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजीणी 4 जून 2024 रोजी सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथे होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक येण्याची शक्यता आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 5 ते मतमोजणी संपेपर्यंतच्या कालावधीसाठी सेंट्रल वेअर हाऊसचे मुख्य गेट समोरील समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिजकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सेंट्रल वेअर हाऊसचे मुख्य गेट समोरील समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिजकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर बिग्रेड व इतर शासकीय वाहने या खेरीज इतर सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. मनाई करण्यात आलेल्या मार्गास पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून समता नगरकडून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी समतानगर- मिरज रेल्वे स्टेशन रोड-आंबेडकर उद्यान-वंटमुरे कॉर्नर पासून सांगलीकडे (परतीचा मार्ग तोच रोहील) तर कृपामाई ब्रिजकडून समतानगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी- कृपामाई ब्रिज-वंटमुरे कॉर्नर-रेल्वे स्टेशन रोड मार्गे समतानगर (परतीचा मार्ग तोच राहील). मतमोजणी दिवशी सकाळी 5 पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत पार्किंगसाठी (१) मारुती मंदिर ते सूतगिरणीकडे जाणारे रोडचे उत्तरेस- भूमापन क्र. 926, (2) शेठ रतीलाल गोसलिया डी. एड. कॉलेजचे पूर्व बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 878, (3) सुखसमृद्धी अपार्टमेंटच्या पूर्व बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 919, (4) सुखसमृद्धी अपार्टमेंटच्या पश्चिम बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 919 आणि (5) भोकरे कॉलेज आवारातील मोकळे मैदान अधिगृहीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक श्री. घुगे यांनी आदेशात नमूद केले आहे. 00000