गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा पुण्यात शनिवारी विविध घटकांशी संवाद

- ई-मेलवर सूचना, अभिप्राय पाठवण्याचे आवाहन सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पुण्यात स्पर्धा परीक्षार्थी, उमेदवार तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांशी थेट संवाद साधणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सकाळी १० वाजल्यापासून हा संवाद साधला जाणार आहे. यासाठी pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय पाठवू शकतात. भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांमध्ये येणाऱ्या अडचणी, उमेदवारांचे अनुभव, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, प्रश्नपत्रिका व परीक्षा सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण तसेच परीक्षा पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत या संवादात थेट मते व सूचना मांडता येणार आहेत. भरती परीक्षा अधिक विश्वासार्ह आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि उमेदवारांचा अनुभव या सुधारणांसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. विद्यार्थी व उमेदवारांना आपल्या सूचना आणि अनुभव प्रत्यक्ष अथवा दिलेल्या ई मेलवर मांडता येतील. या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास होऊन, त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा