शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२
जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी 2 जानेवारी पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : शालेय जिल्हास्तरीय युवा महोत्सव सन 2022-2023 चे आयोजन दि. 3 जानेवारी 2023 रोजी कस्तुरबाई महाविद्यालय कॉलेज सांगली येथे होणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज दि. 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsosport_sangli@rediffmail.com या मेलवर सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर व्हॉटसॲप नंबर असणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.
युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींचा सहभाग होत असतो. जिल्हास्तरावर लोकनृत्य-Folk Dance मध्ये एकूण सहभागी संख्या 20 आहे तर लोकगीत-Folk Song मध्ये सहभागी संख्या 10 आहे. स्पर्धकांनी दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता कस्तुरबाई महाविद्यालय कॉलेज सांगली या ठिकाणी दोन फोटो, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला घेवून उपस्थित रहावे. स्पर्धकाने नाव नोंदणी करताना प्रवेशासोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळा / महाविद्यालय ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. कोणत्याही स्पर्धकास ऐनवेळी स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही. दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धकास सादरीकरणाची परवानगी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेतच सादरीकरण करावे. परीक्षणाबाबत कोणताही आक्षेप घेता येणार नाही. प्रतिस्पर्धी कलाकारांबाबत काहीही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यानिशी त्याचवेळी आक्षेप सिध्द करणे आवश्यक राहील. कलाकारांना कला सादर करताना कोणत्याही प्रकारची इजा / दुखापत झाल्यास त्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या स्पर्धात्मक बाबीतून विजयी होणारे स्पर्धक हे विभागस्तर युवा महोत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी प्रा. श्री. वडमारे, सांगली मो.नं. 9423036091, श्री. रवी पवार, विटा मो. नं. 9657091000/ 9175283887, क्रीडा अधिकारी एल. जी. पवार मो.नं. 9422424185 यांच्याशी संपर्क साधावा.
00000
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, सण, मोर्चा, कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून प्रभारी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 1 ते 15 जानेवारी 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 1 जानेवारी 2023 रोजीचे 01.00 वाजल्यापासून ते दि. 15 जानेवारी 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
00000
दुभंगलेले ओठ, टाळू आजाराच्या शस्त्रक्रियेकरीता 31 बालकांची तपासणी पुढील महिन्यात शस्त्रक्रिया मोफत पूर्ण होणार - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 31 बालकांकरिता दि. 29 डिसेंबर 2022 रोजी प्रभु क्लिनिक डॉ. महेश प्रभु कोल्हापूर यांच्या पथकांमार्फत प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले. तपासणीअंती शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारिरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या 29 बालकांच्या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच स्माईल ट्रेन या योजनेतून जानेवारी महिनाअखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुभंगलेल्या टाळूच्या दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मुंबई येथील एस.आर.सी.सी. रूग्णालय येथे पूर्ण करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
या शस्त्रक्रियेकरीता खाजगी रूग्णालयात प्रति शस्त्रक्रिया 90 हजार ते 1 लाख रूपये पर्यंतचा खर्च करावा लागतो. अशाप्रकारे एकूण 30 लाख रूपये रक्कमेच्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शस्त्रक्रिया शिबीरांकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे मार्गदर्शन लाभले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, डी.ई. आय.सी. अधिकारी व कर्मचारी यांनी शिबीराचे नियोजन केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकिय पथकांमार्फत करण्यात येत आहे. वैद्यकिय अधिकारी महिला व पुरूष, औषधनिर्माता व परिचारीका अशा चार जणांच्या पथकांमार्फत लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. प्रति 25 हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण 32 वैद्यकिय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. किरकोळ आजार असणाऱ्या लाभार्थ्यांना जागेवरच औषधोपचार करण्यात येतात. तपासणीमधून हृदय रोग बालके तसेच इतर आजारांमध्ये अस्थिव्यंग, कान-नका-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालके संदर्भित करण्यात येतात.
दुंभगलेले ओठ व टाळू या जन्मजात आजारामुळे बालकांना अन्न गिळण्यामध्ये, बोलण्यामध्ये, श्वास घेण्यामध्ये प्रचंड अडथळा निर्माण होतो. लवकरात लवकर शस्त्रक्रिया न केल्यास कुपोषण व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बालके मोठ्या प्रमाणात अशक्त होवून इतर किरकोळ आजारास वारंवार बळी पडतात. वेळेत, यशस्वी व पूर्णपणे मोफत केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे बालके सशक्त व अत्यंत सामान्य जीवन जगू शकतात.
00000
गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२
कृषि महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : राज्यस्तरीय कृषि महोत्सव औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे दि. 1 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत करण्याचे नियोजित आहे. या कृषि महोत्सवात कृषि प्रदर्शन व कृषि विद्यापिठामार्फत विविध विषयांवर तांत्रिक चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे.
00000
लम्पी चर्मरोगाने मृत्यू : नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सोय
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन प्रणालीव्दारे अर्ज स्वीकारण्यासाठी www.mahapashuarogya.com या संकेतस्थळावर व गुगल प्लेस्टोअरवर PASHU SAHAYATA मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. लम्पी चर्मरोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या पशुपालकांनी या संकेतस्थळावर अथवा PASHU SAHAYATA मोबाईल अॅपवर नोंदणी करून अर्ज करावेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पशुपालकांनी स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी केले आहे.
00000
शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (MAHATET-2021) चे आयोजन दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर 1 व 2 चा अंतिम निकाल दि. 23 डिसेंबर 2022 रोजी परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद / शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांच्यामार्फत पाठविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
पेपर १ व २ साठी एकूण 4 लाख 68 हजार 679 परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 17 हजार 322 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 3.70 टक्के इतकी आहे. पेपर 1 (इ. 1 ली ते 5 वी गट) साठी 2 लाख 54 हजार 428 परीक्षार्थीं प्रविष्ठ झाले होते. यापैकी 9 हजार 674 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 3.80 टक्के इतकी आहे. पेपर2 - गणित विज्ञान (इ. 6 वी ते 8 वी गट) साठी 64 हजार 647 परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 937 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 1.45 टक्के इतकी आहे. पेपर 2 - सामाजिक शास्त्र (इ. 6 वी ते 8 वी गट) साठी 1 लाख 49 हजार 604 परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 6 हजार 711 परीक्षार्थी पात्र झाले असून पात्र टक्केवारी 4.49 टक्के इतकी आहे.
00000
बुधवार, २८ डिसेंबर, २०२२
बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार
सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी दिली.
ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारमध्ये NCS किंवा Mahaswayam वेबपोर्टलव्दारे नोकरीच्या संधी या विषयावर यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर ठाणे चे आशुतोष साळी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/kvd-ccio-ahx या लिंकवर वेबीनारमध्ये विहीत वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)