रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

‘जिल्हा कर्मयोगी २.०’, ‘सेवासंकल्प अभियानांतर्गत अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा

- सक्षम प्रशासन, कार्यक्षम कार्यसंस्कृती आणि नागरिककेंद्रित सेवा वितरणाच्या दिशेने जिल्हा परिषद सांगलीचे महत्त्वपूर्ण पाऊल सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व सुशासनाच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, सांगली येथे ‘जिल्हा कर्मयोगी २.०’ आणि ‘सेवासंकल्प अभियान २०२६’ अंतर्गत अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे तसेच नागरिकांना गतिमान, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस जिल्हा परिषद, सांगलीचे सर्व विभागप्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी उपस्थित होते. ‘जिल्हा कर्मयोगी २.०’ हा उपक्रम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून प्रशासकीय कार्यसंस्कृतीमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून प्रशासकीय क्षमता विकास, परिणामकारक निर्णयप्रक्रिया, नेतृत्वगुणांचा विकास, नावीन्यपूर्ण कार्यपद्धतींचा अवलंब आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाला चालना देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. ‘सेवासंकल्प अभियान २०२६’च्या उद्दिष्टांशी सुसंगतपणे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासन अधिक संवेदनशील, उत्तरदायी आणि परिणामाभिमुख करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळेला विशेष महत्त्व देण्यात आले. शासकीय सेवांचे प्रभावी वितरण, प्रशासकीय कामकाजातील अनावश्यक विलंब कमी करणे, सेवा प्रक्रियांचे सुलभीकरण करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांनुसार गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यावर यावेळी भर देण्यात आला. या कार्यशाळेत Illume Knowledge Resources आणि MITRA Team यांच्या संयुक्त विद्यमाने क्षमता विकास, आधुनिक प्रशासकीय कार्यपद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कार्यप्रणालीतील सुधारणा, समन्वयात्मक नेतृत्व आणि परिणामकारक सेवा वितरण यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या प्रशासकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये, सकारात्मक दृष्टिकोन आणि लोकाभिमुख कार्यसंस्कृती विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणातील विविध संकल्पनांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेमध्ये अधिक सुसूत्रता व समन्वय निर्माण करणे, कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वृद्धिंगत करणे तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रशिक्षणातून प्राप्त ज्ञान व कौशल्यांचा प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजात प्रभावीपणे उपयोग करून सेवा वितरणाची गुणवत्ता उंचावण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषद, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून प्रशासकीय क्षमता विकासासोबतच कर्तव्यनिष्ठा, लोकाभिमुखता, नवोपक्रम आणि परिणामकारक कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘कर्मयोगी’ वृत्तीच्या माध्यमातून सक्षम अधिकारी आणि ‘सेवासंकल्प’च्या माध्यमातून संवेदनशील प्रशासन निर्माण करणे, हा या दोन्ही उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. प्रशासकीय कार्यक्षमतेचे रूपांतर नागरिकांच्या समाधानात आणि शासनाच्या धोरणांचे रूपांतर प्रभावी सेवा वितरणात करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा