शुक्रवार, ३० जून, २०१७

चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आगळगाव, जत येथे आज कार्यक्रम मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत सांगली जिल्ह्यात होणाऱ्या रोप लागवड स्थळावर लोकप्रतिनिधी अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रोप लागवड होणार आहे. यामध्ये दिनांक 1 जुलै 2017 रोजी जत तालुक्यातील कसबे जत कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख तसेच जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय रोप लागवड कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. ही माहिती वनविभाग सांगलीचे उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा यांनी दिली.                                 
उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा म्हणाले, दिनांक 2 जुलै 2017 रोजी मिरज तालुक्यातील दंडोबा येथे सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रोप लागवड होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दिनांक 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत रोप लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यास 8 लाख 84 हजार इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आली असून या वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई पूर्ण करण्यात आली आहे. सन 2017 च्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीकरिता जिल्हास्तरावर 6, तालुकास्तरावर 17, गावस्तरावर 86 बैठका घेण्यात आल्या. तसेच 1 मे 2017 रोजीच्या ग्रामसभेत 733 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यात वन विभागास 4 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 64 हजार, ग्रामपंचायत 2 लाख 55 हजार इतर यंत्रणांना 1 लाख 65 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाकडे 11 लाख 91 हजार तर सामाजिक वनीकरण विभागाकडे 9 लाख 6 हजार अशी एकूण 20 लाख 97 हजार इतकी रोपे तयार आहेत.
वृक्ष लागवडीसाठी वन विभागाच्या संकेत स्थळावर 1 लाख 24 हजार 531 इतक्या सांगली जिल्हा हरित सेना सदस्यांची नोंदणी झाली आहे. लागवड झालेल्या रोपांची नोंदणी, संरक्षण देखभाल यासाठी नियोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा यांनी केले आहे.
00000


सेंद्रिय हळद उत्पादन व प्रमाणीकरण कार्यशाळेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - मनोज वेताळ

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात सेंद्रिय हळद उत्पादन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय हळद उत्पादन प्रमाणीकरणाबाबत सखोल माहिती देण्यासाठी दिनांक 5 जुलै 2017 सकाळी 11 वाजता आत्मा सभागृह, कृषि चिकीत्सालय, विजयनगर, सांगली-मिरज रोड, सांगली येथे कार्यशाळा आयोजित केली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन मिरज उप विभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ यांनी केले आहे.
श्री. वेताळ म्हणाले, सेंद्रिय हळदीला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी असून सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त हळद उत्पादन होते. तरीही सांगली जिल्ह्यात सेंद्रिय हळद उत्पादन होत नाही. सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी जागतिक बाजारात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याबाबत 100 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय हळद घेण्याच्या उपक्रमाचे कृषि विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. तीन वर्षासाठी शेतकऱ्यांना या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन प्रमाणीकरण यासाठी शासन सहकार्य करणार आहे. या प्रक्रियेतील गावांची निवड करण्यासाठी दिनांक 5 जुलै 2017 रोजीच्या कार्यशाळेत चर्चा होऊन शेतकऱ्यांची निवड पूर्ण करण्यात येणार आहे.

00000

तरूण व पात्र मतदारांनी विशेष मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी करावी - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : 18 ते 21 वयोगटातील तरूण मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 ते 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरूण पात्र मतदारांनी (वय 18 ते 21 वर्षे) तसेच ज्यांची नावे मतदारयादीत नाहीत अशा पात्र नागरिकांनी या विशेष मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.
या मोहिमेंतर्गत 1 ते 31 जुलै 2017 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देणार आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे मतदारयादीत नाव समाविष्ट, वगळणी दुरुस्ती करीता नमुना अर्ज भरुन द्यावेत. तसेच या विशेष मोहिमेंतर्गत दि. 8 जुलै 2017 22 जुलै 2017 या सुट्टीच्या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व मतदार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करू शकतात. तरी ज्यांची नावे मतदारयादीत नाहीत अशा सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.

00000