शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६
गणेशोत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांचा ‘लोकसंवाद’
सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, सांगलीत याच उत्सवाच्या मंचाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान राबवल्या जाणाऱ्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष उपक्रमांतर्गत, सांगलीतील नामांकित 'खोकी संघटना गणेश मंडळ' येथे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने आणि खोकी संघटना गणेश मंडळाचे अध्यक्ष पत्रकार दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. शासकीय योजनांच्या माहितीबरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या नशामुक्त सांगली करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत खोकी संघटना गणेश मंडळाचे अध्यक्ष पत्रकार दीपक चव्हाण यांनी सामाजिक भान जपणारा त्यांच्या मंडळाच्या वतीने सादर केलेला ‘नशामुक्त सांगली’ हा सजीव देखावा शासकीय उपक्रमास उपयुक्त व प्रेरणादायी ठरला. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी तरुणांसाठी असणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना आणि आगामी रोजगार मेळाव्यांची सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
महानगरपालिकेच्या प्रतिनिधी अश्विनी माने व तेजस्विनी वाघमारे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित 'आभा कार्ड', 'आयुष्मान भारत कार्ड', 'जननी सुरक्षा योजना' आणि व्यसनमुक्ती मोहिमेबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा चाईल्ड लाईनच्या आरती निडसोसे यांनी महिला व बालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'लेक लाडकी', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', 'बालसंगोपन योजना' आणि 'अनाथ प्रमाणपत्र' याविषयी मोलाची माहिती दिली. तसेच आपत्कालीन मदतीसाठी चाईल्ड लाईन (१०९८) आणि महिला हेल्पलाईन (१८१) या क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन केले.
या माहितीपूर्ण आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाला मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल प्रवीण बनकर, जिल्हा चाईल्ड लाईनचे शानूर दानवडे, खोकी संघटना गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा