गुरुवार, २३ जुलै, २०२०

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू


सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : विविध आंदोलने आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 24 जुलै ते 5 ऑगस्ट 2020 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे. मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 24 जुलै 2020 रोजीच्या 00.01 वाजल्यापासून ते  दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
00000

कोविड रूग्णांवर उपचारासाठी कुल्लोळी हॉस्पिटल उपलब्ध - महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस

24 जुलै पासून रूग्णालयामध्ये कोव्हिड रूग्णांवर उपचार चालू करण्याचे आदेश

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा प्रतिबंधात्मक उपचारात्मक काम सुरू आहे. सद्यस्थितीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णांवर उपचार करण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी डॉ. शिवगोंडा कुल्लोळी यांचे कुल्लोळी हॉस्पीटलमधील उजवीकडील पूर्ण इमारत (इमारत क्र. 2) यामधील 100 टक्के खाटा कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी तात्काळ आरक्षित केल्या आहेत. तसेच शुक्रवार दि. 24 जुलै 2020 पासून रूग्णालयामध्ये कोव्हिड रूग्णांवर उपचार चालू करण्यात यावेत, असे आदेश महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी जारी केले आहेत.
सद्यस्थितीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णावर उपचार करण्यासाठी जी रूग्णालये बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट (अमेंडमेंट) 2005 अंतर्गत नोंदणीकृत आहेत, अशा खाजगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोव्हिड रूग्णांवर उपचार होणे अपेक्षित आहेत. डॉ. शिवगोंडा कुल्लोळी यांचे कुल्लोळी हॉस्पीटल, विश्रामबाग, सांगली हे खाजगी रूग्णालय बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट (अमेंडमेंट) 2005 अंतर्गत नोंदणीकृत महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सूचीबध्द आहे. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सदर आदेश जारी केले आहेत.
रूग्णालयात कोव्हिड रूग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वित करावा. यामध्ये संशयीत कोव्हिड कोव्हिड पॉझिटीव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची तात्काळ सोय करावी. तसेच आयसीयु चे सर्व बेडस् फक्त कोव्हिड पॉझिटीव्ह रूग्णांसाठी राखीव ठेवावेत. शुक्रवार दि. 24 जुलै 2020 पासून रूग्णालयामध्ये कोव्हिड रूग्णांवर उपचार चालू करण्यात यावेत. त्यासाठी डीएमईआर डीएचएस विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई मार्फत निर्गमित केलेल्या उपचार प्रणालीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून उपचार करण्यात यावेत, असे आदेश महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कामात हजगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार आणि Section 2(a)(iii) Maharashtra Essential Services Maintenance Act 2005 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच सदर रूग्णालयाच्या आस्थापनेवर कार्यरत सर्व कर्मचारी कर्तव्य ठिकाणी उपस्थित राहून कर्तव्य बजावत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरूध्द वरील कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या नागरिकांना कोविड-19 बाबत उपचार घ्यावयाचे असतील त्यांनी शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार कुल्लोळी हॉस्पिटल विश्रामबाग, सांगली येथे उपचार घ्यावेत, असे आवाहनही महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
00000